विधानसभेमध्ये तुलनेने इव्हेन्टफूल नसलेला मंगळवारचा दिवस संध्याकाळी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी केलेल्या व्हिडियो फितींच्या बॉम्बस्फोटांमुळे सरकार पक्षाला हादरवून गेला.
आपल्याकडे सव्वाशे तासांहून जास्त कालावधीचे व्हिडियो क्लिप्स आहेत. त्यातून राज्य सरकार विरोधी पक्षाच्या म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्यासाठीचे षडयंत्र कसे रचते, हे दिसून येतेय आणि हे प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी द्यावे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.
अंमलबजावणी संचालनालयाने कारवाई केलेले राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्या संदर्भात आरोपांची पुनरावृत्ती करत त्यांचा राजीनामा फडणवीस यांनी मागितला. नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्यास तो भाजपाचा नव्हे तर मुंबईच्या नागरिकांचा आणि साऱ्या भारतीयांचा विजय असेल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
मंगळवारी विरोधी पक्षांच्या प्रस्तावावर होणारी चर्चा साडेपाच वाजता सुरू झाली आणि त्याची सुरुवात करताना फडणवीस फार तर मंत्री नवाब मलिक यांच्यावरील आरोपांची पुनरावृत्ती करत हे आरोप अधिकृतपणे विधानसभेच्या पटलावर आणतील, अशी अटकळ होतीच. पण फडणवीस यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच अध्यक्षांकडे एक पेनड्राइव्ह सोपवतोय आणि या पेनड्राइव्हमधील व्हिडियो फिती आता सभागृहाची मालमत्ता झाल्या आहेत, हे सांगून भाषणाला सुरुवात केली.
विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण या व्हिडियो क्लिप्समधे गिरीश महाजन यांच्याविरुद्ध केलेल्या कटकारस्थानाचे नियोजन, त्यांनीच त्यात घेतलेला सहभाग आणि काही नेत्यांची नावे घेत अनेक गोष्टी सांगताना दिसतात. त्याचे स्पष्टीकरण देत फडणवीस यांनी एकापाठोपाठ एक धक्कादायक बाबी विधानसभेच्या पटलावर ठेवल्या आणि सत्तारूढ महाविकास आघाडीचे मंत्र्यांसह सर्व सदस्य सुन्नपणे पिनड्रॉप शांततेत त्यांचं भाषण ऐकताना दिसत होते.
आपल्याकडे इतक्या व्हिडियो क्लीप आहेत की त्यातून किमान २५-३० वेब सीरीज तयार केल्या जाऊ शकतील, इतकी सामुग्री त्यात आहे, असंही फडणवीस यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच सांगितलं. त्याबरोबरच आपण केवळ दोन-तीन महत्त्वाच्या प्रकरणांवर सभागृहात बोलणार असून योग्यवेळी बाकी क्लिप्सही समोर आणू, असा इशाराही फडणवीस यांनी दिलाय. त्याबरोबरच काही क्लिप्समधील आशय तर विधिमंडळाची इभ्रत घालवणारा असल्याने आपण तो सभागृहात मांडत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या प्रत्येक वाक्यागणिक सत्तारूढ महाविकास आघाडीतील गोटात सुरू असलेली सचिंत चलबिचल पत्रकार गॅलरीतून स्पष्टपणे दिसत होती.
सरकारी वकिलानेच एफआयआर लिहून देणे, घटनास्थळी रक्त लावलेला चाकू नेऊन टाकणे, अशा हिन्दी चित्रपटात शोभतील, अशा गोष्टी करून गिरीश महाजन यांना खोट्या प्रकरणात गोवण्यात आलं. त्यामुळेच सकृतदर्शनी पुरावा नसल्याने गिरीश महाजन यांच्यावरील मोक्का लावण्याच्या कारवाईला न्यायालयाने एक मिनिटात स्थगिती दिल्याचंही फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिलं. या संपूर्ण प्रकरणात आणि षडयंत्र रचताना पोलिसांचाही सहभाग असल्याने हे प्रकरण राज्य सरकारने सीबीआयकडे सोपवावं आणि नाही सोपवलं तर आम्ही न्यायालयाचे दरवाजेही ठोठावू, असा इशाराही फडणवीस यांनी दिलाय.
