Homeटॉप स्टोरीसीमा प्रश्नावरील न्यायालयीन...

सीमा प्रश्नावरील न्यायालयीन लढ्यासाठी दोन मंत्र्यांची नियुक्ती

महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात राज्य शासन संपूर्णपणे सीमा भागातील बांधवांच्या भक्कमपणे पाठीशी उभे आहे. यासंदर्भातील कायदेशीर लढाईसाठी एकजुटीने प्रयत्न करीत असून त्यासाठी वरिष्ठ विधिज्ञ वैद्यनाथन याची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा लाभ सीमा भागातील बांधवांना प्रभावीपणे होण्यासाठी सीमा प्रश्न हाताळणाऱ्या विशेष कक्षाचे बळकटीकरण करावे, मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ पूर्वीप्रमाणे सीमा भागात देण्याचा तसेच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभदेखील सीमा भागातील बांधवांना देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात उच्चाधिकारी समितीची बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, समितीचे सदस्य चंद्रकांत पाटील, डॉ. तानाजी सावंत, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार पृथ्वीराज चव्हाण, राजेश क्षीरसागर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ज्येष्ठ पत्रकार किरण ठाकूर आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सीमाप्रश्नी त्याभागातील बांधवांच्या नेहमी पाठीशी राहिले आहेत. सीमाप्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन गांभीर्याने लक्ष घालत आहे. त्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ वैद्यनाथन यांची नेमणूक करण्यात आली आहे. गरज भासल्यास अधिक विधिज्ञांची संख्या वाढविण्यात येईल. राज्य शासनाने संपूर्ण लक्ष या प्रश्नावर केंद्रीत केले आहे. त्याचबरोबर मी, उपमुख्यमंत्री फडणवीस आम्ही या प्रश्नासंदर्भात पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री यांची लवकरच भेट घेऊ, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

न्यायालयीन प्रक्रियेसाठी शासनकडून समन्वयक म्हणून चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोघांची नियुक्ती करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. सीमा भागातील बांधवांना महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

सीमाप्रश्न हा विषय हाताळणाऱ्या विशेष कक्षाचे बळकटीकरण करावे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असली तरी सीमा भागात मराठी भाषेचा वापर, त्या भागातील बांधवांना आवश्यक त्या सुविधा याबाबत कर्नाटक सरकारसोबत संवाद सुरू ठेवावा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

सीमा भागात पूर्वीप्रमाणे मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्याचबरोबर सीमा भागात महाराष्ट्र शासनाची महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्यात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असेही शिंदे यांनी सांगितले. सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या कुटुंबियांना स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणेच निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर न्यायालयीन लढाईसाठी एकीकरण समितीने अदा केलेल्या शुल्काच्या प्रतिपूर्तीचा निर्णयही घेण्यात आला.

सीमा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध- उपमुख्यमंत्री

सीमा प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. या प्रश्नी महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष एकत्र आहेत. सनदशीर, लोकशाही मार्गाने हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही सर्वजण सीमावासीयांबरोबर आहोत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content