HomeArchiveशिवाजीरावांच्या निधनाला आघाडीचा...

शिवाजीरावांच्या निधनाला आघाडीचा मुहूर्त!

Details
शिवाजीरावांच्या निधनाला आघाडीचा मुहूर्त!

    16-Jan-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
aniketsjoshi@hotmail.com
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहत असतानाच त्यांचा पक्ष आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लोकसभा निवडणुकीच्या आघाडीवर शिक्कामोर्तब होत होते, ही बाब लक्षणीयआहे. याच शिवाजीरावांना विधान परिषदेच्या सभापतीपदावरून हटवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अविश्वास प्रस्ताव आणला होता व भारतीय जनता पार्टीच्या मदतीने तो मंजूरही करून घेतला होता याची सहज आठवण काँग्रेस कार्यकर्त्यांना होत असेल. 2014-15 मधील ती सारी कटुता गिळून टाकत दोन्ही काँग्रेसचे नेते एक झाले आहेत.

राज्यातील 48 लोकसभेच्या जागांपैकी 45 जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झाल्याचे स्वतः पवारसाहेबांनी जाहीर केले आहे. नंदुरबार, अहमदनगर आणि औरंगाबाद या तीन जागांसाठी रस्सीखेच सुरू आहे. नंदुरबारची जागा काँग्रेसने सोडावी अशी राष्ट्रवादीची इच्छा आहे. तेच औरंगाबादबाबतीतही. या दोन्ही काँग्रेसने लढवलेल्या जागा राष्ट्रवादीला हव्या आहेत. नंदुरबारला भाजपाचे नेते डॉ. विजय कुमार गावीत पुन्हा राष्ट्रवादीत परततील अशी अटकळ आहे. त्यांच्या कन्येने, डॉ. हीना गावीत यांनी, ती जागा भाजपासाठी गेल्या वेळी जिंकली होती. गावीतांनी बाजू बदलली तर तिथे भाजपाचा निभाव लागणे कठीण आहे. नगरची मूळची काँग्रेसची जागा सध्या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. खासदार तिथेही भाजपाचेच आहेत. पण सुजय राधाकृष्ण विखे पाटील या तरूण नेत्यासाठी काँग्रेसला ती जागा परत हवी आहे. नरेंद्र मोदींचे आव्हान पेलायचे असेल, भाजपाच्या प्रचंड वाढलेल्या ताकदीला टक्कर द्यायची असेल तर दोन्ही काँग्रेसना सारे मतभेद विसरून एक व्हावेच लागेल, याचे भान जसे शरद पवारांना आहे तसेच ते काँग्रसचे नेते अशोक चव्हाणांनाही आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे अखेरचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व त्यांची कार्यपद्धती हेच दोन्ही काँग्रेसमधील दहा वर्षांची आघाडी तुटण्याचे कारण ठरले होते.

2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये देशभरात संयुक्त पुरोगामी आघाडीचे पानिपत झाले होते. काँग्रेसला देशभरात मिळून 42 जागा मिळाल्या होत्या. त्यात महाराष्ट्रातील दोन लोकसभा मतदारसंघांचा समावेश होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसने थेट चार जागा जिंकून महाराष्ट्रात काँग्रेसच्या मानाने दुप्पट विजय मिळवला होता. सहाजिकच दोन्ही काँग्रेसमध्ये त्या आधीची चार वर्षे सुरू असणारी भांडणे वरवर येऊ लागली. मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाणांचे वागणे राष्ट्रवादीला खुपतच होते. विशेषतः शेतकरी कामगार पक्ष व भाजपा नेत्यांच्या टीकेनंतर लगेचच चव्हाण यांनी पाटबंधारे खात्यातील कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करण्याची भूमिका घेतली. तिथेच दोन्ही काँग्रेसचा मनभेद पक्का झाला. राष्ट्रवादीचे राज्यातील प्रमुख नेते अजित पवार यांच्या अखत्यारीत असणाऱ्या जलसंपदा खात्याची चौकशी करून व्हाईट पेपर प्रसिद्ध करू असे थेट मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यामुळे दोन्ही काँग्रेसमधील प्रश्न जटिल बनला. त्याच क्षणी राज्य सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा आणि चव्हाण यांच्या बुडाखालची मुख्यमंत्रपीदाची खुर्ची कढून घ्यावी असा संताप राष्ट्रवादीमध्ये खदखदत होता. पण थोरल्या पवारांनी आवरले.

