Details
Kiranhegde17@gmail.com
राज्य विधानसभेची मुदत आज संपत असताना मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असलेली शिवसेना आता नमते घेण्याच्या मनःस्थितीत असल्याचे समजते. काँग्रेसकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता सत्तेचे रक्त तोंडाला लागलेल्या या `वाघा’ने हातचे सोडून पळत्याच्या मागे जाण्यापेक्षा आपली नखे पुन्हा कातडीत खेचण्याचे ठरवले असल्याचे माहितगारांनी सांगितले.
“ठरले त्यापेक्षा एकही कण जास्त नको, असे म्हणत गुरूवारपर्यंत शिवसेनेचे पक्षप्रमुख शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार या म्हणण्यावर ठाम होते. विधानसभा निवडणुकीच्या संपूर्ण प्रचारात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे अध्यक्ष अमित शाह तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, फडणवीस हेच आमचे पुढचे मुख्यमंत्री असतील असे रोज सांगत होते. त्यावेळी एकाही शब्दाने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा दावा शिवसेनेकडून कधी प्रचारात मांडला गेला नव्हता आणि आता तसा दावा करत अडून बसण्याची नीती ते वापरत आहेत, असा दावा भाजपाच्या गोटात केला जात आहे. आजही भारतीय जनता पक्षानेही राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा न करता आणखी वेळ काढण्याचा सपाटा चालू ठेवला. सत्तेत शिवसेनेबरोबर मांडीला मांडी लावून पुन्हा सत्तेत बसण्यासाठी आसुसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कालही शिवसेनेला अप्रत्यक्ष बळ दिले. त्यांचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आपला ओला दुष्काळग्रस्त कोकण दौराही रद्द केला. मात्र गडकरी मात्रेने सावरलेल्या काँग्रेसने या समीकरणाला अजूनही पूर्णतः हात दिलेला नाही. त्यांच्या अटी रोज वाढतच आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पक्षाच्या आमदारांना मुंबईत बोलावले असले तरी त्यांनी शिवसेनेच्या सत्तास्थापनेला उघड पाठिंबा दिला नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही शिवसेनेने आमचा पाठिंबा मागितलेला नाही, असे सांगत हातचे राखून ठेवले आहे.”
“भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या व्यूहरचनेनंतर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मध्यस्थीनंतर हाडाचे स्वयंसेवक असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दुसरे समकक्ष स्वयंसेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने उघड भूमिका घेतल्याने राजकीय वातावरण बदलल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्याबरोबर गडकरी यांनी केलेल्या चर्चेचे पडसाद आता उमटू लागले आहेत. काँग्रेसचे राज्यातील नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल शिवसेनेला समर्थन देण्यामागच्या अटींचाच पाढा वाचला. शिवसेनेला आधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सोडावी लागेल. नंतर संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये (युपीए) सहभागी व्हावे लागेल. त्यानंतर पक्षश्रेष्ठी यावर विचार करू शकतात, असे ते म्हणाले.”
“शिवसेनेला राज्यात मुख्यमंत्री बनवायचा आहे. पण केंद्रातली सत्ताही सोडायची नाही. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी आम्ही युती तोडणार नसल्याचे जाहीर केले आहे. युतीत राहणार आणि काँग्रेसचा पाठिंबा घेणार हे काँग्रेसला मान्य नाही. शिवसेना मुंबई महापालिकेतही सत्ता उपभोगते आहे. किंबहुना मुंबई महापालिकेतली सत्ता शिवसेनेचा प्राण आहे. अशावेळी एनडीएतून बाहेर पडून मुंबई महापालिकेत आपल्या बरोबरीच्या भाजपला अंगावर घेण्यात शिवसेनेला रस नाही. त्याहीपेक्षा महत्त्वाचे, केंद्रातली सत्ता व मिळालेले अप्रत्यक्ष सहकार्य मातोश्रीसाठी महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसच्या अटींना धुडकावण्यापलीकडे शिवसेनेला पर्याय नाही. त्यामुळेच शिवसेना नमते घेऊ शकते, असे जाणकारांनी सांगितले.”

