Homeहेल्थ इज वेल्थ१००१ कोविडबाधित महिला...

१००१ कोविडबाधित महिला झाल्या ‘नायर’मध्ये माता!

मुंबई महापालिकेच्या बा. य. ल. नायर रुग्णालयात ‘कोविड-१९’बाधित मातांच्या सुखरुप प्रसूतीने सहस्रकाचा टप्पा नुकताच ओलांडला असून तान्हुल्यांच्या ट्याह्यांच्या मंगलस्वरांनीदेखील त्याला साथ दिली आहे. यानिमित्ताने मुंबईने कोविड विरोधातील मानवाच्या लढ्यास एका वेगळ्या शुभवर्तमानाची जोड दिली आहे. गेल्यावर्षी म्हणजेच एप्रिल २०२०मध्ये ‘कोविड रुग्णालय’ म्हणून घोषित झालेल्या महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात १४ एप्रिल २०२० रोजी पहिल्या कोविडबाधित मातेची सुखरूप प्रसूती झाली होती. तेव्हापासून साधारणपणे वर्षभराच्या कालावधीत नायर रुग्णालयात १००१ कोविडबाधित मातांची सुखरुप प्रसूती झाली आहे. यामध्ये एका तिळ्यांसह १९ जुळ्या बाळांचा समावेश असून यानुसार एकूण १०२२ बाळांचा जन्म नायर रुग्णालयात झाला आहे.

विविध विभागांचा समन्वय ठरला उपयुक्त

मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयाच्या कोविड समन्वयक डॉ. सारिका पाटील, नवजात शिशु व बालरोग चिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. सुषमा मलिक, प्रसूतिशास्त्र विभागातील डॉ. गणेश शिंदे, डॉ. अलका गुप्ता, समन्वयक प्रा. डॉ. नीरज महाजन आणि भूलशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. चारुलता देशपांडे व डॉ. सोना दवे या सर्वांनी तसेच सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी सुसमन्वय साधून या यशोगाथेला आकार दिला आहे.

शरीरधर्मही न उरकता केले जाते काम

मुंबई सेंट्रल परिसरात असणाऱ्या नायर रुग्णालयातील प्रसूतिशास्त्र विभाग, नवजात शिशु व बालरोग चिकित्सा विभाग आणि भूलशास्त्र विभागातील डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय यांनी ‘पीपीई किट’ घालून घामाच्या धारा वाहत असताना अक्षरशः २४ तास अविश्रांत मेहनत घेऊन नवजीवन फुलवण्यात अत्यंत महत्त्वाची व मोलाची भूमिका बजावली आहे. या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी पीपीई किट घातल्यानंतर सलग सहा तास पाणी न पिता किंवा शरीरधर्मही न उरकता अव्याहतपणे काम केले आहे. या तिन्ही विभागातील अनेक डॉक्टर्स, परिचारिका वॉर्डबॉय हे गेल्या वर्षभराच्या कालावधीत अनेकदा अनेक दिवस घरी न जाता रुग्णालयात राहून अथकपणे व अविरतपणे रुग्णसेवेचे काम करीत आहेत.

यामध्ये ७५ कर्मचाऱ्यांचा आहे समावेश

गेले वर्षभर सातत्याने अविश्रांत मेहनत घेणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये नवजात शिशु व बालरोग चिकित्सा विभागातील डॉ. पुनम वाडे, डॉ. संतोष कोंडेकर, डॉ. विशाल सावंत, डॉ. किरण राजपूत आणि परिचारिका सिस्टर सीमा चव्हाण, सिस्टर रोझलीन डिसूजा, सिस्टर अनाया साटम यांच्यासह सुमारे ७५ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. प्रसूतिशास्त्र विभागातील डॉ. अरुंधती तिलवे, डॉ. चैतन्य गायकवाड, डॉ. अंकिता पांडे आणि परिचारिका सिस्टर रुबी जेम्स, सिस्टर सुशिला लोके, सिस्टर रेश्मा तांडेल यांच्यासह सुमारे ७५ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

