Details
टीकाकारांना उत्तर कृतीतूनच!
28-May-2019
| 0
”
अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
aniketsjoshi@hotmail.com
पंतप्रधानपदावर पुन्हा आरूढ होण्याची पहिली पायरी होती ती नेतेपदावरची निवड. ती झाली. त्यानिमित्ताने नरेंद्र मोदी यांनी नवीन कार्यकाळातील संसद भवनातील आपले पहिले भाषण केले. 2014 मध्ये संसदेच्या याच मध्यवर्ती सभागृहात त्यांची निवड राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते म्हणून झाली होती. त्यावेळीही त्यांनी इथेच आपले पहिले भाषण केले होते. त्या बैठकीचे वैशिष्ट्य असे असते की जरी भावी पंतप्रधान संसदीय पक्षाच्या सदस्यांशी संवाद साधत असले तरी सारा देश ते भाषण पाहत व ऐकत असतो. त्यामुळे तो देशाबरोबरचाही संवाद असतो. मागील वेळी खासदार बनल्यानंतर त्या बैठकीच्या निमित्तानेच ते सर्वात प्रथम संसदेच्या पायऱ्या चढत होते. त्यावेळी त्यांनी जमिनीवर गुढघे टेकून नतमस्तक होत संसंद भवनाला वंदन केले होते. ती त्यांची छबी प्रचंड गाजली होती. 2014 नंतर पाच वर्षे ते संसदेतूनच देशाचा कारभार हाकत होते. आता 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा जोरदार मताधिक्याने, अधिक संख्येने निवडून आलेल्या सहकाऱ्यांच्या पाठबळासह ते सत्तास्थानी पोहोचले आहेत. यावेळी मोदींची दुसरी एक तसबीर देशापुढे आली आणि तीही पहिल्या नमस्काराइतकीच महत्त्वाची ठरली आहे. यावेळी मध्यवर्ती सभागृहात नियोजित कामकाज सुरू होण्याआधी मोदींनी तिथे ठेवलेल्या भारतीय राज्यघटनेच्या पुस्तकाला वाकून अभिवादन केले. हा एक निराळ्या प्रकारचा संदेश देणेच होय.
मध्यवर्ती सभागृहातील राज्यघटनेची प्रत ही ऐतिहासिक महत्त्वाची आहे. त्यावर घटना लेखन समितीच्या सदस्यांच्या, बाबासाहेब आंबेडकरांसह सर्वांच्या, हस्ताक्षरांचेही दर्शन होतं. या ग्रंथाला नमन करतानाच मोदींनी एक महत्त्वाचा संदेश त्यांच्या समर्थकांना तसेच विरोधकांनाही दिलेला आहे. या निवडणुकीतील मोदींच्या विरोधातील प्रचाराचा एक महत्त्वाचा मुद्दा हाच होता की घटनेचा आदर मोदी करत नाहीत, बाबासाहेबांची राज्यघटना ते बदलणार आहेत, म्हणून त्यांना मते देऊ नका. हा प्रचाराचा एक विखारी रोख होता. विजयी झाल्यानंतर मोदींनी काहीही न बोलता, केवळ एका लहान पण लक्षणीय कृतीमधून ते आरोप कसे फोल होते हेच दाखवून दिले. त्यांनी भारतीय राज्यघटनेला वाकून नमस्कार तर केलाच पण नंतर भाषणामध्ये वारंवार बाबासाहेबांच्या मेहनतीमधून साकारलेली राज्यघटना हीच आपल्याला मार्गदर्शक ठरणार आहे, हे सांगितले.
आपण राज्यघटना आणि महात्मा गांधी, राम मनोहर लोहिया आणि दीनदयाळ उपाध्याय या विभुतींनी दाखवलेल्या मार्गांवरूच पढे जाणार आहोत हेही मोदींनी सांगितले. त्यांच्या विरोधातील अनेक मुद्दे त्यांनी यातून उधळून लावले. राम मनोहर लोहियांचा उल्लेख संसदेत कितीतरी दिवसानंतर प्रथमच झाला. नीतीश कुमारांच्या सर्वच समाजवादी सहकाऱ्यांना सुखावणारी ती बाब नक्कीच होती! महात्मा गांधींचे विचार व मार्गदर्शन यांचा उल्लेख मोदी नेहमीच करतात. महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील स्वच्छ भारत निर्माण करणे हा एक महत्त्वाचा कार्यक्रम मोदींनी हाती घेतलेलाच आहे. या तीनही विभुतींनी गरीब माणसाचाच विचार करायला शिकवले. तेच आपेल ध्येय्य असायला हवे, गरिबाला गरिबीमधून वर काढण्यावरच आपल्या कारभाराचा भर राहील हेही मोदींनी स्पष्ट केले. मोदींची निवड राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतेपदी करण्याची नवी औपचारिक बैठक या ऐतिहासिक सभागृहात पार पडली तेव्हा नव्या खासदारांना उद्देश्यून असे जे विचार व्यक्त केले त्यातूनच त्यांच्या नव्या कारभाराची दिशाही स्पष्ट झाली. त्या बैठकीसाठी भाजपा व एनडीएचे सारे मुख्यमंत्री उपस्थित होते. सर्व घटक पक्षांचे नेते उपस्थित होते. त्यात आपले देवेन्द्र फडणवीस पहिल्या रांगेत तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व्यासपीठावर हजर होते. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसह नीतीश कुमार आदी रालोआतील अन्य घटक पक्षांच्या नेत्यांचीही हजेरी व्यासपीठावर होतीच.
