Homeटॉप स्टोरीबहुमत टिकवण्याचे महाविकास...

बहुमत टिकवण्याचे महाविकास आघाडीसमोर आव्हान!

राज्य विधान परिषदेच्या दहा जागांसाठी उद्या मतदान होत असून सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीसमोर आपले बहुमत टिकवताना आपल्या सहाव्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आव्हान आहे. त्याचवेळी राज्यसभा निवडणुकीप्रमाणे विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टी आपला पाचवा उमेदवार निवडून आणत सत्ताधाऱ्यांना दणका देणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

राज्य विधानसभा सदस्यांकडून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या १० जागांसाठी येत्या २० तारखेला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महाविकास आघाडी तसेच विरोधी भाजपाने आपापल्या आमदारांना शनिवारी मुंबईत बोलावून घेतले. परंतु आघाडीचेच नेते लहानलहान पक्ष तसेच अपक्ष आमदारांशी परस्पर संपर्क साधत असल्यामुळे तसेच ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होत असल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी शुक्रवारीच आपल्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावले. त्यांची रवानगी थेट पवईच्या वेस्ट इन हॉटेलमध्ये करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या आमदारांची राहण्याची व्यवस्था नरीमन पॉईंटच्या हॉटेल ट्रायडंटमध्ये केली आहे. भाजपानेही आपल्या आमदारांना कुलाब्याच्या हॉटेल ताज प्रेसिडेन्सीमध्ये उतरवले आहे. काँग्रेसचे आमदार फोर सिझन हॉटेलमध्ये उतरले आहेत.

आज संध्याकाळी भाजपा नेते दोवेंद्र फडणवीस हॉटेल ताजमध्ये पोहोचले. तेथे त्यांनी आपल्या सर्व समर्थक आमदारांची भेट घेतली. त्यांच्या स्वागतासाठी भाजपाचे उमेदवार प्रसाद लाड, चंद्रशेखर बावनकुळे तसेच किरीट सोमय्या होते. हॉटेलमध्ये त्यांनी आमदारांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शनही केले.

शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी हॉटेल वेस्ट इनला भेट देऊन तेथून पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त भाषण केले. आपल्या समर्थक आमदारांना त्यांनी स्वतंत्र मार्गदर्शनही केले. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी या आमदारांकडून मतदानाची रंगीत तालीमही करवली. राज्यसभा निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरल्यामुळे शिवसेनेला मोठा फटका बसला होता. तसा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून ही तालीम घेतली गेली.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार तसेच जयंत पाटील यांनी ट्रायडंट हॉटेलमध्ये आपल्या आमदारांना मार्गदर्शन केले. तसेच मार्गदर्शन नाना पटोले, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या काँग्रेस नेत्यांनी फोर सिझनमध्ये आपल्या आमदारांना केले. यानंतर काँग्रेसचे काही नेते ट्रायडंटमध्ये अजित पवार यांना भेटण्यासाठी गेले. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, सुनील केदार तसेच सतेज पाटील यांचा यात समावेश होता. अजितदादांबरोबर समन्वय राखत मतदानाचे डावपेच आखण्याबद्दल चर्चा केल्यानंतर हे नेते तेथून निघाले. संध्याकाळी काँग्रेसच्या नेते मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबरोबरही मतदानाच्या व्यूहरचनेबद्दल चर्चा करणार आहेत. त्यानंतर रात्री काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आपसातही चर्चा होणार आहे.

दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे यांनी बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांची विरारला जाऊन भेट घेतली. एमआयएमचे आमदार फारूख शाह यांनी ट्रायडंटमध्ये जाऊन अजित पवार यांची भेट घेतली आणि आपले मत एकनाथ खडसे यांना देणार असल्याचे जाहीर केले.

महाराष्ट्र विधान परिषदेतून ६ ते २१ जुलै २०२२ या कालावधीदरम्यान निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागा भरण्यासाठी ही निवडणूक होणार आहे. सदाशिव खोत, सुजितसिंग ठाकूर, प्रवीण दरेकर, सुभाष देसाई, रामराजे नाईक-निंबाळकर, संजय दौंड, विनायक मेटे, प्रसाद लाड, दिवाकर रावते यांचा संपल्यामुळे वा संपणार असल्याने ही निवडणूक होत आहे.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content