Homeटॉप स्टोरीजितेंद्र आव्हाडांकडून आमदारकीचा...

जितेंद्र आव्हाडांकडून आमदारकीचा राजीनामा मागे?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आपला आमदारकीचा राजीनामा अखेर मागे घेण्याची शक्यता असून उद्यापर्यंत याबाबतची घोषणा होण्याची शक्यता जाणकार वर्तवित आहेत. दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरील विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी राष्ट्रवादीकडून करण्यात आलेले प्रयत्न अखेर विफल ठरल्याचे चित्रही आज संध्याकाळी स्पष्ट झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस निपक्षपातीपणे या प्रकरणाचा तपास करतील, असे सांगितल्याने याप्रकरणी पोलीस तपास होणार हेही आता निश्चित झाले आहे.

रविवारी कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला चुकीच्या पद्धतीने शरीराला स्पर्श करत बाजूला ढकलले असा आरोप करत एका महिलेने आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे उद्गिग्न झालेल्या आव्हाड यांनी ७२ तासांत आपल्याविरोधात दोन खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे सांगत आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे ट्विटरवरून जाहीर केले.

माझ्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवताना जे कलम लावलेले त्याबद्दल वाईट वाटले. माझ्यावर खुनाचे षडयंत्र रचल्याचा आरोप लावला असता तरी चालले असते. मात्र, विनयभंगाचा आरोप मान्य नाही. समाजामध्ये मान खाली जाईल, असा आरोप माझ्यावर लावण्यात आला आहे. राजकारण करावे, पण इतक्या खालच्या पातळीवर करू नये. याआधीदेखील पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवण्यात आले आणि तिथे बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली, असे आव्हाड यांनी ठाण्यात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत सांगितले.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेते चांगलेच आक्रमक झाले. अनेक कार्यकर्त्यांनी मुंब्रा पोलीसठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले तर काही कार्यकर्त्यांनी कळवा बायपास रोडवर टायर जाळून रास्तारोको केला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. एखादी महिला आरोप करते तेव्हा तिची बाजू पूर्णपणे ऐकून घेतली पाहिजे. मुख्यमंत्री स्वतः तिथे होते अणि सगळे असतानादेखील असे आरोप होणे चुकीचे आहे, असे  त्यांनी पुण्यात एका पत्रकार परिषदेत सांगितले. आव्हाड यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तातडीने सांगलीहून ठाण्यात गेले. तेथे आव्हाड यांच्याशी चर्चा करून त्यांनी आमदारकीचा राजीनामा मागे घेण्याची विनंती आव्हाड यांनी केली. पोलिसांनी अक्कल गहाण ठेवली आहे का, असा सवाल त्यांनी आव्हाड यांच्याबरोबर घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केला. त्यापाठोपाठ विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ठाण्यात आव्हाड यांची भेट घेऊन सरकारच्या या धोरणावर जोरदार टीका केली. आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये, अशी विनंती आपण त्यांना केली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशीही ते चर्चा करतील आणि त्यांचा निर्णय ते मान्य करतील, अशी अपेक्षाही व्यक्त करून आव्हाड उद्यापर्यंत आपला राजीनामा मागे घेतील, असे अजितदादांनी सूचित केले.

मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आव्हाड यांनी राजीनामा द्यावाच. या रिक्त पदावरची निवडणूक आम्हीच जिंकू, असा विश्वास व्यक्त केला तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आव्हाडांवर राष्ट्रवादीने निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील यावर आपली प्रतिक्रिया दिली. जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला की नाही हे मला माहित नाही. परंतु, या प्रकरणात पोलीस नियमानुसार चौकशी करतील. संबंधित महिलेच्या तक्रारीत तथ्य असेल तर पोलीस आपले काम करतील. आम्ही कोणत्याही सुडापोटी कारवाई करत नाही, असे ते म्हणाले. त्याआधी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी हस्तक्षेप करून विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिक्रियेमुळे आव्हाड यांच्यावरील विनयभंगाचा गुन्हा मागे घेतला जाणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content