मंत्री नवाब मलिक यांच्या प्रकरणाची माहिती सभागृहाला देताना फडणवीस म्हणाले की, १९९३चे मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट आणि त्यानंतर २००५-०६ आणि २००८ला मुंबईवर झालेला अतिरेक्यांचा हल्ला या सर्वांमधून दाऊद इब्राहिम हा देशाचा शत्रू असल्याचं जाहीरही झालं आहे. त्याने पाकिस्तानमध्ये आश्रय घेतलेला आहे. आपली बहीण हसीना पारकर, भाऊ इब्राहिम कासकर यांच्यामार्फत दाऊदने मुंबईतले रियल इस्टेटच्या क्षेत्रातले आर्थिक व्यवहार सुरू ठेवले. सरदार शाह वली खान आणि सलीम पटेल हे दोघे दाऊदसाठी काम करणारे लोक असून खानने मुंबई स्फोटातले बॉम्ब स्कूटर्समध्ये ठेवले आणि स्कूटर विविक्षित ठिकाणी नेऊन ठेवली. सलीम पटेल हा दाऊदची बहीण हसीना पारकर हिचा फ्रंटमॅन म्हणून काम करत होता. याच सलीम पटेलच्या शेजारी एका ईदच्या कार्यक्रमातला फोटो आला आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची बदनामी झाली होती.
हे सारं माहीत असताना त्याच्याबरोबर आपला फोटो लावून नवाब मलिक यांनी ३ एकर जागेचा लालबहादूर शास्त्री रस्त्यवरील जमिनीचा व्यवहार मूळ मालकाला पैसे न देता किरकोळ, नगण्य किंमतीत केला. त्यात किती पैसे मिळवले गेले, यापेक्षाही या व्यवहारातून सलीम पटेल किंवा शाह वली खान यांना पैसे मिळाले तर ते त्या पैशाचा वापर भारतविरोधी कारवाया करण्यासाठी वापरणार, हे उघड आहे,. असे माहित असूनही मलिक यांनी त्यांच्याशी व्यवहार केला, हे सांगताना फडणवीस यांनी सत्तारूढ पक्षाच्या नेत्यांना प्रश्न केला की, अजितदादा किंवा एकनाथ शिन्देसाहेब तुमच्यापैकी कोणीही हे सगळं माहीत असताना अशा लोकांशी कोणताही व्यवहार केला असतात का?…
हा प्रश्न नवाब मलिक या एका व्यक्तीचा नसून देशाचा आहे आणि देशाच्या शत्रूशी व्यवहार करणारी व्यक्ती महाराष्ट्राची मंत्री म्हणून पदावर राहणार असेल तर इतिहासात हे नक्की लिहिले जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. यापूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासंदर्भात न्यायालयाचे आदेश आल्याआल्या त्यांचा राजीनामा घेतला गेला. वनमंत्री संजय राठोड यांच्याविरुद्ध तर एफआयआर झाला नसतानाही त्यांचा राजीनामा घेतला गेला. पण नवाब मलिक यांचा मात्र घेतला जात नाही आणि त्यातून आपल्याला काही वेगळे संकेत द्यायचेत का, असा सवालही फडणवीस यांनी केला.
एक राज्य म्हणून आपण एकत्रितपणे बसून काही निर्णय घेणार नसू तर तसं करण्याइतके आपण खमके नाही का आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी एकत्र बसून शांतपणे विचार करावा. हे प्रकार आपण सहन करणार असू तर मग मुंबई उद्या अशा लोकांशी मंत्र्यांनी केलेल्या व्यवहारांवरून असुरक्षित झाली तर त्याला आपणच जबाबदार असू, असा इशाराही फडणवीस यांनी दिलाय.
दिवसभर विधिमंडळात असलेली मरगळ फडणवीस यांच्या भाषणानंतर निघून गेली आणि सत्ताधारी पक्षाला जोरदार हादरा बसला. त्यामुळे सभागृहाबाहेर पडल्यावर रोज उत्साहाने टीव्हीवाल्यांना बाईट देणारे नेते नो कॉमेन्ट्स.. असं सांगून जाताना दिसले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फोन टॅपिंग प्रकरणावरून प्रतिकार करण्याचा तुटपुंजा प्रयत्न केला खरा, पण त्यात काही फारसा दम नव्हता, हे नानांच्या आवाजावरूनही लक्षात येत होतं. फडणवीस आणि मी बरोबर काम केलेय, हे सांगून फडणवीस हे कसे नटसम्राट आहेत, अशी उपहासात्मक टीका करण्याचा प्रयत्नही नाना पटोलेंनी केला. पण त्यांना ना उपहास जमला ना टीका. त्यामुळे विधानसभेचं कामकाज संपल्यानंतरही चर्चा होती फडणवीस यांनी टाकलेल्या व्हिडियो बॉम्ब्सचीच!

