मूळ शिवसेना कोणाची किंवा व्हिप कोणाचा लागू होणार, या प्रश्नांपेक्षाही विधानसभेच्या अधिवेशनात आज मतदानाच्या वेळी सर्वाधिक हिट होते ते शहाजी बापू पाटील…. गेल्या काही दिवसात बंडखोर आमदार महाराष्ट्राबाहेर असताना काय झाडी, काय हाटिल…. हे त्यांच्या आवाजातले संवाद महाराष्ट्रभर नव्हे तर जगभर गाजले होते. शिरगणतीने मतमोजणी होताना शहाजी बापू पाटील यांनी स्वतःचे नाव आणि अनुक्रमांक जाहीरपणे सांगितले, तेव्हा विरोधी बाकांवरून काय झाडी… अशी हाळी देण्यात आली आणि संपूर्ण सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.
तशीच गोष्ट बंडखोर गटात सहभागी झालेल्या आमदार यामिनी जाधव यांच्या मतदानाच्या वेळीही झाली. यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव हे त्यांच्या मालमत्त्तांवरील धाडींमुळे चर्चेत होते. त्यांनी मातोश्रीला या शीर्षाखाली महागड्या भेटवस्तू दिल्याचे वृत्तही काही महिन्यांपूर्वी प्रसारित झाले होते. तो संदर्भ घेऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेससह मूळ शिवसेनेच्या आमदारांनी यामिनी जाधव आपले नाव मतदार म्हणून जाहीर करत असताना काय ईडी… अशा आरोळ्या ठोकल्या.

मूळ शिवसेना कोणाची आणि पक्षादेश मानायचा तो कोणत्या व्हिपचा किंवा प्रतोदाचा, हाच विधानसभेच्या दोन दिवसांच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी चर्चिला गेलेला विषय होता. शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांनी पक्षादेश जारी केला तसाच तो बंडखोरांच्या गटाचे एकनाथ शिन्दे यांनी नेमेलेले प्रतोद भरत गोगावले यांनीही जारी केला. त्यामुळे आपल्या पक्षादेशाचे उल्लंघन झाल्याचे पत्र या दोघांनीही पीठासीन अधिकाऱ्यांना दिले. अर्थातच, सुनील प्रभू यांनी ते पत्र विधानसभाध्यक्षांच्या निवडणुकीच्या वेळी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिले तर गोगावले यांनी ते नवनियुक्त अध्यक्ष नार्वेकर यांना दिले.
मूळ शिवसेना कोणाची, याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयातच लागेल, अशी चिन्हं आहेत. कारण, आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात ११ जुलैला होणार आहे.
जावई हा सासऱ्याच्या राशीतला दशमग्रह असतो, असं महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे लेखक पु. ल. देशपांडे यांनी म्हटले होते. त्याचा हवाला देऊन विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहूल नार्वेकर यांचे मात्र आपले सासरे आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर प्रेम आहे, असे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सांगितले. त्यावर राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी उपहासात्मक टिप्पणी करत सांगितले की, जावई-सासरे यांचे प्रेमसंबंध किमान वर्षभर तरी राहवेत म्हणजे जावई हा सासऱ्याच्या राशीतला दशमग्रह असतो, हे भविष्य खोटं ठरेल. त्यावरही सभागृहाने हास्यकल्लोळाने दाद दिली.

