Details
मोदींचा रोख पवारांवरच का?
01-Jul-2019
”
अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
देशात काँग्रेसच्या विरोधात मोठी लढाई सुरू असताना महाराष्ट्रात मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्याच बरोबर खरी चुरस आहे अशी खुणगाठ भारतीय जनता पक्षाने बांधलेली दिसते. कारण महाराष्ट्रातील मतदानाची दुसरी फेरी संपन्न होत असताना आणि पुढच्या दोन फेऱ्यांसाठी मतदार तयार होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेचा मुख्य रोख शरद पवार व त्यांचे कुटुंबीय हाच आहे असे दिसते. महाराष्ट्रातील पहिली जाहीर सभा पंतप्रधानांनी वर्धा मतदारसंघात घेतली तेव्हापासून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावरच टीकेचे तीक्ष्ण बाण सोडले आहेत. शरद पवारांचे देशातली कर्तृत्त्व मोठे आहे. पण महाराष्ट्र गाजवून नंतरच ते दिल्लीत पोहोचलेले आहेत. इथे तालुक्यातालुक्यातच नव्हे, तर गावागावात शरद पवारांना मानणारे कार्यकर्ते आहेत, जनता आहे. पण नाव व नेतृत्त्व मोठे असूनही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र निवडणुकांमध्ये यश सातत्याने हुलकावण्या देत राहिले आहे.
देशात राजकीय अस्थिरता असताना पंतप्रधानपदाचे स्वप्न त्यांनी पाहिले. जर देवेगौडांसारखा मोजक्या खासदारांचा नेता पंतप्रधानपदावर आरूढ होऊ शकतो, कशात काही नसताना गुजराल जर पंतप्रधान होऊ शकतात तर मग शरद पवार का नाही होणार पंतप्रधान? हा त्यांच्या पाठीराख्यांचा नेहमीचाच सवाल असतो. पवारांना देशाचे नेतृत्त्व करण्याची जबाबदारी नक्कीच आवडेल, पण ते स्वतः कधीच तसे म्हणत नाहीत. जेव्हाजेव्हा पंतप्रधानपदावर तुमचा दावा असेल का अशा अर्थाचे प्रश्न शरदरावांना विचारले जातात तेव्हातेव्हा शरदराव म्हणतात की, मला माझी शक्ती माहित आहे. माझ्या पक्षाचे संसदेत किती खासदार असतात याची कल्पना मला आहे. त्यामुळे मी कधीच त्या पदाबाबत विचार करत नाही. ज्याच्यामागे संसदेत बहुमत असते तोच नेता पंतप्रधान बनत असतो इतके हे साधं आहे आणि माझ्या पक्षाची ती शक्ती नाही, असे सांगून पवारसाहेब मोकळे होतात, पण, पण, पण! त्यांनी स्वतः पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा जाहीररीत्या कधीही प्रकट केली नसली तरीही त्यांचे पाठीराखे मात्र त्या स्वप्नावर बोलताना थकत नाहीत. पवारच पंतप्रधानपदावर जाणार असा अट्टाहास राषट्रवादीच्या आमदारांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकींमध्ये पक्षाच्या खुल्या अधिवेशनांमध्ये नेहमीच व्यक्त केला जातो.
विशेषतः 2009 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी त्यांच्या पक्षाचे माहाराष्ट्रातील जनमान्य नेते व प्रांताध्यक्ष आर. आर. पाटील यांनी देशाचे पुढचे पंतप्रधान शरदरावच व्हावेत यासाठी महाराष्ट्राने मतदान करावे असे आवाहन केले होते. त्यावेळी त्यांच्या पक्षानेही जोर लावला होता. 2004 पासून पवार काँग्रेससोबत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये सहभागी होते. मनमोहन सिंहांचे ते जवळचे सहकारी मंत्रीही होते. पुढच्या निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणार नाही आणि कडबोळ्याचेच सरकार येणार हे दिसत होते. त्यावेळेस राष्ट्रवादीच्या महत्वाकांक्षांना पंख फुटले होते. स्वतः पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत प्रवेश केला होता. पंतप्रधानपदावर हक्क सांगण्याची त्यांची पूर्ण मानसिकता तेव्हा झालेली होती. जर वेळ आलीच तर शिवसेनेचे खासदार मराठी पंतप्रधानांच्याच मागे उभे राहतील ही गोष्ट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी वारंवार सूचित केली होती. त्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सारेच नेते कार्यकर्ते एकदिलाने कामाला लागले होते. पण त्यांच्या पक्षाला खासदारांची दुहेरी संख्याही गाठता आली नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे त्यांच्यासह नऊ खासदार तेव्हा लोकसभेत पोहोचले होते आणि त्याचवेळी सोनिया गांधींच्या नेतृत्त्वातील काँग्रेसलाही स्वबळावर चांगल्या जागा मिळाल्या होत्या. अर्थात ते जेव्हा महाराष्ट्राचे राजकारण गंभीरपणाने करत होते तेव्हाही शरद पवारांना एकहाती सत्ता कधीच प्राप्त करता आली नव्हती. स्वबळावर राज्य स्थापन करण्याच्या त्यांच्या सर्व प्रयत्नांची मर्यादा पन्नास ते चोपन्न आमदार इतपतच राहिली होती. त्यामुळे शरदराव जेव्हा म्हणतात की मला माझ्या व माझ्या पक्षाच्या शक्तीची कल्पना आहे, तेव्हा ते शब्दशः खरेही बोलत असतात!
