HomeArchiveझाडांचे तळतळाट अन्...

झाडांचे तळतळाट अन् सीमोल्लंघन!

Details
 
 
 
विनोद साळवी..
 
 
मांगल्याचं आणि सुविचारांचं सोनं लुटण्याचा दसरा, विजयादशमीचा सण. परंपरा अन् संस्कृतीचं लेणं असलेल्या या मंगलदिनाच्या आपण एकमेकांना शुभेच्छा दिल्या. झेंडूच्या फुलांत गुंफलेलं आंब्याच्या टावलीचं पान आणि भाताच्या लोंबी हे धनधान्याने तृप्तता दाखवणारं तोरण काल घरोघरी बांधलं गेलं. अश्मंतक अर्थात कफ व पित्तावर गुणकारी आपट्याच्या झाडांची पाने वाटून आपण सोनंही लुटलं. पूजा पाठ, सरस्वती व शस्त्र पूजनही केलं आणि मानवी विचारांच्या कक्षा रूंदावून आपण पृथ्वीतलावरील सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणून आपला ऊर गर्व आणि अभिमानाने बडवून घेतला. याचवेळी ४ ऑक्टोबर २०१९ची काळरात्र संपूर्ण महाराष्ट्र आणि देशवासियांनी कायम स्मरणात ठसवली. आपल्या मोबाईलची मेमरी सातत्याने आपण वाढवत असलो तरी आपली मेमरी अगदी संपत चालली आहे. एका लाकूडतोड्याने रात्रीच्या अंधारात `विकास’ साधण्यासाठी कसा घेतला, याच्या कहाण्या पुढच्या पिढ्याही आपल्या मुलाबाळांना सांगतील.
 

या लाकूडतोड्याने एक दोन नव्हे तर तब्बल ४०० झाडांच्या मुळावर असा काही घाव घातला की त्यांना आ की उ बोलायची सोय ठेवली नाही. होय, पृथ्वीतलावरील सर्वात बुद्धिमान प्राणी लाकूडतोड्या अर्थात माणसाने हा कुटील डाव साधला. तो फक्त मेट्रोची झुकझूक ऐकण्यासाठी. आरे-आरे असं बेंबीच्या देठापासून कोकलणाऱ्या पर्यावरणस्नेहींना झाडांचं पान अन् डोळ्याचं पातंही न लववता असं काही करून दाखवलं की त्याला इतिहासात तोड नाही. कशाला हवी मुंबईजवळ ही वनसंपदा, निसर्गसंपदा, ना बिबट्यांचं, ना सापांचं, ना माकडांचं, ना प्राणी आणि पक्ष्यांचं, सालं एका रात्रीत अनधिकृत बांधकामविरोधात त्यांची घरं नेस्तनाबूत करून दाखवली. आता कितीही बोंबला, सुप्रिम कोर्टात जा. हम करेसो कायदा नि एकमेकांचा फायदा. ‘मुंबईला दुबई करून दाखवू’, खरतंर दसऱ्याच्या शुभदिनी आपण प्रत्येकाने महाराष्ट्र शासन आणि प्रशासन यांच्या अभिनंदनाचं तोरण वस्त्या-वस्त्यांत बाधलं पाहिजे होतं. विकासासाठी यांच्या बुद्धीला तोड नाही, असे बॅनर्सही चौकाचौकांत झळकावले पाहिजे होते.
 
 
मुंबईचं फुफ्फुस, हृदय असलेलं आरेच जंगल रातोरात कापलं, रानमेव्यावर जगणाऱ्या आदिवासींना बदडलं, आरे वाचवा म्हणणार्या आंदोलकांना तुरूंगात डांबलं आणि फक्त विकासाचं समर्थन केलं. चुकलं कुठं? २५०० पैकी अवघी ४०० झाडे तोडली तर इतकं आकांडतांडव मग सर्वच झाडे तोडल्यावर काय? अहो, इथं हजारोंच्या संख्येने झाडं लावली जाणार आहेत. सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनाचं यासाठी कौतुक करावं तितकं थोडंच आहे. २५०० झाडे तोडण्यासाठी हिरवा कंदिल दाखवल्यापासून ते अगदी दिवा लावून झाडे तोडण्यापर्यंत जी काही तत्परता दाखवली आहे, हे कुणाच्या बापाला कधी जमलं नाही. ‘मिशन झाडे लावा’ म्हणत लाखो झाडांची बात करणारे राज्याचे वनमंत्री दुसर्यात दिवशी आरेत पडलेले झाडांचे मुडदे बघण्यासाठीही डोकावले नाहीत. ते फक्त विकास होत आहे म्हणून. प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी ‘झाडे तोडा, झाडे लावा’ हा आरेचा पार्ट टू याहूनही हिट ठरणार आहे.
 
 

 
 
 
अगदी निसर्गसंपन्न कोकणात नाणार होणारच. मग, आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला श्वास घ्यायलाही फुरसत मिळणार नाही. ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरणाचा र्हा स, जमिनीची धूप, चहूबाजूंनी रखरखाट वाळवंटात घरोघरी उज्ज्वला गॅसप्रमाणे प्रत्येक माणसी ऑक्सिजनचं नळकांडं पुरवलं जाणार. हळहळू ‘मी, लाभार्थी’ अंतर्गत या योजनेसाठी नोंदणीही सुरू होईल. त्यामुळे त्वरा करा! श्वसनाचे फुफ्फुसाचे विकार अशा नाना विकारांवर अक्सिर इलाज हे ऑक्सिजनचं नळकांडं ठरणार आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षतोडीने मानवी जीवनावर काहीएक परिणाम होणार नाही, हा नवा विचार आपण आत्मसात करूयात.
 
 
दसऱ्यासाठी आपट्यांचं पान सोन्याचं असल्याने यापुढे आपट्याच्या झाडांचं पान अन् पान खुडून काढू, त्याला उघड-बोडकं करूया. तो आपल्या सण, उत्सव आणि परंपरेचा भाग आहे. एकमेकांना अलिंगन वा हातात हात मिळवूनही हा सण सोन्यासारखा साजरा करता येईल, हा विचार का बरं करावा? आरेच्या निमित्तानं रात्रीच्या लाकूडतोड्याने जो काही परिपाठ देशाला घालून दिला आहे तो पाहता पर्यावरण, निसर्ग संपविण्यासाठी तुम्ही-आम्ही कधीच सीमोल्लंघन केले आहे. फक्त विचाराचं सोन लुटताना ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या सुवचनाची आपल्याला नव्या स्वरूपात मांडणी करावी लागणार आहे.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content