ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आलेले कवी विंदा करंदीकर यांच्या कवितांना चांगले दिवस आले आहेत किंवा महाराष्ट्राचे राजकारण वेगळ्याच दिशेने चालले आहे, असे म्हणावे लागेल. विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी या महाविकास आघाडी सरकारचे काम कसे चालले आहे, तर पुन्हा पुन्हा तेच ते, या कवितेचा आधार घेत सांगितले. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विंदा करंदीकर यांच्याच कवितेचा आधार घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही विंदा करंदीकर यांच्याच उपयोग काय झाला… या कवितेचा आधार घेतला. विधानसभेतले प्रत्यक्ष कामकाज आणि संपूर्ण विधानसभा अधिवेशनाच्या शेवटीदेखील सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने विचार केला तर पुन्हा पुन्हा तेच ते… आणि उपयोग काय झाला… याच ओळी मनात येतात.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे मुख्य कामकाज असते ते अर्थसंकल्प मंजूर करून घेण्याचे. त्याशिवाय १७ विधेयकेही मंजूर झाली. म्हणजे कायदे करण्यात आले. त्यामुळे जनतेच्या हाती काहीच लागत नाही, असे नक्कीच नाही. पण, हे कामकाज केलं जात असतानाच राज्याच्या विविध भागातले प्रश्नही आमदारमंडळी विविध संवैधानिक आयुधांद्वारे मांडत असतात आणि त्यातून त्या प्रश्नांची तडही लागत असते. तरीदेखील अधिवेशनाचे सूप वाजल्यावर अधिवेशनात घेतले जाणारे राजकीय अभिनिवेश बघितल्यानंतर कामकाज कमी आणि राजकारण जास्त, असेच त्याचे स्वरूप होत चालल्याचे जाणवते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ४७ मिनिटांचे भाषण अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, शुक्रवारी केले. त्यात त्यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेत विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांना बगल दिली. पण राजकीय स्वरूपाचे भाषण करत केंद्राच्या तपासयंत्रणा वापरून आमच्या नातेवाईकांना त्रास देणं म्हणजे महाभारतातल्या शिखंडीसारखं लढणं आहे, अशी टीका विरोधकांवर केली. त्यावर राईट टू रिप्लायद्वारे पुन्हा भाषण करताना फडणवीस यांनी प्रतिहल्ला चढवला. कपटाने राज्य कौरवांनी मिळवले होते, पांडवांनी नाही, असे सांगून फडणवीस म्हणाले की, कौरवांनी कपट केले तरी अर्जुन डगमगला नाही आणि लढाईला सिद्ध झाला. तसेच आम्हीही लढू…

या अधिवेशनाच्या तोंडावर राज्य सरकारचे मंत्री नवाब मलिक गजाआड गेले आणि झुकेगा नही साला… म्हणत माध्यमांना प्रतिक्रिया देणाऱ्या मलिक यांना आपली दोन्ही खाती गमवावी लागली आहेत. ते अजूनही बिनखात्याचे का होईना, पण मंत्री आहेत आणि त्यालाच विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. हे अधिवेशन पार पडले आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणातून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे रणशिंगच फुंकले आहे. त्यांच्या मेव्हण्यावर झालेल्या कारवाईनंतर आपण दबून गेलेलो नाही आणि आपण लढायला सिद्ध आहोत, हाच संदेश त्यांनी शिवसैनिकांना दिलेला आहे. त्यामुळेच बाकी सगळे शेपट्या घालत असताना शिवसैनिकांनी मुंबई वाचवली आहे, हे विधानसभेत सांगून त्यांनी पालिकेची प्रचारमोहीमच जणू सुरू केली. आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईत तरी केंद्रीय तपासयंत्रणांच्या कारवाया आणि मुंबई वाचवायची तर शिवसेनाच हवी, या मुद्द्यावरच शिवसेनेचा भर राहील, हे मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून स्पष्टपणे जाणवले.
अधिवेशन संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलण्याच्या ओघात राजकारणात कोणीही कोणाचे कायमचे मित्र आणि शत्रू नसतात, असे वाक्य वापरले. मात्र, त्यावर स्पष्टीकरण विचारले असता त्यांनी १९९०पासूनचा इतिहास सांगितला. पण सध्याच्या मित्र किंवा शत्रूंबद्दल काहीही टिप्पणी केली नाही. त्याबरोबरच पत्रकारांना हात जोडून माझ्या वक्तव्याचा काही वेगळा अर्थ काढू नका, अशी हसतहसत टिप्पणीही पवार यांनी केली.
या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी आठ मिनिटे भाषण केले आणि शुक्रवारी ४७ मिनिटे. पण, या भाषणाने एक मात्र नक्की झालंय की, किमान आतातरी भाजपाचे नेते महाविकास आघाडीचे सरकार पडण्याचा मुहूर्त देणार नाहीत, असे वाटते. त्याबरोबरच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे अभिभाषण सुरू झाल्यावर विरोधकांनी ते ऐकून घेतले नाही, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर केला. पण राज्यपालांच्या भाषणाच्या वेळी सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंकडून घोषणाबाजी केली गेली होती. त्यामुळे कदाचित राज्यपालांशी सुरू असलेला राज्य सरकारचा संघर्ष कदाचित कमी होण्याची शक्यता आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्याबद्दल निःसंदिग्ध शब्दांत स्पष्टीकरण दिले. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक राज्यपालांच्या परवानगीविना घ्यायची नाही, असे सरकारचे ठरले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
अधिवेशनाचे सूप वाजले… आता पुन्हा पुन्हा तेच ते…. पावसाळा आला की गटारे तुंबणार, मुंबईत खड्डे, कमरेइतके पाणी आणि पुन्हा नालेसफाई, मग ब्रिम्स्टोवॅड वगैरे.. योजनांचे आकडे आणि आरोप-प्रत्यारोप… सर्वसामान्य नागरिकांसाठी हाती काय उरते? तर, एकच प्रश्न… उपयोग काय झाला!!

