HomeArchiveरोखठोक राज ठाकरे

रोखठोक राज ठाकरे

Details
रोखठोक राज ठाकरे

    07-Dec-2018

| 1

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

प्रसाद केरकर, मुख्य संपादक, दै. कृषिवल

prasadkerkar73@gmail.com

ठाकरे घराण्यातील रोखठोकपणा काही नवीन नाही. बाळासाहेब ठाकरे यांची तर रोखठोकपणाबद्दल ख्यातीच होती. बाळासाहेब कधी कोणाच्या तोंडावर काय सुनावतील याची खात्री नसायची. बाळासाहेबांचे वडिल प्रबोधनकारांचा तर रोखठोकपणाबाबत कुणीच हात धरू शकत नाही. त्यांनी अंधश्रध्दा व देवाधर्मावर एव्हढी जहरी जाहीर टीका केली आहे व लिहून ठेवली आहे की त्यातून त्यांचा स्पष्टवक्तेपणा सर्वांनाच जाणवतो. मात्र या ठाकरे घराण्यात उद्धव ठाकरे यांचा स्पष्टवक्तेपणा अजून तरी काही दिसत नाही. उलट सत्तेत राहून सत्तेचा मलिदा लाटत आपल्या सहकारी पक्षावर टीका करून आपण विरोधातच आहोत असे भासवून ते दोन्ही बाजूने ढोलकी बडवत असतात. त्याउलट त्यांचे चुलत बंधू राज ठाकरे रोखठोक आहेत.

एव्हढे सर्व सांगण्याचे निमित्त एव्हढेच होते की, राज ठाकरेंनी रविवारी उत्तर भारतीय महापंचायततर्फे आयोजित केलेल्या सभेत जोरदार भाषण केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे हे ठाकरी भाषेतील भाषण हिंदीतून झाले. आपल्या वडिलांना उत्तम हिंदी व उर्दू येत होते याची आठवण करून देत त्यांनी हिंदी ही सुंदर भाषा असली तरी ती राष्ट्रभाषा नाही. मुळात तसा निर्णयच कधी झालेला नाही. मी तुमच्यासमोर स्पष्टीकरण द्यायला आलो नाही. आयोजकांना माझी भूमिका उत्तर प्रदेश-बिहारमध्येही दाखवायची आहे म्हणून मी हिंदीत बोलत आहे, अशी सुरूवात करून ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना खडे बोल ऐकवले. आपलीच जुनी भूमिका मांडावयास आलो आहेत असे त्यांनी सांगितले असले तरी त्यांना हिंदी मतपेढीत शिरावयाचे असल्यानेच त्यांनी हे भाषण केले असे म्हणावे लागेल.

उत्तर भारतीयांच्या सभेत राज ठाकरे यांनी हातचे काहीही न राखता आपला स्पष्टवक्तेपणा दाखवून दिला असला तरी मुळात या कार्यक्रमामागील ठाकरे यांचा हेतू काय होता, अशीही चर्चा आता होणे स्वाभाविकच आहे. त्यांना उत्तर भारतीय मतपेढीमध्ये शिरकाव करायचा आहे, की उत्तर भारतीयांबाबतची कठोर भूमिका पुन्हा दाखवून मराठी मतदारांमधील विश्‍वास बळकट करायचा आहे, या प्रश्‍नांची उत्तरे आताच देता येणार नाहीत. राजसाहेबांनी या सभेत मांडलेले मुद्दे हे सर्वांनाच पटण्यासारखे आहेत. स्थानिक विरूध्द बाहेरून आलेले हा संघर्ष काही नवा नाही. इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यात हा संघर्ष झाला आहे. हे सांगताना त्यांनी देशा-विदेशातील इतिहासातली व आताची अनेक उदाहरणे दिली. त्यामुळे या सभेसाठी राज ठाकरेंनी चांगलेच होमवर्क केले होते, हे स्पष्टपणे जाणवले.

सच कडवा है, वो समझना चाहिये… आपको भी, अशी सुरूवात करून राज ठाकरे आपली भूमिका ठोसपणाने मांडत गेले. स्थानिक लोक रोजगारापासून वंचित होणार नाहीत हे पाहायला हवे, असे इंदिरा गांधी यांनीच म्हटले होते. उत्तर प्रदेश-बिहार येथील उद्योगांमध्ये तेथील लोकांना प्रथम प्राधान्य मिळाले पाहिजे. तसेच महाराष्ट्रातल्या उद्योगांमध्ये मराठी व्यक्तींना प्राधान्य मिळालेच पाहिजे; मात्र महाराष्ट्रातील रेल्वे नोकरभरतीच्या जाहिराती उत्तर प्रदेश-बिहारमध्ये प्रसिद्ध होतात. नोकरभरतीत स्थानिकांना प्राधान्य, फेरीवाल्यांची समस्या या बाबी आम्ही उत्तर भारतीयांना सांगायला गेलो तेव्हा आमच्याशी बोलताना अत्यंत वाईट भाषा वापरली गेली. त्याचमुळे संघर्ष झाला, असेही त्यांनी आपण केलेल्या हिंसाचाराचे स्पष्टीकरण दिले.