नायर

तान्हुल्यांचीही ‘कोविड’वर मात

कोविडच्या अनुषंगाने माहिती देताना डॉक्टर सुषमा मलिक यांनी सांगितले की, कोविडचा संसर्ग हा जन्मतः होत नाही. पोटात असणाऱ्या बाळाच्या आईला जरी कोविडचा संसर्ग असेल, तरी पोटातल्या बाळाला हा संसर्ग होत नाही. मात्र जन्मल्यानंतर आईच्या संपर्कातून हा संसर्ग होऊ शकतो. वैद्यकीय उपचार क्रमानुसार (मेडिकल प्रोटोकॉल) कोविडबाधित मातेपासून जन्मलेल्या नवजात शिशुंची कोविडविषयक वैद्यकीय चाचणी केली जाते. यानुसार वर्षभराच्या कालावधीत जन्मलेल्या तान्हुल्यांपैकी काही नवजात शिशुंची चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली होती. तथापि, त्यांच्यामध्ये कोविडची लक्षणे आढळून आली नाहीत. तसेच ‘डिस्चार्ज’ देण्यापूर्वी त्यांची करण्यात आलेली वैद्यकीय चाचणी ‘निगेटिव्ह’ आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

भूलशास्त्र विभागाचे मोलाचे योगदान

गेल्या साधारणपणे वर्षभराच्या कालावधीत नायर रुग्णालयात कोविडबाधित मातांच्या १००१ प्रसूतिंपैकी ५९९ प्रसूती या ‘नॉर्मल डिलिव्हरी’ प्रकारातील होत्या. तर ४०२ प्रसूती या ‘सिझेरियन डिलीवरी’ प्रकारातील होत्या. ‘सिजेरियन डिलीवरी’ प्रकारातील प्रसूती सुखरूपपणे होण्यात नायर रुग्णालयातील भूलशास्त्र विभागाची (Anesthesia Dept.) अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे.

स्वच्छता आणि साफसफाई

प्रसूतिशास्त्र विभाग आणि नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU) दोन्ही विभागातील स्वच्छता आणि साफसफाई अतिशय चांगल्या प्रकारे व नियमितपणे करणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी या दोन्ही विभागातील वॉर्डबॉय व कामगारांनी अतिशय मोलाची भूमिका पार पाडत आहेत. अंगावर ‘पीपीई किट’ चढवून व घामाच्या धारा वाहत असतानाही अक्षरश: दिवस-रात्र पद्धतीने काम करत त्यांनी या दोन्ही विभागांशी संबंधित विविध वॉर्डमध्ये चांगली साफसफाई नियमितपणे राखली आहे.

स्तनपानविषयक दक्षता आणि पोषण आहार

नवजात शिशुंच्या सुयोग्य पोषणासाठी आईचे दूध अत्यंत महत्त्वाचे असते. तथापि, आई मुलाला स्तनपान देत असताना, संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन, “आईने कोणती काळजी घ्यावी व ती कशा प्रकारे घ्यावी?” याबाबत सविस्तर मार्गदर्शन नियमितपणे केले जात आहे. तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या प्रत्येक मातेला सॅनिटायझरची बाटली, साबण, तोंडाला बांधायचा ‘मास्क’ (मुखावरण) इत्यादी बाबी नियमितपणे दिल्या जात आहेत. त्याचबरोबर आईचा आहारदेखील अधिकाधिक प्रथिनयुक्त व पोषणयुक्त असावा, यासाठी आईलाही नियमितपणे पोषक नाष्टा व जेवण दिले जात आहे. यामध्ये कडधान्य, डाळी, अंडी यासारख्या बाबींचा समावेश आहे. याचबरोबर नवजात शिशुंसाठी अंगडे-टोपडे-झबलेही दिले जात आहे. काही संस्थांच्या मदतीने मातांना टूथपेस्ट, टूथब्रश, तेल, कंगवा, टॉवेल, रुमाल इत्यादी बाबींचा समावेश असलेले ‘किट’ दिले जात आहे.

वैद्यकीय संशोधन व लेखन प्रगतीपथावर

नायर रुग्णालयात कोविडबाधित मातांच्या सुखरूप प्रसूतीची घटना‌ ही उपलब्ध माहितीनुसार वैद्यकीय क्षेत्रातील आतापर्यंतची एकमेव यशोगाथा आहे. या यशोगाथेचे शास्त्रशुद्ध डॉक्युमेंटेशन आणि वैद्यकीय संशोधकीय लेखन (Research Paper) प्रगतीपथावर आहे, अशी माहितीही यानिमित्ताने नायर रुग्णालयाद्वारे आवर्जून देण्यात आली आहे.

नायर रुग्णालयातील कोविडविषयक सर्व समन्वयन महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येत आहे, अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक आणि अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content