Homeटॉप स्टोरी‘अस्थिर’ सरकारच्या कारभारात...

‘अस्थिर’ सरकारच्या कारभारात राज्यपालांचा हस्तक्षेप?

राज्यातील अस्थिर राजकीय स्थिती आणि त्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून घेतले जात असलेले अंधाधूंद निर्णय, त्यांचे जारी होत असलेले जीआर लक्षात घेता त्यात तातडीने हस्तक्षेप करावा, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केल्याने आता साऱ्यांचे लक्ष राज्यपालांच्या भूमिकेकडे लागले आहे.

आज सकाळी एका पत्राद्वारे दरेकर यांनी राज्यपालांचे लक्ष या विषयाकडे वेधले. राज्यातील राजकीय स्थिती गेल्या तीन दिवसांत प्रचंड अस्थिरतेची बनली आहे. शिवसेनेत मोठ्या प्रमाणात बंडाळी झाल्याने आणि त्यानंतर स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची मनिषा जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थानसुद्धा त्यांनी रिक्त केल्याचे कळले आहे. अशात राज्य सरकारतर्फे अंधाधुंद पद्धतीने शासकीय आदेश (जीआर) काढून निर्णयसपाटा राबविला जात आहे. कधी नव्हे इतके महाविकास आघाडीचे सरकार निर्णय घ्यायला लागले आहे. गेल्या ४८ तासांत १६०च्या वर शासनआदेश जारी करण्यात आले आहेत. विकास प्रकल्पांच्या नावाखाली होत असलेला हा प्रकार संशय वाढविणारा आहे. त्यामुळे या गंभीर आणि संशयास्पद परिस्थितीत आपण तातडीने लक्ष घालावे, अशी विनंती दरेकर यांनी केली आहे.

सरकार बहुमतात असल्याने निर्णय घेण्याचा अधिकार

गुवाहटीला जे आमदार गेले आहेत ते शिवसेनेचे आहोत, असे सांगत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष मिळून बहुमत आहेच. शिवाय ते शिवसेनेचे आहेत तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच त्यांचे नेते आहेत. सरकारचा पाठिंबा कुणी काढून घेतलेला नाही. त्यामुळे सरकार अजूनही अस्तित्त्वात आहे. कामकाज सुरू आहे. त्यामुळे निर्णय तर घेतले जाणारच, असे मत उपमुख्यमंत्री अजित पावर यांनी व्यक्त केले.

अजून अधिकृतपणे सरकारचा पाठिंबा कुणी काढून घेतलेला नाही. प्रसारमाध्यमातून येणाऱ्या बातम्यांचा परिणाम सरकारवर होण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे असे चित्र नाही. काही आमदार गुवाहटीला गेले आहेत यापेक्षा त्याला वेगळे काही महत्त्व नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

झिरवाळ यांना अधिकारच नाही

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात दोन दिवसांपूर्वीच अविश्वास प्रस्ताव आणला आहे. त्यामुळे सदस्यांना अपात्र ठरवण्याचा त्यांना अधिकार नसल्याचे पत्र आज दोघा अपक्ष आमदारांनी विधानसभा सचिवांना पाठवले आहे. महेश बालदी आणि विनोद अग्रवाल अशी या दोन आमदारांची नावे असून ते भारतीय जनता पार्टीच्या गोटातील असल्याचे समजते.

दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या गटाने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यानंतर आता दोन अपक्षांनी हे पत्र लिहिले असून त्यांनी या पत्रात सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्यांचा संदर्भ दिला आहे. एखाद्या विधानसभा अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांविरोधात जर अविश्वास प्रस्ताव आणला गेला असेल तर त्यांना सदस्यांच्या अपात्रतेविरोधात कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नाही असे या पत्रात नमूद केले आहे. असा निर्णय घेण्याआधी अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांना या प्रस्तावाला सामोरे जावे लागते आणि त्यानंतरच त्यांना सदस्यांच्या अपात्रतेविषयी निर्णय घेण्याचा अधिकार असतो. विधानसभा नियम १६९अन्वये उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेला असून त्यामुळे त्यांना आता आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेता येणार नाही असे या पत्रात म्हटले आहे.

दिलीप लांडेही शिंदे यांच्या गटात

दरम्यान, आज शिवसेनेचे आणखी एक आमदार दिलीप लांडेही एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले. सूरतमार्गे ते गुवाहटीला दाखल झाले. त्यामुळे शिंदे यांच्या गटाला आणखी मजबुती आली आहे. कोल्हापूरचे माजी आमदार राजेश क्षीरसागरही तेथे पोहोचले आहेत. दरम्यान, शिवसेनेने काल एकनाथ शिंदे यांच्यासह १२ आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी झिरवाळ यांच्याकडे केली. त्यापाठोपाठ आज आणखी पाच आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि निदर्शने

दरम्यान, शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून दिवसभर शिवसेनेचे जिल्हा, तालुका, जिल्हासंपर्क प्रमुखांच्या बैठका घेतल्या गेल्या. त्याच माध्यमातून राज्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद टिकवून ठेवण्याचा प्रयत्न आजही चालूच होता. परिणामी मुंबईत दिलीप लांडे, सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर यांच्या कार्यावर शिवसैनिकांनी हल्ले करून त्यांची तोडफोड केली. मातोश्री तसेच सेनाभवनाबाहेर जमलेल्या शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली.

शरद पवार मातोश्रीवर

दरम्यान, आज संध्याकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मातोश्रीवर जाऊन उद् ठाकरे यांच्याविरूद्ध पुकारण्यात आलेले बंड कसे मोडून काढायचे यावर दीड तास चर्चा केली. त्यानंतर ठाकरे यांनी पक्षातल्या खासदारांचीही बैठक घेतली.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content