Homeडेली पल्सखोटे बोलत उद्धव...

खोटे बोलत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले….

मला मुख्यमंत्री करायचे नव्हते म्हणून उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादीचा माझ्या नावाला विरोध होता, असे खोटे कारण त्यांनी सांगितले. शरद पवारांनी आग्रह धरल्याने आपण मुख्यमंत्री झालो, असेही उद्धव ठाकरे सांगत आहेत. पण राष्ट्रवादीचा तुमच्या नावाला कधीच विरोध नव्हता, असे मला स्वतः अजित पवार यांनीच सांगितले होते, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी आज विधानसभेत केला.  

मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी तब्बल ७४ मिनिटे तुफान फटकेबाजी करत सर्व विरोधकांची तोंडे तर बंद केलीच पण तब्बल १०६ आमदारांचा पक्ष असलेल्या भाजपालाही प्रसंगी चिमटे काढायला कमी केले नाही. त्यामुळे सोमवारी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून ते चार वाजून वीस मिनिटांपर्यंत ७४ मिनिटांच्या त्यांच्या भाषणानंतर शिवसेनेत ते भूकंप का घडवू शकले, याचं उत्तर संपूर्ण महाराष्ट्राला मिळालं असेल.

शिवसेना हिन्दुत्वापासून दूर गेल्याने उठाव करावा लागला आणि त्यातून आमचीच खरी शिवसेना असल्याचे आता सिद्ध झाले आहे, हे सांगताना त्यांनी पक्षनेतृत्त्व म्हणजेच उद्धव ठाकरे पक्षातल्या बंडाळीला कारणीभूत असल्याचा आरोपही शिन्दे यांनी केला. एकीकडे चर्चेला प्रतिनिधी पाठवायचे आणि दुसरीकडे गटनेतेपदावरून हकालपट्टी करायची, घरावर हल्ले करायला लावायचे आणि आम्हाला असभ्य भाषेत शिव्या द्यायच्या, हे जास्त काळ खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

उद्धव

आपल्यासमवेत आलेल्या आमदारांची संभावना डुकरे, रेडे अशी करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टीका करून मुख्यमंत्री शिन्दे म्हणाले की, आसामच्या कामाख्या देवीला बळी द्यायला चाळीस रेडे पाठवले आहेत, अशी भाषा केली गेली. पण आज काय स्थिती आहे. बळी कोणाचा गेलाय? कामाख्यादेवीलाही असं बोलणारा रेडा नकोय… आपण वा आपल्यासमवेत गेलेल्या कोणाही आमदाराने कधीच असभ्य भाषा वापरली नाही. एकनाथ शिन्देच्या घरावर दगडफेक करणारा जन्माला आला नाही, असंही मुख्यमंत्री शिन्दे म्हणाले.

माझे कार्यकर्ते मधमाशांचे मोहोळ उठते तसे उठतील आणि मधमाशा डसतात तसे चावे घेऊन तुम्हाला संपवून टाकतील. कारण ३५ वर्षे जिवाचं रान करून मी शिवसेना वाढवलीय, त्यासाठी रक्ताचे पाणी केलेय. माझे उठाव करण्याचे कारण सुनील प्रभूंनाही माहीत आहे, विरोधी पक्षातल्यांनाही माहीत आहे. हा एक दिवसात बसलेला धक्का नाही. माझी क्षमता असतानाही मला केवळ राष्ट्रवादीचा विरोध आहे म्हणून २०१९च्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री केले नाही, असे उद्धव ठाकरे सांगत होते. पण हे धादान्त खोटे आहे. कारण गेल्या अडीच वर्षांत अजित पवार यांनी मला एकदा स्पष्टपणे सांगितले की राष्ट्रवादीचा असा विरोध नव्हता, असेही ते म्हणाले.

माझे पक्षात खच्चीकरण केले जात होते म्हणून आणि सर्व आमदारांना पुन्हा निवडून येण्याबद्दल साशंकता होती, म्हणूनच हे बंड करावे लागले. मी शहीद झालो तरी चालेल पण तुमची आमदारकी अडचणीत येऊ देणार नाही, असे मी सर्व आमदारांना सांगितले होते आणि माझे बंड फसले तर मी जगाचा निरोप घेईन, या टोकाला मी गेलो होतो, असेही शिन्दे यांनी सांगितले.

विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मंजूर झालाय आणि नवे सरकार आज तरी स्थिर झालेय. न्यायालयात काय होईल ते होईल पण शिवसेनेत सारं काही आलबेल नाही, हे लोकांसमोर आलेय. त्यातून शिवसेनेने धडा घेतला किंवा नाही घेतला तरी इतर सर्वांच्या डोळ्यात मात्र हे बंड अंजन घालणारेच ठरले आहे.

Continue reading

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....

वाटाणा वाटाणा पे लिखा है `खाने’वाले का…

वाटाण्यावाटाण्यात काय फरक असणार, असे कोणी विचारले तर हा प्रश्न निरर्थक मानू नका. हिरव्या आणि पांढऱ्या वाटाण्यात फरक असतो आणि या फरकातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही सरकारवर होऊ शकतो, हे मंगळवारी राज्याच्या विधानसभेत दिसून आले. आमदार कैलास घाडगे-पाटील...

मुनगंटीवार वन्स अगेन!

सरकारी काम म्हणजे सहा महिने थांब... असं कायम म्हटलं जातं आणि नेमका त्याचाच अनुभव राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आल्याचे गुरुवारी राज्याच्या विधानसभेत स्पष्ट झाले. सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांनी आपल्या वृद्ध पालकांची तसेच कुटुंबातील दिव्यांग व्यक्तींची जबाबदारी घ्यावी, याची...
Skip to content