HomeArchiveखासदार रिपीट न...

खासदार रिपीट न होण्याची पद्धत कायम राहणार?

Details
खासदार रिपीट न होण्याची पद्धत कायम राहणार?

    25-Apr-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार
atulm2001@gmail.com
नाशिक लोकसभा मतदारसंघात आता प्रचार शिगेला पोहचला असून राष्ट्रवादीचे समीर भुजबळ की शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आपली जागा कायम राखणार याची सर्वाना उत्सुकता लागली आहे

शरद पवारांना मानणारा हा जिल्हा आहे असे म्हटले जायचे. 1985 ला पवारांच्या नेतृत्त्वाखाली पुलोदने जिल्ह्यातील सर्वच्या 14 जागा जिंकल्या होत्या. तेव्हापासून जिल्ह्यात पवारांना मानणारा मोठा वर्ग असल्याचे आजही चर्चिले जाते. 2014 मध्ये मोदी लाटेत अनेक पक्षांचा पालापाचोळा झाला आणि पवार यांच्या हातातून हा जिल्हा निसटला. पण यावेळी पवार आणि त्यांचे कार्यकर्ते इरेला पेटले आहेत. जिल्ह्यात भाजपा आणि शिवसेनेला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपा आणि शिवसेनेची चलती राहिली. त्यामुळे अनेक नाराज आणि सत्तेच्या लोभापायी भाजपात दाखल झाले.

गेल्या साडेचार वर्षांत मात्र राजकारणाचे अनेक संदर्भ बदलले. भाजपच्या कारभारावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे लोकांचा भाजपावरचा विश्वास उडू लागल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेनेतर्फे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे पण, गोडसे यावेळी लोकसभेपेक्षा विधानसभा लढविण्यास इच्छूक होते. यात तथ्य किती हे समजले नसले तरी नाशकात विद्यमान खासदार रिपीट होत नाही असे गेल्या अनेक निवडणुकांपासून सिद्ध होत असल्याने ती धास्ती कुठेतरी त्यांच्या मनात घर करून असण्याची शक्यता आहे.

शिवसेना आणि भाजपची युती झाल्यामुळे भाजपातील नाराज माणिकराव कोकाटे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. अर्थात कोकाटे याना मानणारा वर्गसुद्धा मोठा आहे. पक्षविरहित आणि कोकाटे यांना मानणारा हा मतदार कोणासाठी फायद्याचा ठरतो यावर सर्व अवलंबून आहे. शिवसेना, पुन्हा काँग्रेस आणि आता भाजपा असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. भाजपा आणि शिवसेना स्वतंत्र लढतील आणि आपणास भाजपाची उमेदवारी मिळेल असे गृहीत धरून माणिकराव यांनी वर्षभरापासून प्रचाराचा धुराळा उडवून दिला होता. पण त्यांच्या या स्वप्नावर पाणी फेरले गेले. त्यातच मी काँग्रेस सोडली नसती तर मी मंत्री झालो असतो असे त्यांनी केलेले विधान आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माणिकराव यांना राष्ट्रवादीत येण्याचे दिलेले आमंत्रण यामुळे त्यांची अपक्ष उमेदवारी कोणासाठी लाभदायक हे मतदारसंघात सर्वाना माहित आहे.

राष्ट्रवादीतर्फे छगन भुजबळ यांनीच निवडणूक लढवावी अशी गळ त्यांना घातली गेली होती. मात्र गेल्या निवडणुकीचा अनुभव आणि दगाफटका होण्याची शक्यता याचा विचार करता त्यांच्यासाठी विधानसभा हाच उत्तम पर्याय राहील म्हणून समीर भुजबळ यांना उमेदवारी देण्यात आली. वास्तविक समीर भुजबळ यांनी गेली वर्षभर तयारी सुरू केली होती. या मतदारसंघात भुजबळ यांना मानणारा मोठा वर्ग आहे. जातीय समीकरणाचा विचार करता भुजबळ यांच्यासाठी फारसा कठीण प्रसंग दिसत नाही. विद्यमान खासदार हेमंत गोडसे त्यांच्या गेल्या कारकीर्दीत कामे मार्गी लागली असली तरी अनेक कामे प्रलंबित असल्याचे या मतदारसंघात फिरताना मतदाराकडून समजले. त्यामुळे नाराजी स्वाभाविक आहे. त्यातच पक्षांतर्गत नाराजी आणि भाजपची कितपत मनापासून साथ मिळणार यावर सर्व अवलंबून आहे.

