Homeटॉप स्टोरीविधानसभेत आज १६...

विधानसभेत आज १६ आमदार राहिले गैरहजर!

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे राहुल नार्वेकर आज बहुमताने विजयी झाले. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राजन साळवी यांचा त्यांनी १६४ विरूदध १०७, असा पराभव केला. एकूण २८७ आमदारांपैकी २७१ आमदारांनी आज मतदानात भाग घेतला. समाजवादी पार्टी तसेच एमआयएमचे आमदार तटस्थ राहिले. शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून परस्परांवर आपापल्या व्हीपचे उल्ल्घन झाल्याचा दावा यावेळी करण्यात आला.

राज्यपाल कशाची वाट पाहत होते ते कळले

पीठासन अधिकाऱ्यांच्या खुर्चीत असलेले उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी राज्यपालांच्या आदेशानुसार अध्यक्षपदासाठी निवडणूक पुकारली. त्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील बोलायला उभे राहिले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आम्ही राज्यपालांना वारंवार विनंती केली होती. परंतु ती मान्य झाली नाही. ते कशाची वाट पाहत होते ते आता कळले, असा टोला त्यांनी लगावला. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यासाठी नाना पटोले यांचे आभार मानायला हवे, असा प्रतिटोला लगावल्याने सभागृहात खसखस पिकली. नाना पटोले यांनी विधानसभेचे अध्यक्षपद सोडल्यापासून हे पद रिक्त होते.

अध्यक्षपदासाठी दोन नावांचे आले प्रस्ताव

उपाध्यक्ष झिरवळ यांनी अध्यक्षपदाच्या उमेदवारांविषयी आलेले दोन्ही प्रस्ताव मांडण्यास परवानगी दिली. भारतीय जनता पार्टीचे चंद्रकांत पाटील यांनी यासाठी राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव दिला. गिरीश महाजन यांनी त्यास अनुमोदन दिले. त्यापाठोपाठ शिवसेनेच्या ठाकरे गटाचे चेतन तुपे यांनी या पदासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राजन साळवी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. काँग्रेसचे संग्राम थोपटे यांनी त्याला अनुमोदन दिले. त्यानंतर उपाध्यक्षांनी पहिला प्रस्ताव मताला टाकला. त्यावेळीच सत्ताधारी सदस्यांनी हात उंचावून नार्वेकर यांच्या नावाला संमती दिली. मात्र, तेव्हाच विरोधकांकडून मतदानाची मागणी करण्यात आली. उपाध्यक्ष झिरवळ यांनी ती मान्य केली. आणि शिरगणती करण्याचे आदेश दिले.

शिरगणतीत सत्ताधाऱ्यांची सरशी

सर्वप्रथम सत्ताधारी बाजूचे, नंतर विरोधी बाजूचे आणि सर्वात शेवटी तटस्थ सदस्यांची मोजणी करण्यात आली. मतमोजणीत राहुल नार्वेकर यांना १६४ तर राजन साळवी यांना १०७ मते मिळाली. समाजवादी पार्टीचे दोन तर एमआयएमचे एक सदस्य तटस्थ राहिले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव सदस्य राजू पाटील तसेच बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांनी नार्वेकर यांना मत दिले. तुरूंगात असल्यामुळे राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि अनिल देशमुख सभागृहात हजर नव्हते. त्याचबरोबर निलेश लंके, दिलीप मोहिते पाटील, दत्तात्रय भरणे, बबन शिंदे, अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीचे सदस्यही गैरहजर राहिले. आजारी असल्यामुळे भाजपाच्या मुक्ता टिळक तसेच लक्ष्मण जगताप हजर राहिले नाहीत. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे तसेच जितेश अंतापूरकर आणि एमआयएमचे मुफ्ती इस्माईल अनुपस्थित राहिले.

सुनील प्रभूंनी घेतला आक्षेप

त्यानंतर लगेचच काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी दिलेल्या पत्राचे वाचन करून त्याची नोंद घेण्याची विनंती केली. त्याबरोबर उपाध्यक्षांनी प्रभू यांच्या पत्राचे वाचन केले. त्यात शिवसेनेच्या ३९ सदस्यांनी पक्षाचा व्हीप मोडून मतदान केल्याचे म्हटले होते. उपाध्यक्षांनी त्याची नोंद घेतल्याचे जाहीर केले.