एकटे अजितदादा मंत्रिमंडळातून ऑगस्ट 2012 मध्ये बाहेर गेले आणि तीन महिन्यातच तथाकथित श्वेत पत्रिका प्रसिद्ध झाल्यानंतर, चौकशी समितीचा निर्णय़ दादांच्या बाजूने लागला असे सांगत राष्ट्रवादीने एकट्या दादांसाठीच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी चव्हाणांना भाग पाडले. विधिमंडळाच्या डिसेंबरच्या अधेवशनात दादा उपमुख्यमंत्री म्हणून परतदेखील आले. पण पृथ्वीराज चव्हाणांच्या वाईट पद्धतीच्या कारभारामुळेच राज्यातील काँग्रेसचा धुव्वा उडाला आणि त्याचा फटका राष्ट्रवादीलाही बसला असा निष्कर्ष राष्ट्रवादीने मे 2014 मध्ये काढला आणि तातडीने ते सरकारमधून बाहेर पडले. तरीही विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांची निवडणूकपूर्व आघाडी व्हावी असे प्रयत्न व तशा वाटाघाटी सुरू होत्या. पण त्यातही अखेरच्या क्षणी चव्हाण स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कराडला निघून गेल्यामुळे बोलणी खुंटली व राष्ट्रवादीने स्वतंत्र लढण्याचा निर्णय़ घोषित करून टाकला.

हा सारा इतिहास घटत असताना दोन्ही काँग्रेसचे नेते एकमेकांच्या विरोधात कडवट टीका करत होते. लोकसभा निवडणुकीच्या आधीही राष्ट्रवादी मंत्र्यांनी आणलेल्या प्रस्तावांवर सह्या करताना मुख्यमंत्र्यांच्या (पृथ्वीराज चव्हाणांच्या) हाताला लकवा मारतो, अशी टीका स्वतः शरद पवारांनी केली होती. नाकाने कांदे सोलणारे व राष्ट्रवादीवर नसते आरोप करणारे चव्हाण रात्रीच्या वेळी वर्षा बंगल्यावर बसून कुणाच्या फायली कशा काढतात याची माहिती आपल्याकडे आहे असे अजितदादा सांगायचे. चव्हाण स्वतः काहीच न बोलता राष्ट्रवादीच्या विरोधातील कारवाया मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून सुरू ठेवायचे. अशा या तणावाच्या वातावरणात झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसचे पुन्हा वाटोळे झाले. त्यातही विधानसभेत काँग्रसचा एक आमदार राष्ट्रवादीपेक्षा अधिकचा निवडून आला होता. 42 काँग्रेस तर 41 राषट्रवादी, असे संख्याबळ विधानसभेत झाले. शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यानंतर सहाजिकच विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे येणार असे दिसत असताना राष्ट्रवादीने त्यात अडथळा आणला. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या तीन सदस्यांसह आमची संख्या 44 होते असा दावा करीत विरोधी पक्षनेतेपदावर हक्क सांगितला.