सभेच्या सुरूवातीला आपण स्पष्टीकरण देण्यासाठी आलेलो नाही असे जरी त्यांनी सांगून अब्राहम लिंकन यांचे यासंबंधीचे म्हणणे सांगितले असले तरीही राज ठाकरे यांची ही सभा ही स्पष्टीकरणासाठीच होती, असे म्हणावे लागेल. पंडित नेहरू ते थेट नरेंद्र मोदींपर्यंत अनेक पंतप्रधान उत्तर प्रदेशातून निवडून आले, तरीही त्या राज्याचा विकास झाला नाही. नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांना स्थलांतर करावे लागते. इतर राज्यांत जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मारहाण, अपमान सहन करावा लागतो. आपल्या राज्यांचा विकास का केला नाही, असा प्रश्‍न तुम्ही या नेत्यांना का विचारत नाही? तुमचा स्वाभिमान गेला कुठे? अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांवर प्रश्‍नांची सरबत्ती केली, यात चूक असे काहीच नाही. या प्रश्‍नांची उत्तरे राज्यकर्त्यांनी दिलीच पाहिजेत.

संघर्ष करायची मला इच्छा नाही, पण परिस्थिती बदलली नाही, तर राज्याराज्यांत संघर्ष होईल. म्हणून सांगतो, तुम्ही तुमच्या नेत्यांना उत्तर प्रदेश, बिहारची स्थिती सुधारायला सांगा. साठीच्या दशकात दाक्षिणात्यांच्या लोंढ्यांविरोधात मुंबईत आंदोलने झाली. त्यानंतर, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेशसारख्या राज्यांनी उद्योगात प्रगती केली आणि लोंढे थांबले, हे राज ठाकरे यांचे म्हणणे काही खोटे नाही. आता उलट अशी स्थिती आहे की, उच्चशिक्षित मराठी मुले आज बेंगळुरू, हैद्राबाद, चेन्नई येथे जाऊन नोकर्‍या करीत आहेत. प्रत्येक राज्यात तेथील प्रादेशिक, भाषिक अस्मितेसाठी संघर्ष होतात. रोजगार जिकडे उपलब्ध असतो तिकडे लोकांचे तांडे पोहोचताच. यासाठी औद्योगिकीकरणाचे केंद्रीकरण नको आहे तर विक्रेंद्रीकरण झाले पाहिजे. स्थानिकांना आपल्या परिसरात जर रोजगार मिळाला तर ते बाहेरच्या राज्यात जातीलच कशाला, हा राज ठाकरेंचा सवाल काही चुकीचा नाही. स्थानिकांना रोजगारात प्राधान्य दिले पाहिजे या राज ठाकरेंच्या मागणीतही तथ्य आहे. एकूणच पाहता, राज ठाकरे यांच्या रोखठोक भाषणाने अनेक गैरसमज दूर होतील, यात काही शंका नाही. यातून हिंदी भाषिकांच्या मतपेढीत त्यांनी हात घातला आहे. त्याचबरोबर त्यांना कदाचित भाजपाविरोधी महाआघाडीचे दरवाजेही खुले होऊ शकतील.”
 

Continue reading

आधार कार्डाचे स्वरूप आहे तसेच राहणार!

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाद्वारे (UIDAI) देण्यात येत असलेल्या आधार कार्डाच्या स्वरूपात कोणत्याही पद्धतीचे बदल करण्यात येणार नाहीत. तसे बदल करण्याचे कोणतेही नियोजन नाही, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत आधार कार्डाचे स्वरुप बदलले जाऊ शकते. त्यावर केवळ एक...

सोन्याच्या दरात होणार मोठी उलथापालथ?

भारतातील सोन्याच्या बाजारात सध्या मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. बँकांनी सोन्याच्या नव्या आयातीला पूर्णपणे स्थगिती दिली आहे. यामुळे अनेक टन सोने कस्टममध्ये अडकून पडल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्यातील सोन्याची आयात गेल्या ३० वर्षांतील...

‘नीट’ परीक्षेत ‘फिजिक्स’ने केले विद्यार्थ्यांना हैराण!

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) तर्फे घेण्यात आलेली 'नीट-युजी २०२६' ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा रविवारी देशभरात पार पडली. यंदा साधारण २३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. प्राथमिक विश्लेषणानुसार, यंदाचा पेपर गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीसा कठीण आणि वेळखाऊ होता. विषयनिहाय...
Skip to content