उपाध्यक्षांनी राहुल नार्वेकर विजयी झाल्याचे जाहीर केल्याने दुसऱ्या प्रस्तावावर विचारच झाला नाही. आणि सर्व पक्षांच्या नेत्यांनी नार्वेकर यांना पीठासीन अधिकाऱ्यांच्या खुर्चीपर्यंत नेले आणि ते अध्यक्षांच्या खुर्चीत विराजमान झाले.

वैचारिक भूमिकेसाठी सत्ता सोडली

मुख्यमंत्री शिंदे यांनी नार्वेकर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. राहुल नार्वेकर हे स्वतः कायद्याचे उत्तम जाणकार आहेत. कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता ते सदनातील सर्व सदस्यांना निश्चितच समान न्याय देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गेल्या १०-१५ दिवसांत काही घडामोडी घडल्या. बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन आम्ही सत्ता सोडून विरोधकांकडे गेलो. एरव्ही विरोधक सत्तेकडे जाताना देशाने पाहिले आहे. ५० सदस्यांनी माझ्यासारख्या एका शिवसैनिकावर विश्वास टाकला. एकाही सदस्यावर आम्ही जबरदस्ती केली नाही. एका सदस्याने परत जाम्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांना विशेष विमानाने पाठविले, असे सांगत शिंदे यांनी भाजपा नेत्यांचे आभार मानले. आपल्याला मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरला, असेही ते म्हणाले.

देशातील सर्वात तरूण अध्यक्ष

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ॲड. नार्वेकर हे राज्यातील आणि देशातील सर्वात तरूण अध्यक्ष आहेत. राष्ट्रकुल संसदीय मंडळाचा पुरस्कारप्राप्त नार्वेकर कायद्यात निष्णात असल्याने या पदावरून न्यायदानाचे काम करतील. यापूर्वीच्या सर्व अध्यक्षांनी उत्तम काम केले असून हीच परंपरा नार्वेकर यांच्या कालावधीत पुढे सुरू राहील. राज्याच्या सर्व नागरिकांचे प्रश्न सोडविण्याची संधी त्यांना मिळाली असून कोणत्याही अडचणी, प्रश्न सोडविण्याची क्षमता या सभागृहात आहे. त्यामुळे दोन्ही बाजू समजून घेऊन त्या विषयाला न्याय देण्याचे कार्य करतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

शिंदेंनी सावध राहवे

राहुल नार्वेकर जिथे जातात तिथे ते नेत्यांना आपलेसे करून घेतात. शिवसेनेत ते आदित्य ठाकरे यांच्याबरोबर होते. राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांनी आपल्याला आपलेसे केले. भाजपात गेल्यावर त्यांनी फडणवीसांना आपलेसे केले. त्यामुळे शिदेसाहेब आता तुम्ही सावध राहा.. नाहीतर तुमचे काही खरे नाही, असा टोला अजित पवार यांनी लगावला. भाजपात अनेक कार्यकर्त्यांनी वर्षांनुवर्षे मेहनत केली. पण त्यांना असे काही पद हाती लागत नाही याचे वाईट वाटते, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.

नशिबाचे फेरे कधीही बदलू शकतात

सत्तांतरानंतर नार्वेकर कायदेमंत्री होतील, असे वाटले होते. नशिबाचे फेरे कधीही बदलू शकतात. आपण कधी मुख्यमंत्री होऊ असे वाटले नसतानाही उद्व ठाकरे मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे वाटत असतानाच उपमुख्यमंत्री झाले. ज्या पद्धतीने आपली निवड झाली, त्यावर मी काही बोलणार नाही. परंतु आमचा व्हीप झुगारून येथे लोकशाहीची पायमल्ली करण्यात आली याची नोंद झालेली आहे, असे सुनील प्रभू म्हणाले.

बाळासाहेबांच्या नावाने शहर उभारा

नार्वेकर यांचे अभिनंदन करताना अबू आझमी यांनी, ठाकरे सरकारने औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराबाबत घेतलेल्या निर्णयावर टीका केली. शहरांची नावे बदलण्यापेक्षा बाळासाहेबांच्या नावाने एखादे नवीन शहर वसवले असते तर आपणही टाळ्या वाजवल्या असत्या, असे सांगितले.

