दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत या दोघांचीही हत्त्या झाली असून त्याप्रकरणी नव्याने चौकशी होईल. दिशा सालियनला कोणी पार्टीला बोलावले, तिच्यावर बलात्कार कोणी केले, तिचा खून कसा झाला, ती ज्या इमारतीत होती, त्या इमारतीत कोणत्या मंत्र्याची गाडी गेली होती, त्या इमारतीतील सीसीटीव्ही कसे गायब झाले, इमारतीच्या रजीस्टरमधली विशिष्ट पाने कोणी फाडली, दिशाला कोणत्या रूग्णवाहिकेतून नेले, ती कोणी बोलावली होती, तिचा शवविच्छेदन अहवाल अजून का आला नाही, पुरावे नष्ट करण्याचे काम कोणी केले, दिशाचा मित्र रोहन राय कसा गायब झाला, तिच्या हत्त्येबद्दल विचारणा करणाऱ्या सुशांतसिंहची हत्त्या कोणी केली, त्याच्या घरातला मुलगा सावंत कसा गायब झाला, असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे मिळाली पाहिजेत. या सर्व गोष्टींचा तपास करण्याची मागणी आपण संबंधित यंत्रणेकडे केली असून आपल्याकडील सर्व पुरावेही तेथे सादर केले आहेत, असे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले.
मातोश्रीतल्या तिघांना मिळणार नोटीस
मातोश्रीतले तीन आणि एक त्यांचा नातेवाईक, अशा चौघांना ईडीच्या नोटिसा मिळणार असल्याची आपली माहिती आहे. छगन भुजबळ तब्बल अडीच वर्षे तुरूंगात होते. तेच काम यांनी केले आहे. भुजबळ यांचा सीए यांचाही सीए आहे. केलेले कर्म कधीतरी भोगावेच लागते. गेले सव्वादोन वर्षे हे सरकार आहे. काय केले, कोणाच्या आजारपणावर मी बोलणार नाही. आता उभे राहण्यासाठीही दोन-दोन जण लागतात. महाराजांच्या नावावर सूडाचे राजकारण करण्याचा धंदा बंद करा. कधी मंत्रालयात नाही, विधानसभेत नाही, कॅबिनेट मिटींगमध्ये नाही. इतिहासात नोंद होईल, असे यांचे कतृत्त्व. बाळासाहेबांनी आम्हाला घडवले. कोणाचे घर वसवा, उद्ध्वस्त करू नका, असेही ते म्हणाले.
कागदोपत्री १९ बंगले
रश्मी ठाकरे यांचे कागदोपत्री १९ बंगले आहेत. पण, प्रत्यक्षात दिसत नाहीत. हे काय गौडबंगाल आहे, याचा तपास लागला पाहिजे, असे सांगतानाच आदित्य ठाकरे यांनी आधी त्यांच्याकडे असलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी आणि मग राजकीय भाष्य करावे, असेही राणे यांनी सांगितले.

माझ्या बंगल्याचा प्रत्येक इंच अधिकृत
माझ्या घराचे बांधकाम पूर्णपणे अधिकृत असून त्यात नव्याने एका इंचाचेही बांधकाम करण्यात आलेले नाही. इतकेच नव्हे तर या वास्तूचा कोणत्याही पद्धतीने व्यावसायिक वापर केला जात नाही. पूर्णपणे निवासी वापरच होतो, असे नारायण राणे यांनी स्पष्ट केले.
नारायण राणे यांचा जुहू चौपाटीवर अधीश नावाचा बंगला आहे. मुंबई महापालिकेच्या पथकाने काल तेथे जाऊन आतमध्ये कोणतेही अनधिकृत बांधकाम झाले की नाही, याची पाहणी केली. त्यानंतर आज राणे यांनी त्याच बंगल्यात ही पत्रकार परिषद आयोजित केली होती.
बाळासाहेबांच्या हयातीतच आपण हा प्लॉट घेतला होता. देशातले नामांकित आर्किटेक्ट तलाटी यांनी याचे बांधकाम केले. इमारत पूर्ण झाल्यानंतर त्याला मुंबई महापालिकेने पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिले. ऑक्युपेशन सर्टिफिकेट दिले. त्यानंतर १७ सप्टेंबर २००९ रोजी आम्ही येथे राहयला आलो. येथे आम्ही आठ जण राहतो. येथे कोणत्याही स्वरूपाचा व्यावसायिक वापर केला जात नाही. मंजूर आरखड्यानुसार याचे बांधकाम झाले असून त्यानंतर येथे एका इंचाचेही बांधकाम करण्यात आलेले नाही. तरीही आतापर्यंत ४-५ वेळा महापालिकेकडून विचारणा करण्यात आली आहे. बंगला शंभर टक्के कायदेशीर असताना मातोश्रीकडून, शिवसेनेकडून, महापालिकेत त्यांची सत्ता असल्यामुळे केवळ सूडबुद्धीने, दुष्टपणामुळे कोणाला तरी पुढे करून सातत्याने तक्रारी करायच्या आणि पालिकेची पथके तपासणीसाठी पाठवायची, असे उद्योग सुरू आहेत, असे ते म्हणाले.
काल पालिकेने बंगल्याच्या बाहेर नोटीस चिकटवली आणि नंतर पथकाने पाहणी केली. प्रदीप भालेकर नावाच्या एका व्यक्तीने ट्विट करून विनायक राऊत, उदय सामंत आणि वैभव नाईक यांच्या सांगण्यानुसार आपण तक्रारी केल्या. आणि जेव्हा मी तुरूंगात होतो तेव्हा हे ओळख दाखवायला तयार नव्हते. हे तक्रारदाराने केलेले ट्विट आहे. यावरून या लोकांची काय मानसिकता आहे, हे स्पष्ट होते. बाळासाहेबांनी मराठी माणसांसाठी शिवसेना स्थापन केली आणि आताचे प्रमुख मराठी माणसाला उद्ध्वस्त करण्यासाठी काम करत आहे. यांनी मातोश्री-दोन बांधले. त्याचे अनधिकृत बांधकाम फडणवीस यांचे सरकार असताना पैसे भरून नियमित करून घेतले. सगळे नकाशे आपल्याकडे आहेत. पण आम्ही कधी बोललो नाही. कारण, कोणाच्या पोटावर, घरावर मारणे, अशी कामे आम्ही करत नाही, असेही राणे यांनी स्पष्ट केले.
राणे यांच्या ट्विटचा विषय संसदेत – राऊत
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करून मातोश्रीला ईडीच्या नोटिसा मिळणार असल्याचे जाहीर केले आहे. याचाच अर्थ ईडीचे काही अधिकारी राणे यांना मिळाले आहेत किंवा त्यांनी संबंधित कागदपत्रे ईडीमधून चोरली आहेत. ईडीच्या नावाने एखादा केंद्रीय मंत्री जाहीरपणे कशी धमकी देऊ शकतो, असा सवाल करत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी हा विषय आपण संसदेत उपस्थित करणार असल्याचे एका पत्रकार परिषदेत सांगितले.
महिला आयोगाने कारवाई करावी- महापौर पेडणेकर
दिशा सालियन हिची मृत्यूनंतरही प्रतारणा केली जात असल्याबद्दल राज्य महिला आयोगाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावेळी केली.

