महाराष्ट्राचा लौकिक अर्थाने निर्मिती, जडणघडण या देशाच्या भूभागाबरोबरच झाली आहे. पुरातन काळापासून अमिट अशी छाप देशावर उमटवलीच आहे. इंग्रजांच्या जोखडातून देशाला मुक्ती मिळाल्यानंतर नि भाषावार प्रांतरचनेनंतर अन्य राज्यांना हेवा वाटेल अशी घोडदौड केली आहे. इथल्या मातीचे गुण नि माणसांची वैशिष्ट्ये पाहता देशाच्या अन्य राज्यातील लोकही रोजीरोटीसाठी इथे येऊन स्थिरावले नि राज्य अग्रेसर करते झाले. मात्र, यात स्थानिक हक्क हिरावले गेल्याची भावना असली तरी यात कोणीच काही करेनासे झाले नि मराठी माणूस हक्कासाठी वाऱ्यावरच राहिला! थोडक्यात अशी आहे महाराष्ट्राची एकसष्टी..
संपन्नतेची उधळण असलेला हा महाराष्ट्र नैसर्गिक ऱ्हासामुळे आज यात पिछाडीवर पडत आहे. अफाट, बेफाम नागरीकरणामुळे नैसर्गिक वने, किनारे, नदी, नाले, प्रवाह, पर्यावरण आदी बाबींत बिकट अवस्था होत चाललेल्या राज्याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला कोणालाही फुरसत नाही. जे काही करायचे ते कागदावर अशी स्थिती आहे. गेल्या २५-३० वर्षांत राज्यकर्ते अधिक आलिशान जीवन जगू पाहत आहेत, यात बाबूशाही आलीच!
अनियंत्रित खर्चामुळे राज्यावर कर्जाचा बोजा वाढत आहे. ज्याच्यासाठी प्रसंगी अजून कर्ज काढण्याची भाषा केली जाते, प्रत्यक्षात त्याच्यापर्यंत किती पोहोचते हे समोर येऊनसुद्धा.. आकड्यांची जुमलेबाजी लोकांना कळली आहे, पण जनता हतबल झाली आहे. याचा फायदा घेतला जातोय! राज्यकर्ते कोणीही असोत बगलबच्यांच्या, गुंडपुंडाच्या मदतीने आपला कार्यक्रम रेटला जातोय. त्याचा परिणाम राज्याच्या सर्वांगीण विकासावर होतो हे न कळायला ना राज्यकर्ते ना जनता भोळी राहिली आहे.
कोरोना काळात देशाचे चित्र अधिकच भेसूर झाले आहे. सामान्यांना कोणीच वाली उरला नाही. राज्य-केंद्र असा खेळ करण्यात सुविधांपासून वंचित मात्र कधी आगींमुळे, कधी इलाजाच्या अभावी मरत आहे. भले भले जग सोडत असले तरी खिसे भरण्याचे उदयोग मात्र थांबलेले नाहीत, ही जनभावना आहे. कष्टकरी, कामकरी वर्गाचा महाराष्ट्र आहे असा कंठरव रोज ऐकवला जातो. प्रत्यक्षात तो एक मे या आंतरराष्ट्रीय कामगार दिनी उपेक्षितच आहे. कोरोनामुळे तो आज देशोधडीला लागला आहे. आहे रे नि नाही रे वर्गाची दरी दिवसेंदिवस रुंदावत चालली आहे. याची परिणीती मोठ्या अराजकात होईल हे सांगायला कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही.

असो, आपण विविधतेत संपन्न असलेल्या महाराष्ट्राकडे वळू! भौगोलिकदृष्ट्या या राज्याचे कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ-मराठवाडा, प महाराष्ट्र असे भाग पाडले गेले असले तरी संपूर्ण भागाची वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत. संस्कृतिक, भाषिक, सणवार, वेशभूषा, राहणीमान, खानपान, निसर्ग अशात हा महाराष्ट्र उभा आहे नि बहूसंपन्न देश हा म्हणून मिरवतो आहे. झपाट्याने होणारे पाश्चिमात्यकरण, नागर वस्ती यात राज्याचा ग्रामीण आत्मा हरवत चालला आहे. हे राज्य अनेक बाबतीत जन निर्णयाभिमुख असल्याने देशभरात त्याची ‘री’ ओढली जाते. स्वतंत्र भाषिक राज्य झाल्यानंतर जवळपास सर्वच क्षेत्रात भरारी घेतली ते सुरुवातीच्या काळात दूरदृष्टीने घेतलेल्या निर्णयांमुळे!
बहुविध तज्ज्ञ लोकांचा वारसा राज्याला अनेक विभागात लाभला. त्यांनी केलेले पायाभूत असे विशाल काम मार्गदर्शक असेच आहे. विविध स्तरावर झोकून देऊन निस्वार्थ तळमळीने उभे राहणारे कार्यकर्ते, त्यातून तयार नेतृत्त्व, समाजाला दिशा देणारे मार्गदर्शक अशी कितीतरी नावे सांगता येतील. शिक्षण, संशोधन, कला, क्रीडा, मनोरंजन, पत्रकारिता, साहित्य, तंत्रज्ञान, उद्योग, पारंपरिक लोककला, नाटक, सिनेमा, वाद्य-तालवाद्य, गायकी, जागतिक स्तरावरील चित्रनिर्मिती, पाककला, विकासात्मक दृष्टी, अशा नाना बाबतीत राज्य आघाडीला ठेवण्याचे काम त्या त्या क्षेत्रातील धुरीणांनी केलं आहे.
जुन्या-समृद्ध करणाऱ्या पिढीतील अनेकांनी इहलोक सोडला आहे. अलीकडच्या ३५-४० वर्षांत सुख, लोलुपता, चंगळवाद वाढत असल्याने खिशात काय पडते पाहणारे मोठ्या संख्येने वाढले आहेत. प्रत्येक क्षेत्र हे मिळेल त्या मार्गाने खिसा भरण्याचे साधन झाले आहे. हे हल्लीच्या अनेक घटनांनी पुढे येतेय. निस्वार्थ वृत्ती कमी होतेय, समाज, येणारी पिढी यावर लक्ष केंद्रित करून ध्येयधोरणं फार तयार होत नाहीत. त्यादृष्टीची अपवादात्मक कामं आहेत नाही असं नाही.
सध्याचं काय ते पाहिलं जातंय हे समाजदेखील जाणून आहे. सेवाभाव हाच महाराष्ट्राच्या उभारणीचा पाया होता तोच कमकुवत पडताना दिसतो आहे. राजकीय पक्षांच्या माध्यमातून त्याला फारसं बळ मिळताना दिसत नाही. कार्यकर्ते लाखोंच्या संख्येने पण त्यांना केवळ दिशा राजकारणाची अशी स्थिती सर्वत्र पाहायला मिळते. बदलत्या काळात लोकांच्या बदलेल्या गरजा लक्षात घेत नेत्यांच्या स्मारकाऐवजी लोकोपयोगी कामांची उभारणी हे मोठं कार्य महाराष्ट्राच्या पुढील नेतृत्त्वाला आव्हान असेल!