आमच्याकडेच बहुमत

शिवसेनेतले बहुमत आमच्या गटाकडे आहे. आमच्या प्रतोदांनीही काढलेल्या व्हीपचे पालन १६ सदस्यांनी केलेले नाही. पण, हा विषय अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलण्याचा नाही, असे सांगत शिवसेनेच्या शिंदे गटाचे दीपक केसरकर यांनी नार्वेकर यांना शुभेच्छा दिल्या.

नेत्यांनी सांगितल्या कानगोष्टी

अजित पवार म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हायचे आहे हे आपल्या कानात जरी सांगितले असते तर ते मी उद्धव ठाकरे यांना तेव्हाच सांगितले असते आणि ही वेळच आली नसती. त्याला टोला लगावताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, शिंदे सांगितले नाही हे खरे आहे, पण तुम्हाला कधी मुख्यमंत्री व्हायचे असेल तर माझ्या कानात जरूर सांगा. जयंत पाटील यांना सांगून काहीही उपयोग नाही. आदित्य ठाकरे यांनीही कानगोष्टीत सहभाग घेताना सांगितले की, फडणवीसांनी त्यांच्या कानात सांगितलेली गोष्ट तेव्हा ऐकली असती तर अडीच वर्षांपूर्वी हे झाले असतो. आता कदाचित पलटीही झाली असती.

शिवसेनेच्या नेत्यांचे गॅलरीतून लक्ष

शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई, अरविंद सावंत, सचिन अहिर आदी नेत्यांनी विधानसभा गॅलरीतून साऱ्या मतदान प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले होते. परंतु शिवसेनेच्या शिंदे गटातल्या ३९पैकी एकाही आमदाराने आपले मत बदलले नाही. त्यामुळे निराश झालेल्या या नेत्यांनी लवकरच काढता पाय घेतला.

शिंदे गटाकडूनही व्हीप मोडल्याचा दावा

नार्वेकर यांच्यावरील अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर अध्यक्षांनी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिलेल्या पत्राचे वाचन केले. शिवसेनेच्या १६ सदस्यांनी आपला व्हीप पाळला नसल्याचे या पत्रात म्हटले होते. या पत्राची सभागृहाने नोंद घेतल्याचेही अध्यक्षांनी जाहीर केले.

दिवंगतांना आदरांजली

त्यानंतर अध्यक्षांनी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल के. शंकरनारायणन, विधानसभेचे सदस्य रमेश लटके तसेच माजी सदस्य हुसेन दलवाई यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करणारा शोकप्रस्ताव मांडला. एकमताने तो मंजूर करण्यात आला. शोकप्रस्तावाची एक प्रत विधानसभेच्या पत्रासह त्यांच्या शोकाकुल कुटुंबियांना पाठविण्यात येईल, असे अध्यक्षांनी जाहीर केले.

Continue reading

इराणने धुडकावली अमेरिकेबरोबरची चर्चा!

अमेरिका आणि इराणमध्ये झालेला दोन आठवड्यांचा युद्धविराम उद्या संपत असतानाच अमेरिकेबरोबर पाकिस्तानात होऊ घातलेल्या चर्चेला इराणने नकार दिला आहे. आम्ही सरशीत असताना आमच्या अटीशर्तींवरच अमेरिकेबरोबर चर्चा होईल, असे इराणच्या लष्करी गोटातून स्पष्ट करण्यात आले आहे. इराणच्या होर्मूझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण...

लग्नासाठी भाड्याने मिळणार कोल्हापूरची चित्रनगरी व नितीन देसाईंचा स्टडिओ?

चित्रपट, दूरदर्शन मालिका व जाहिरातींच्या चित्रिकरणास कोणताही अडथळा न आणता कोल्हापूरची चित्रनगरी तसेच कर्जतमधला एन. डी. स्टुडिओ परिसरात विवाह सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर समारंभांसाठी जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देता येईल का, याबाबत अभ्यास करून स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे सांस्कृतिक...

श्री मावळी मंडळ कबड्डीः स्वराज्य स्पोर्ट्स, श्रीराम क्रीडा विश्वस्त अजिंक्य

महिलांत स्वराज्य स्पोर्टस् आणि पुरुषांत श्रीराम क्रीडा विश्वस्त यांनी ठाण्याच्या श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या ७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. स्वराज्य स्पोर्ट्सची याशिका पुजारी व श्रीराम क्रीडा विश्वस्तचा तुषार शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख...
Skip to content