Homeटॉप स्टोरीउद्धव ठाकरे यांचा...

उद्धव ठाकरे यांचा सदस्यत्वाचा घोषित राजीनामा खिशातच!

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर आता विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटात रस्सीखेच सुरू झाली आहे. दरम्यान, याच साऱ्या गडबडीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सव्वा महिन्यापूर्वी घोषित केलेला विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा प्रत्यक्षात दिलाच नसल्याचे उघड झाले आहे. फडणवीस सरकारमध्ये असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी जसे आपापले राजीनामे सरकार जाईपर्यंत खिशातच ठेवले होते तसाच उद्धव ठाकरे यांनी आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा घोषित केलेला राजीनामा खिशातच ठेवल्याचे बोलले जाते.

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने भारतीय जनता पार्टीची कास धरण्यासाठी उठाव केल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या आदेशानुसार विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाता २९ जूनला फेसबुक लाईव्हवरून जनतेला केलेल्या संबोधनात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते. याचवेळी त्यांनी आपण विधान परिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देत असल्याचे घोषित केले होते. या संबोधनानंतर ठाकरे यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपविला. मात्र, त्यानंतर आजपर्यंत त्यांनी आपला विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामाच परिषदेकडे पाठविला नाही. १४ मे २०२० रोजी विधानसभा सदस्यांकडून ठाकरे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेले होते. १३ मे २०२६पर्यंत त्यांच्या सदस्यत्वाची मुदत आहे. त्यामुळे ठाकरे यांनी घोषित केल्याप्रमाणे आपला राजीनामा देण्याचा इरादा बदलला की काय, अशी चर्चा राजकीय गोटात सुरू झाली आहे.

सध्या विधान परिषदेला सभापती नाहीत. आधीचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची मुदत संपल्यामुळे हे पद रिक्त झाले आहे. आता सत्तांतर झाल्यामुळे या पदावर कोण जाते हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल. आज शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नेमणूक करण्यात यावी, अशी विनंती उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे करण्यात आली. त्याआधी तीन ऑगस्टला काँग्रेसनेही सभापतींच्या नावे एक पत्र देऊन विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. उपसभापती गोऱ्हे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्याच आहेत. त्यामुळे कोणाकडे हे पद जाते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सध्या विधान परिषदेत भाजपाचे २४, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रत्येकी १०, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे १२ तर अपक्ष व इतर पक्षांचे सहा सदस्य आहेत. यामध्ये विरोधकांमध्ये कोणता पक्ष कोणती भूमिका घेतो यावर विरोधी पक्षनेतेपदाचे भवितव्य असल्याचे सांगितले जाते.

Continue reading

अमित शाहच आहेत बंगालमधल्या परिवर्तनाचे सूत्रधार!

पश्चिम बंगालमध्ये सरकारे सहजासहजी बदलत नाहीत. जवळपास अर्ध्या शतकापासून, या राज्याच्या राजकारणाची ओळख दीर्घकाळ चाललेल्या एखाद्या पक्षाच्या वर्चस्वामुळेच राहिली आहे. स्वातंत्र्यानंतर म्हणजेच १९४७पासून तेथे काँग्रेसची राजवट होती. १९७७पासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प. बंगालमध्ये ३४ वर्षे राज्य केले. त्यानंतर २०११मध्ये...

ओss जादूगर…

ए जादूगर.. तेरे नयना.. दिल जाएगा बच के कहाँ?... संजीव कुमार आणि वहिदा रहमान यांचे १९७१मधल्या मनमंदिर, चित्रपटातले सदाबहार गीत आजही प्रत्येकाला भुरळ घालते. या गीताचीच परवा आठवण झाली, जेव्हा लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देश्यून...

राजीनाम्याची हूल देणाऱ्या ठाकरेंच्या आमदारकीला आज निरोप!

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर २०२२मध्ये शिंदेंबरोबर जाणाऱ्या शिवसेनेतल्या आमदारांना तसेच शिवसैनिकांना रोखण्याकरीता तेव्हाच्या अखंड शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा तसेच विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याची भावनात्मक घोषणा केली. त्यानंतर ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र,...
Skip to content