विधानसभेत काँग्रेसची सरशी होताना दिसतच होती. तेव्हा विधान परिषदेतील सभापतीपद आम्हालाच हवे अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली. तिथे तेव्हा शिवाजीराव देशमुख सभापतीपदावर होते. त्या आधी 2013 मध्ये त्यांची पुन्हा एकदा सदस्य म्हणून, नंतर पुन्हा एकदा सभापतीपदी नियुक्ती झालेली होती. तसे शिवाजीराव सलग 12 वर्षे विधिमंडळातील या सर्वोच्च पदावर राहिले. पण बदलल्या राजकीय समीकरणात राष्ट्रवादीला विधिमंडळातील एकतरी पद आपल्या ताब्यात असणे गरजेचे वाटत होते. त्यांनी शिवाजीरावांच्या पदावर डोळा ठेवला. त्याचवेळी त्या सभागृहात धनंजय मुंडे यांची नियुक्ती विरोधी पक्षनेता म्हणून राष्ट्रवादीने करून घेतलीच होती. सभापतीपदाचा राजीनामा द्या असा दबाव शिवाजीरावांवर होता. पण पक्षाचे निष्ठावान सैनिक ही भूमिका शिवाजीराव देशमुखांनी आपल्या साठ वर्षांच्या सार्वजनिक जीवनात नेहमीच कायम ठेवली होती. काँग्रेसने पदाचा राजीनामा न देता राष्ट्रवादीला अविश्वास ठराव आणण्यासाठी व तो मंजूर करून घेण्यासाठी सत्तारूढ भाजपाची मदत घेणे भाग पाडावे अशी चाल करण्याचे ठरवले होते. पण या साठमारीत एका सज्जन नेत्याच्या आजारपणाच्या काळात त्यांच्यावर अशाप्रकारे वाईट पद्धतीने पद गमावण्याची वेळ आली. शिवाजीराव देशमुखांना कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात विधान परिषद सभागृहात अविश्वास ठरावाला सामोरे जावे लागले. सुनील तटकरे, धनंजय मुंडे, हेमंत टकले या राष्ट्रवादीच्या सदस्यांनी हा अविश्वास ठराव आणला होता. त्यात भाजपाची भूमिका निर्णायक ठरणार होती. त्याप्रमाणे भाजपाने तटस्थ राहत राष्ट्रवादीला मदत केली व तो ठराव मंजूर होऊ दिला.

अलिकडच्या काळात अशाप्रकारे पदावरून विश्वास गमावून पायऊतार होण्याची वेळ कुणाच सभापतींवर आलेली नव्हती. ती शिवाजीरावांवर राष्ट्रवादीमुळे ओढवली, हे एक शल्य देशमुख साहेबांच्या मनात अखेरपर्यंत राहिलेच. ते पायऊतार झाल्यानंतर तिथे रामराजे निबांळकांराची निवड होण्याच्या वेळेसही भाजपाने राजकीय चाली रचल्या होत्या. त्यावेळी शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांना पराभव समोर दिसत असल्यामुळे त्यांना अर्ज मागे घ्यावा लागला होता. एका मोठ्या नेत्याचे निधन झालेले असताना त्यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत आघाडीमुळे चांगली संधी दिसते आहे हेही नसे थोडके!”
 

Continue reading

अवघ्या दोन तासांतच गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी मातीमोल!

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गुरुवारचा दिवस उजाडताच अत्यंत पडझडीचा ठरला आहे. कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारतीय शेअर बाजारात सकाळी ९ वाजल्यापासूनच 'भूकंप'सदृश स्थिती पाहायला मिळाली. सुरुवातीच्या अवघ्या दोन तासांच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे सुमारे ९ लाख कोटी रुपये मातीमोल झाले....

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग ‘वेपिंग’ करताना कॅमेऱ्यात कैद!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या चालू हंगामात राजस्थान रॉयल्सने मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला असला, तरी सध्या चर्चा मात्र त्यांच्या विजयाची नाही, तर कर्णधार रियान परागच्या एका वादग्रस्त कृत्याची होत आहे. ड्रेसिंग रूममध्ये बसलेला असताना रियान पराग 'वेपिंग' (ई-सिगारेटचा...

सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत माओवादी इस्रायल पूर्ती ठार

झारखंडमधील पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील सारंडा वनक्षेत्रात सुरक्षादलांसोबत झालेल्या भीषण चकमकीत 'पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडिया' (पीएलएफआय)चा सक्रिय सदस्य आणि १ लाख रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी इस्रायल पूर्ती मारला गेला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, कोब्रा २०९ बटालियन, झारखंड पोलीस...
Skip to content