असे आहे तरी मोदींचा हल्ला पवारांवरच का होतो? कारण शरद पवारांच्या राजकीय हिकमतीची कल्पना सर्वांनाच आहे. जोड-मोड व पुन्हा जोड अशा राजकारणात त्यांचा हात धरणारा नेता देशात क्वचित आढळेल. विविध घटकांना एकत्र आणून मोदी व भाजपाच्या विरोधात महाआघाडी उभी करण्याची सारी धडपड शरदरावांनी 2019 च्या निवडणुकीआधी दिल्लीत भरपूर केली. त्यांच्याच घरी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या बैठका व खलबते होत होती. खरेतर 23 मे रोजी 17 व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल काय लागतील याची चिंता व धास्तीही सर्वच राजकीय पक्षांना आहे. प्रत्येकच पक्षाचा नेता असेच सांगतो आहे की आमचेच सरकार पूर्ण बहुमताने येणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह वारंवार हेच सांगतात की आमच्यासोबत तीनशेपेक्षा अधिक खासदारांचे बळ उभे ठाकलेले दिसेल. पण मतदारांच्या पाहण्यांना पहिल्या फेरीनंतर निवडणूक आयोगाने बंदी घातलेली आहे. पण 11 एप्रिलच्या आधी ज्या मतदारचाचण्या जाहीर झाल्या त्यात एनडीए बहुमताच्या जवळ असेल असे जरी म्हटले असले तरी त्यावर एक प्रश्नचिन्ह उभे केलेले दिसते. याउलट विरोधकांनाही पूर्ण व स्पष्ट संधी असल्याचे दिसतच नाही. भाजपाच्या उत्तरेतील शंभर जागा घटतील व दक्षिणेत तसेच ईशान्येकडे भाजपाला अपेक्षित यश मिळणारच नाही या भाकितावरच विरोधकांचे अंदाज व्यक्त होत आहेत. पण भाजपा जर बहुमतापासून लांब थांबणार असेल तर नेमके काय होईल? त्यांच्या विरोधकांतील राहुल गांधींची काँग्रेस असो वा मायावतींचा बसपा वा अखिलेश यांचा समाजवादी पार्टी असो कुणालाच पार मोठा आकडा गाठता येईल असेही अंदाज पुढे आलेले नाहीत. त्याच वेळी ममता, बिजू पटनाईक, स्टालीन व शरद पवार अशा नेत्यांकडे जर काही प्रमाणात खासदारांचे पाठबळ जमले तर यांच्यातील कोणीही पंतप्रधानपदावर दावा सांगू शकेल हे उघड आहे. मोदी व शाहंचा महाराष्ट्रातील प्रचाराचा रोख त्यामुळेच शरदरावांच्या विरोधात तीव्र होताना दिसत आहे.
पंतप्रधानांची पहिली मोठी सभा वर्धा इथे झाली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रतील प्रचाराचा नारळ वर्ध्यामध्येच वाढवला होता. वर्ध्यातील ही सभा 1 तारखेला झाली तर पाठोपाठ दोनच दिवसात पंतप्रधानांनी प्रफुल्ल पटेलांच्या गावात गोंदियात सभा घेतली. विदर्भातल्या ७ जागांवर ११ एप्रिल रोजी मतदान पार पडले. वर्ध्यात बोलतानाच पहिला हल्ला पंतप्रधानांनी पवार आणि कुटंबावर चढवला ‘पराभव दिसत असल्यामुळेच शरद पवारांनी लोकसभा निवडणूक २०१९ मधून माघार घेतली’ असं मोदीं म्हणाले. पवारांच्या हातातून पक्ष निसटत चालला असून पवार घराण्यात गृहकलह होत असल्याचा सनसनाटी आरोप मोदींनी केला. त्या टीकेला पवारांच्या कन्येने लगेचच उत्तरही देऊन टाकले. शरद पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही, त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी पवारांवर टीका करत आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. मोदींनी कौटुंबिक बोलण्यापेक्षा देशाच्या प्रश्नांवर भाष्य करावं, वैयक्तिक बोलण्यापेक्षा बेरोजगारी, शेतीचे प्रश्न यावर बोलावं, असंही त्यांनी सुनावले. पुढच्या दोन टप्प्यांतही मोदींच्या आणखी तीन ते चार सभा महाराष्ट्रात होणारच आहेत त्याहीवेळी आपल्याला याच शाब्दिक चकमकी ऐकायला व पाहयला मिळणार आहेत.”
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी