Homeटॉप स्टोरीविधानसभेच्या अध्यक्षांसाठी शिवसेनेचे...

विधानसभेच्या अध्यक्षांसाठी शिवसेनेचे ठाकरे-शिंदे गट आमनेसामने!

राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी उद्या निवडणूक होत असून यामध्ये सत्ताधारी युतीतर्फे भारतीय जनता पार्टीचे राहुल नार्वेकर आणि विरोधी महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात सरळ लढत होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवेसेनेच्या दोन्ही गटाकडून व्हीप जारी करण्यात आला असून यातील कोणाचा व्हीप सर्वोच्च न्यायालयाला मान्य होतो हे पाहणे रंजक ठरणार आहे. मात्र, या व्हीपवरून उद्या सभागृहातही गदारोळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्य विधानसभेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन येत्या रविवार आणि सोमवारी होत असून त्यात विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक आणि सरकारच्या बहुमताची चाचणी होणार आहे. उद्या विधानसभेच्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर बहुमताची चाचणी होणार आहे. सत्ताधाऱ्यांकडून राहुल नार्वेकर यांनी काल आपला उमेदवारीअर्ज दाखल केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आदी नेते यावेळी उपस्थित होते. आज महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राजन साळवी यांनी विधानभवनात जाऊन आपला उमेदवारीअर्ज दाखल केला. त्यामुळे आता राहुल नार्वेकर विरुद्ध राजन साळवी अशी थेट लढत होणार आहे.

आज शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या आमदारांना भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान करण्याबाबतचा पक्षादेश (व्हीप) जारी केला. त्यापाठोपाठ शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनीही शिवसेनेच्या आमदारांनी त्यांच्या गटाचे उमेदवार राजन साळवी यांना मतदान करण्याचा पक्षादेश (व्हीप) शिवसेनेच्या आमदारांसाठी जारी केला. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांना परस्परविरोधी गटांकडून वेगवेगळे पक्षादेश दिले गेल्यामुळे या आमदारांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या कोणत्या गटाला मान्यता मिळते हे अजून निश्चित व्हायचे आहे. येत्या ११ तारखेला यावर निर्णय येण्याची शक्यता आहे. तोपर्यंत उद्या शिवसेनेच्या कोणत्या गटाचीही सरशी झाली तरी ती अंतीम मानता येणार नाही. ही निवडणूक आवाजी मतदानाने होणार की गुप्त पद्धतीने याकडेही साऱ्यांचे लक्ष लागले आहे. याआधीच्या सरकारने अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी पद्धतीने करण्याबाबतचा निर्णय घेतला होता. त्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मान्यता न दिल्याने गेल्या दोन वर्षांपासून हे पद रिक्त आहे. त्यामुळे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत आहेत.

शिंदे-फडणवीस यांनी केले मार्गदर्शन

दरम्यान, काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा गोव्याकडे प्रयाण केले. तेथे ताज कन्व्हेन्शन हॉटेलमध्ये त्यांनी त्यांच्या गटातल्या आमदारांची भेट घेतली. आज त्यांनी या आमदारांची एक दीर्घ बैठक घेतली. त्या बैठकीत अध्यक्षपदाची निवडणूक, बहुमत चाचणी तसेच मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा झाल्याचे कळते. दुपारनंतर शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली हे सर्व आमदार मुंबईला रवाना झाले. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर अत्यंत कडक सुरक्षाव्यवस्थेत त्यांना कुलाब्याच्या ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये नेण्यात येत आहे. भाजपा आमदार तेथेच मुक्कामाला आहेत. तेथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही पक्षांच्या आमदारांच्या संयुक्त बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. याच हॉटेलमधून हे सारे आमदार उद्या विधान भवनात जाणार आहेत.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content