HomeArchiveभाजपाचे महापक्षप्रवेशाचे राजकारण!

भाजपाचे महापक्षप्रवेशाचे राजकारण!

Details
भाजपाचे महापक्षप्रवेशाचे राजकारण!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
“आमचे ठरलेय, युती होणारच!” असे भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे नेते दररोज ओरडून सांगत आहेत. तरीही दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा दबाव नेत्यांवर दररोज येतच आहे की, “स्वतंत्र लढा व स्वबळावर विधानसभा जिंका!” विरोधी पक्षांमध्ये गोंधळ व भविष्याची चिंता स्पष्ट दिसत असताना कार्यकर्त्यांचा व काही नेत्यांचाही अतिउत्साह व फाजील आत्मविश्वास उफाळलेला दिसत आहे. पण ज्यांच्या शिरावर महाराष्ट्र जिंकण्याची प्रमुख जबाबदारी टाकण्यात आली आहे ते मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस मात्र संयमाचीच भाषा बोलत आहेत. त्यांच्या संयमी युतीच्या आवाहनाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही तितकाच संयमी प्रतिसाद देत आहेत. “आमचे ठरलेय” हे सांगायला दोन्ही नेते चुकत नाहीत व ते सांगताना मंद, गालातल्या गालात हसतात, हेही आता महाराष्ट्राच्या अंगवळणी पडले आहे. फक्त मुख्यमंत्री कोणाचा होणार? शिवसेनेला कर्नाटक प्रयोगानंतर जी मुख्यमंत्रीपदाची आस लागली आहे ती पूर्ण होणार का ? भाजपाचाच मुख्यमंत्री होणार असेल तर तिथे देवेन्द्र फडणवीस दिसतील की चंद्रकांतदादा पाटील आणि मग देवेन्द्र फडणवीस, दिल्लीत मोदी सरकारमधील एखादे महत्त्वाचे खाते सांभाळताना दिसतील? असे प्रश्न सध्या पडत आहेत. मुख्यमंत्री मीच होणार, कारण मी सांगितलेच आहे की, मी परत येत आहे असे मुख्यमंत्री फडणवीस स्वतःच कधीकधी सूचकपणाने सांगून जातात!

तिकडे आदित्य ठाकरे यांनाच मुख्यमंत्री केले जाणार असे सेनेचे काही नेते सांगत असतात आणि परवा तर महसूलमंत्री व भाजपाचे नवे प्रांताध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कहरच केला. “मी पक्ष देईल ते काम करतो. त्यामुळे मुख्यमंत्रीपद जरी पक्षाने दिले तरी मी थोडेच नाकारणार!” असे स्पष्ट प्रतिपादन करून दादा मोकळे झाले. त्यामुळेच, “भाजपाचे काही निराळेच ठरले आहे ?” की काय अशी शंका येऊ लागली. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसांनी आता महाजनादेश यात्रा सुरू केली आहे. त्यासाठी ते विदर्भात सध्या फिरत आहेत. तिथे बोलताना त्यांनी दोन-तीन महत्त्वाची वक्तव्ये केली. पत्रकार परिषदांमध्ये व व्यक्तीगत मुलाखती देताना ही वक्तव्ये आली आहेत. पहिले त्यांनी सांगितले की, शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद दिले जायला कोणतीच अडचण नाही. आदित्य ठाकरे माझ्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री झालेले पाहयला मला आवडेल, असे एक विधान मुख्यमंत्र्यांनी केले आहे. दुसरे, मुलाखतीत आलेले विधान हे अधिक महत्त्वाचे आहे. “भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या जागा त्याच पक्षाकडे राहतील, शिवसेनेने जिंकलेल्या जागा त्यांच्याकडेच राहतील. उर्वरीत १०२ जागांपैकी दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा घेतील असे जागावाटपाचे सूत्र असू शकते, असे स्वतः फडणवीस यांनीच सूचित केले आहे. त्यात त्यांनी असेही म्हटले आहे की, जिंकलेल्या काही जागांची अदलाबदलही करावी लागेल, ती केली जाईल..” आमचे काय व कसे करायचे हे ठरले हे ते जनतेला व पत्रकारांना योग्यवेळी सांगितले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी पुन्हा स्पष्ट केले.