या मतदारसंघात नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, देवळाली, सिन्नर आणि इगतपुरी या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. यापैकी तीन मतदारसंघ भाजपकडे दोन शिवसेना तर एक काँग्रेसकडे आहे. त्यामुळे सध्या तरी भाजपा आणि युतीचे पारडे या मतदारसंघात जड वाटते. परंतु गेल्या काही दिवसात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. भाजपला गटबाजीने ग्रासले आहे. शिवसेनेतही ताळमेळ नाही. त्यामुळे सारे काही त्रांगडेच आहे. मनसेचा अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीला मिळणारा पाठिंबा निर्णायक ठरणार आहे.

अण्णासाहेब कवडे यांचा अपवाद वगळता नाशिक लोकसभा मतदारसंघातून सलग दोनवेळा निवडून येण्याचे भाग्य कुणालाच लाभलेले नाही. 1952 ला गो. ह. देशपांडे यांनी ही जागा जिंकली होती. 1957 ला संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे दादासाहेब गायकवाड यांनी बाजी मारली होती. 1962 मध्ये गो. ह. देशपांडे विजयी झाले. परंतु नंतर त्यांच्या अकाली निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत देशाचे तत्कालीन सरंक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांना बिनविरोध निवडून देण्याचा मोठेपणा याच मतदारसंघाने दाखविला होता. त्याचे बक्षीस म्हणून चव्हाण यांनी नाशिकला एच. ए. एल. प्रकल्प नाशिकला दिला. 1967 आणि 1971 ला अण्णासाहेब कवडे निवडून आले. 1977 ला जनता पक्षाच्या राजवटीत शेकापचे विठ्ठलराव हांडे, 1980 ला काँग्रेसचे डॉ. प्रतापराव वाघ, 1984 ला काँग्रेसचे मुरलीधर माने, 1989 ला भाजपाचे डॉ. दौलतराव आहेर, 1991 ला काँग्रेसचे डॉ. वसंत पवार, 1996 ला शिवसेनेचे राजाभाऊ गोडसे, 1998 ला काँग्रेसचे माधवराव पाटील, 1999 ला शिवसेनेचे एड. उत्तमराव ढिकले, 2004 ला राष्ट्रवादीचे देविदास पिंगळे, 2009 ला राष्ट्रवादीचे समीर भुजबळ तर, 2014 ला शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना नाशिककरांनी निवडून दिले. 1980 पासून विद्यमान खासदार रिपीट झालेला नाही हे या मतदारसंघाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ही परंपरा कायम राहणार की गोडसे ती मोडणार हे पाहणे रंजक ठरेल.”
 

Continue reading

‘तांदळाची कूटनीती’ वापरत भारताची चीन-अमेरिकेला टक्कर

जागतिक स्तरावर ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रासाठी अत्यावश्यक ठरत असलेल्या “क्रिटिकल मिनरल्स”च्या शर्यतीत भारताने आता आफ्रिकेकडे धोरणात्मक पाऊल टाकले आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत भारत केवळ खनिजांसाठी गुंतवणूक करत नाही, तर “तांदळाची कूटनीती” (राईस डिप्लोमसी) वापरत आफ्रिकन देशांशी संबंध...

इराण-अमेरिकेतला तणाव आणि इतर अनेक संक्षिप्त…

इराण आणि अमेरिकेतला तणाव वाढला आहे. इराणचा १४ मुद्द्यांचा नवीन प्रस्ताव अमेरिकेने फेटाळला. अमेरिकेच्या ९ मुद्द्यांच्या प्रस्तावाला इराणने हे उत्तर दिले होते. आपल्या अटी मान्य झाल्यावरच आण्विक कार्यक्रमावर चर्चा करण्याची तयारी इराणने दाखवली होती. दरम्यान, एडनच्या आखातात हल्लेखोरांनी एका...

मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्यास भाग पाडणारे पत्रकार अभय मोकाशींचे निधन

इंग्रजी पत्रकारितेत आपल्या शोधपत्रकारितेचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांचे काल, शनिवारी रात्री उशिरा मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील श्रीकृष्ण नगरातील डॉ. अनिता मयेकर यांच्या माऊली इस्पितळात निधन झाले. वयाच्या ६९व्या वर्षात पदार्पण करण्यास जेमतेम एक तास उरला असताना...
Skip to content