मोदींच्या भाषणातून हेही जाणवत होते की ते अत्यंत मनापासून व तळमळीने संवाद साधत आहेत. सतराव्या लोकसभेमध्ये भाजपा व रालोआच्या नव्या खासदारांची संख्या मोठी आहे. त्यांना सावधतेचे अनेक इशारे मोदींनी दिले. मोदी म्हणाले की, दिल्लीत तुम्हाला बोलते करण्याच्या प्रयत्नातील भरपूर पत्रकार भेटतील. तुम्ही या बैठकीमधून बाहेर पडाल तेव्हा समोरच हातात माईकचे दांडे घेऊन अन् वह्या पेन सावरत अनेक लोक उभे असलेले दिसतील. मोदी म्हणाले की मी जेव्हा नवा होतो तेव्हा माझ्यासारख्या सर्वांनाच अटलजी व अडवाणींजी सांगत असत की छपाश आणि दिखाशपासून सावध राहा. तुमचे नाव छापून येते आणि तुम्ही टीव्हीच्या पडद्यावर दिसता या दोन बाबींचा मोह मोठा असतो. त्यापासून वाचलात तर पुढे जाऊ शकाल. मोदींनी म्हटले की तुम्हाला प्रश्न विचारणे हे त्यांचे कामच असते. त्यांना छापण्यासाठी व दाखवण्यासाठी नित्य नवा मसाला हवाच असतो. सुरूवातीला त्याने तुम्हाला बरेही वाटेल. तुमचे नाव फोटो छापून येतो, तुम्ही टीव्हीत चमकता याचा आनंदही असतो. मग नंतर हळूहळू तुम्हाला त्याची इतकी सवय जडेल. काहीही संबंध नसणाऱ्या बाबींविषयी तुम्ही मते व्यक्त करू लागाल. त्यातून काय होते की मूळ घटना राहते बाजूला आणि तुम्ही जे बोलतात त्यातूनच नवा वाद जन्माला आलेला असतो. त्याचा मोठा त्रास पक्षाला होतो. ते सारे टाळता येते जर तुम्ही छपाश आणि दिखाशपासून बचाव कराल, असा एक कानमंत्रच मोदींनी साऱ्या मंडळींना दिला.
दिल्लीत कार्यरत असणाऱ्या एका टोळीविषयी मोदींनी नव्या खासदारांना सावध केले तेही महत्त्वाचे होते. ते म्हणाले की, तुम्ही नवे खासदार असता तुम्हाला काहीच माहिती नसते. कुठे जायचे, काय करायचे, जेवायचे कुठे, सारेच प्रश्न असतात. तुम्ही रेल्वेतून वा विमानतळातून बाहेर पडताच हसऱ्या चेहऱ्याने कुणीतरी पुढे येतो. आपण अमुकअमुक खासदार ना? या.. तुमचे दिल्लीत स्वागत आहे. तुम्हाला बरे वाटते. तुम्ही त्याची गाडी घेता. तो तुम्हाला कुठे जेवण चांगले मिळते ते सांगतो. तुम्हाला कुठे जायचे तिकडे तो बरोबर घेऊन जातो. तुम्ही त्याच्यावर अवलंबून राहू लागता. तिथेच घोटाळा होतो. तुमचा विश्वास संपादन केला की त्याचे खरे काम सुरू होते. अशा दलालांपासून सुरूवातीलाच दूर व्हा. एकदा त्याची सवय तुम्हाला झाली तर मग तुम्ही वाचू शकत नाही असेही मोदींनी बजावले.
मोदी हे पक्षातील मोठ्या नेत्यांची अवहेलना करतात. अडवाणी, मुरली मनोहर जोशी, अशांना नाकारतात अशा प्रचारातील मुद्द्यांनाही मोदींनी कृतीनेच उत्तर दिले. जुन्या भाजपा पक्षाध्यक्षांच्या बरोबरीने जोशी, अडवाणी हेही व्यासपीठावर विराजमान होते. इतकेच नाही तर मोदींनी खाली वाकून नमस्कार करत त्यांचे आशिर्वाद घेतले हेही लक्षणीय होते.”