चॅनेलच्या भाषेत बोलायचे तर ही फार मोठी ब्रेकिंग न्यूज मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. हा फार मोठा गौप्यस्फोट झालेला आहे. आधी असे सूचित केले जात होते, भासवले जात होते की मित्रपक्षांना देण्याच्या अठरा-वीस जागा वगळून दोन्ही पक्ष उरलेल्या २७० जागा अर्ध्या-अर्ध्या वाटून घेतील. म्हणजेच सेना १३५ जागा लढेल व भाजपा १३५ जागा लढेल. सध्याचे प्रांताध्यक्ष चंद्रकांतदादा पाटलांनीच हे मे महिन्यात बोलताना सांगितले होते. त्यामुळेच भाजपामध्ये मोठी चिंता तयार झाली होती. विद्यमान १२३ जागांव्यतिरिक्त, अधिकच्या फक्त डझनभरच जागाच जर भाजपा लढणार असेल तर मग कसे काय होईल, असे कार्यकर्त्यांना वाटत होते. मग सध्या जी मेगाभरती भाजपात सुरू झालेली आहे त्याचा अर्थ कसा लावायचा असा प्रश्न तयार झाला होता. आणि जर तुमच्याकडे लढण्यासाठी अधिकच्या जागाच नसतील तर तरी तुम्ही रोज नव्या नेत्यांना प्रवेश देता आहात याचा अर्थ कसा लावायचा? कार्यकर्त्यांनी तो असा लावला आहे की भारतीय जनता पक्ष सर्वच २८८ जागी आपले उमेदवार देणार आहे. स्वबळाची व युती तोडण्याची भाषा त्याच आशेतून सुरू झाली होती.

आता मुख्यमंत्री फडणवीस म्हणत आहेत की भाजपाला लढण्यासाठी १२३ अधिक ५१ म्हणजे जवळपास पावणेदोनशे जागा मिळणार आहेत. याउलट शिवसेनेच्या वाट्याला जेमतेम ११४-११५ जागा येणार आहेत. त्या स्थितीत भाजपाचेच आमदार संख्येने सेनेपेक्षा अधिक विजयी होणार हेही उघड आहे. अशाप्रकारे मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न भाजपाने निकालात काढलेला दिसतो. किंवा, “यांचे हेच ठरलेले होते”, असेही म्हणायला जागा आहे. पूर्वी शिवसेना १७१ जागा लढत असे व भाजपाच्या वाट्याला ११७ जागा येत असत. आता ती स्थिती नेमकी उलटी होताना दिसत आहे. देशभरात महाकाय झालेला भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातही दादा ठरला आहे व ते शिवसेनेनेही मान्य केले आहे, असाही याचा अर्थ होतो. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपामध्ये गेल्या सप्ताहात मोठ्या प्रमाणात जे पक्ष प्रवेश झाले त्याकडे पाहवे लागेल. शिवसेनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे तत्कालीन अध्यक्ष सचिन अहीर आले आणि त्यानंतर काही दिवसातच रा.काँ.चे संस्थापक नेते व माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, हे आमदार पुत्र वैभव पिचड यांच्यासह, भाजपात दाखल झाले ही एक मोठी घटना होती. पिचड पितापुत्रांनी गेली ३५ वर्षे नगर जिल्हयातील अकोले मतदारसंघ स्वतःकडेच धरून ठेवलेला आहे. हा सारा आदिवासीबहुल भाग आहे. पिचड स्वतः आदिवासी समाजाचे राष्ट्रीय स्तरावरचे नेते आहेत. विधानसभेत जेव्हाजेव्हा बिगर आदिवासींना आदिवासींमध्ये घेण्याबाबतची चर्चा निघे तेव्हा पिचड आदिवासींच्या हक्कांसाठी अतिशय आक्रमक झालेले दिसत. महादेव कोळी व अन्य समाजांचा प्रश्न, धनगरांना आदिवासींमध्ये घेणे वा धनगरांना आदिवासींच्या सवलती देणे, बिगर आदिवासींनी आदिवासींसाठी राखीव असणाऱ्या सरकारी नोकऱ्या लाटणे, आदिवासींच्या विकासासाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी अशा मुद्द्यांवर पिचड आदिवासींचा आवाज सातत्याने बुलंद करत राहिले आहेत. त्यांच्या आगमनामुळे भाजपाला एक दमदार व सशक्त आदिवासी चेहरा लाभला आहे यात शंका नाही.

