Homeमाय व्हॉईसपुन्हा एक पेनड्राइव्ह...

पुन्हा एक पेनड्राइव्ह आणि खळबळ…

महाराष्ट्राच्या विधानसभेत आता कुणी चांगल्या कामाचा पेनड्राइव्ह देतो, असे म्हटले तरी वातावरण गंभीर होऊन जाते. प्रत्येक अधिवेशनात सरकारला डिफेन्सिव्ह व्हायला लावणारे विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी गुरुवारी अंतिम आठवडा प्रस्तावावर भाषण करताना महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका करत हे सरकार म्हणजे महाविनाश आघाडी किंवा मद्यविक्री आघाडी आहे, असे वर्णन केले. मात्र, ३ तारखेला सुरू झालेल्या अधिवेशनात तीन आठवड्यात फडणवीस यांनी पेनड्राइव्ह सादर करून सभागृहात आणि राज्यात खळबळ उडवून दिली. त्यांनी कालही एक पेनड्राइव्ह देतो, अशी घोषणा केली आणि हा पेनड्राइव्ह गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हवाली केला.

मुंबई पोलीस दलातले पहिले एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त इसाक बागवान यांच्यासंदर्भातील पेनड्राइव्ह फडणवीस यांनी गृहमंत्र्यांकडे सोपवला. या पेनड्राइव्हचे फॉरेन्सिक विश्लेषण करून घेतलेले नसल्याने आपण कोणाचेही नाव घेऊन याप्रकरणी आरोप करणार नाही, असे सांगून फडणवीस म्हणाले की, या इसाक बागवान यांच्या जमीन व्यवहारांसंदर्भातील माहिती या पेनड्राइव्हमधल्या संवादातून मिळते. तसेच, अनेक व्यक्तींसंदर्भातले संवाद दाऊद इब्राहिमच्या टोळीशी संबंधित लोकांशी असलेल्या व्यवहारांकडे निर्देश करतात. या व्यवहारात मुंबईतील एका राजकीय नेत्याने मध्यस्थी केल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.

दाऊद इब्राहिमसाठी हवालाद्वारे पैसे घेऊन बँकेतली खाती हॅक करून जम्मू-काश्मीरमध्ये पैसे काढले जातात आणि त्यांचा वापर राष्ट्रविरोधी कामांसाठी केला जातो, या त्यांच्या आरोपाने आज पुन्हा एकदा विधानसभेत खळबळ माजली. ही तीनशे जणांची गँग असून ती आठ राज्यांत गुन्हे करत आहे आणि पुण्यातल्या पोलिसांनी त्यांचा छडा लावला. पण ती फाइल क्लोज करण्यात आली आहे. ती कोणाच्या सांगण्यावरून आणि हा तपास कोणाच्या सांगण्यावरून संथ केला गेला, असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला. तुम्ही इतकं सगळं शोधून काढलंय तर कुणाच्या सांगण्यावरून हे झालं, हेही सांगा, अशी टिप्पणी अजित पवार यांनी आसनावर बसूनच केली. (जागेवर बसून बोललेल्या गोष्टी किंवा मुद्दे कामकाजाचा भाग होत नाहीत.) त्यावर फडणवीस यांनी अजित पवार यांना सांगितले, अहो दादा, या गोष्टी आपल्याला माहीत असतात. पण, सभागृहात सांगता येत नाहीत. मला माहीत आहे, मी तुम्हाला खासगीत ते नाव सागेन. त्यांनी असे उत्तर देताच सभागृहात हंशा उसळला आणि त्यात अजित पवारांसह सगळेच सदस्य सहभागी झाले.

पेनड्राइव्ह

या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित पेनड्राइव्ह गृहमंत्र्यांकडे देतो आहे. त्यांनी हा तपास का थांबला याचीही माहिती घ्यावी आणि हे प्रकरण आठ राज्यांशी संबंधित असल्याने ते राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे म्हणजे एनआयएकडे सोपवावे, अशी मागणीही फडणवीस यांनी केली.  

ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आलेले कवी विंदा करंदीकर यांच्या पुन्हा पुन्हा तेच ते, या कवितेचा संदर्भ देऊन सध्याचे महाविकास आघाडीचे सरकार काहीही नवीन योजना करत नाही ना कार्यक्रम, अशी टीका फडणवीस यांनी केली. मुंबई महापालिकेतल्या भ्रष्टाचाराबद्दलची अनेक उदाहरणे देत त्यांनी चौकशीची मागणी केली. महाविकास आघाडी सरकारला मुख्य जनहिताच्या गोष्टींपेक्षा प्राणीसंग्रहालयासारख्या गोष्टीत रस आहे आणि राज्य सरकार असो की मुंबई महापालिका, प्रत्येक विषयात अव्वाच्या सव्वा किंमतीच्या निविदा काढून जनतेच्या पैशाची लूट करण्याचे काम सध्या सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

मुख्यमंत्री बोलले…सभागृहाने ऐकले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पहिलेवहिले भाषण हाही आजच्या कामकाजातला टॉकिंग पॉइंट ठरला. मात्र, त्यांनी नेहमीच्या शैलीत आपल्या सरकारच्या कामाचं गुणगान करीत आपलं सरकार बोलत नाही तर करून दाखवतं, असं सांगितलं. आम्ही काम करतो, नुसते बोलत नाही, असं त्यांनी विरोधकांना सुनावलं. त्यांच्या छोटेखानी भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचं छोटं का होईना, पण भाषण सभागृहात ऐकायला मिळालं, याबद्दल आनंद व्यक्त केला.

मुख्यमंत्री सभागृहात आले आणि बोललेही. पण त्यांनी सांगितले की, प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही, असं सांगून फडणवीस म्हणाले की, आम्हाला आजवर हे माहीतच नव्हतं की, प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही. ते जर आधी समजले असते तर आम्ही गेली पंचवीस वर्षे उगीचच विधानसभेत, महापालिकेत प्रश्न विचारण्यात घालवली नसती. पण, यांचा कारभार बघितला की आम्हाला प्रश्न पडतात, अशा शब्दांत फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर उपहासात्मक टीका केली.

Continue reading

मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोहित पवारांना सुनावले!

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातामध्ये घातपात असला तर त्यात दोषी असलेल्या व्यक्तीला कोणत्याही थराला जाऊन दंडित करू, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत घोषणा केली आणि रोहित पवार यांच्या सर्व आरोपांना सविस्तर उत्तर दिले. अजित पवार...

आदित्य ठाकरेंना नितेश राणे देणार कोल्ड कॉफी!

नारायण राणे आणि त्यांचे मंत्री असलेले चिरंजीव नितेश राणे, हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर कडवट शब्दात टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण, विधानसभेत मंगळवारी कोकणाच्या प्रश्नांवरील चर्चेला उत्तर देताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेत आदरयुक्त उल्लेख...

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....
Skip to content