छत्रपतींच्या घराण्यातील सर्व शाखांमधील म्होरके सध्या भाजपात आलेले आहेत हे आणखी एक वैशिष्ट्य परवाच्या पक्षप्रवेशाने सिद्ध झाले. थोरले छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशाच्या राजाराम महाराज व संभाजी महाराज या दोन्ही शाखांचे सध्याचे वंशज आज भाजपात दाखल आहेत. कोल्हापूरच्या गादीचे वारस संभाजी राजे व शाहू राजे हे पूर्वीच भाजपात आलेले आहेत. आता सातारा गादीच्या चुलत वंशाचे, शिवेन्द्रराजे भोसले हे साताऱ्याचे आमदार, भाजपात दाखल झाले आहेत. शिवेंद्र महाराज व सध्याचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे दोघेही छत्रपतींचे तेरावे वंशज आहेत. पण या दोघांमधून विस्तव जात नाही हेही सत्य आहे. उदयनराजेंचीही पावले निवडणुकीच्या आधी भाजपाकडे पडत असल्याचे भासत होते. पण ते झाले नाही. ते जरी शरद पवारांशीही फटकून वागत असले, अजित पवारांचा व उदयनराजेंचा जाहीर वाद होत असला तरीही उदयनराजे पवारांच्या पक्षातच टिकून राहिले. मात्र चुलत घराण्याने आता भजापात जाणे पसंत केले आहे. मतदारसंघाच्या विकासात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी जनतेच्या दबावाने आपण भाजपात आलो असे शिवेंद्र यांनी सांगितले, ते खरे नसल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. साताऱ्याची आमदारकीची जागा शिवेन्द्र यांना जिंकता येऊ नये यासाठी कल्पनाराजे भोसलेंना मैदानात उतरवण्याचे डावपेच रा. काँ. नेते आखत आहेत असे दिसते.

गणेश नाईक यांचे आमदार पुत्र संदीप नाईक व माजी महापौर, पुतण्या सागर नाईक यांच्यासह नवी मुंबई मनपाच्या डझनभर नगरसेवकांनी परवाच्या महाभरतीत भाजपात प्रवेश केला. पण तिथे शिवसेनेचे माजी नेते, ठाणे जिल्हयाचे माजी पालकमंत्री राहिलेले राष्ट्रवादीचे नेते गणेशदादा नाईक नव्हते. ते राष्ट्रवादीत कसे उरले आहेत, असा सवाल होता. पण आणखी जास्त संख्येने नगरसेवक व अन्य नेत्यांना रा. काँ.मधून समारंभपूर्वक बाहेर काढण्याचे नियोजन गणेशदादा नाईक करत असावेत. ते स्वतः या संदर्भात कहीच बोललेले नाहीत अथवा ते व्हाईट हाऊस या त्यांच्या आलिशान कार्यालयात दररोज जमणाऱ्या कार्यकर्त्यांशीही बोलताना दिसत नाहीत. पण लवकरच ते मोठा धमाका करतील असे संकेत त्यांच्या कुटुंबियांकडून दिले जात आहेत. गणेश नाईक यांच्यामुळेच नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस टिकून आहे, भक्कम आहे. आज मनपामध्ये रा.काँ.चे ५२ नगरसेवक आहेत. नाईकांसोबत यातील किमान पन्नास टक्के नगरसेवक पक्ष सोडून जातील अशी चिन्हे आहेत. नाईकांमुळेच नवी मुंबईत ऐरोली व बेलापूर या दोन्ही विधानसभा क्षेत्रात रा.काँ.चे उमेदवार आनंद परांजपे यांना लोकसभेसाठी चांगली मते मिळाली होती. नवी मुंबईवर नाईकांची जी पकड आहे ती पाहता त्यांनी पक्ष बदलणे ही एक मोठी गोष्ट ठरते.

या तिघा दिग्गज मानल्या जाणाऱ्या नेत्यांच्या मानाने भाजपात परवा दाखल झालेले चौथे आमदार कालीदास कोळंबकर लहान भासतात. पण त्यांची नायगाव मतदारसंघांमधील लोकप्रियता वादातीत आहे. पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची त्यांची धडपड सर्वमान्य आहे. विशेषतः पोलीस चाळींच्या पुनर्बांधणीसाठी तसेच बीडीडी चाळींच्या विकासासाठी कोळंबकरांनी केलेले काम लक्षणीय आहे. त्यांना मोठा जनाधार आहे व तो आता मुंबईत भाजपाला मिळणार आहे. हे सारे महाभरतीचे राजकारण करताना भाजपाने पुढच्या विधानसभेतही आपले वर्चस्व कायम ठेवण्याचे जे गणित डोळ्यापुढे ठेवले असेल त्यात मतांच्या महत्त्वाच्या बेरजा-वजाबाक्या ठरणारे हे चार मोहरे मुख्यमंत्र्यांनी पक्षासाठी मिळवले आहेत हे मात्र खरे!”
 
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content