HomeArchiveअण्णा हजारे जिंकले...

अण्णा हजारे जिंकले की हरले?

Details
अण्णा हजारे जिंकले की हरले?

    06-Feb-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
shail.dinman@gmail.com
अण्णा हजारे यांनी अखेर उपोषण मागे घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई कामी आली. पण अण्णा जिंकले की हरले? या प्रश्नावर आता चर्चा होत राहील. गिरीश महाजनांना अण्णांनी यावेळी दुत्कारले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्या मनातून उतरले आहेत, अशी भाषा अण्णा सोमवारीच बोलत होते. मग सात दिवसांच्या आमरण उपोषणानंतर तब्बल सहा तास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अशी कोणती चर्चा बंद दाराआड अण्णांनी केली असावी की त्यांची फडणवीस यांच्याबद्दलची मते अवघ्या २४ तासांत बदलली. अण्णा ही देशाची संपत्ती आहे, असे फडणवीस त्यांच्याबद्दल संयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले. मग देशाची संपत्ती असलेल्या या ज्येष्ठाला सरकारने उपोषण कशासाठी करायला लावले, हा प्रश्न कुणी विचारला तर ते अयोग्य ठरणार नाही.

राज्यात लोकायुक्ताचा कायदा सक्षम करणं, केंद्रात लोकायुक्ताची नियुक्ती करणं आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन अण्णांनी उपोषण सुरू केलं होतं. पण त्यांच्या हातात आश्वासनांखेरीज काहीही पडलेले नाही. ही आश्वासने तर गिरीश महाजनही द्यायला तयार होते. मुख्यमंत्र्यांनी फक्त त्याला सकारात्मक कारवाईचं आश्वासन जोडलं की, अण्णांना आता मंत्री-संत्री चर्चेसाठी नको झाले आहेत, त्यांना मुख्यमंत्रीच यायला हवे होते हेही पाहवे लागेल. फडणवीस यांना अण्णांकडे चर्चेसाठी यावं लागलं, असा राळेगणसिद्धीवरून निघालेल्या एका पत्रकाचा सूर आहेच. अण्णांचा दुराभिमान, गंड ओळखून चाणाक्ष मुख्यमंत्र्यांनी नेमकी फुंकर घातली आणि अण्णांचे उपोषण फक्त आश्वासनांवरच संपले असेही आता म्हटले जाईल. मुख्यमंत्री अण्णांशी झालेल्या चर्चेनंतर काय म्हणाले ते बघा – “लोकपालची नियुक्ती करण्याची कारवाई सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आणि निगराणीखाली सुरू आहे. लोकपालसाठी सर्च कमिटीची बैठक 13 फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार लोकपालच्या नियुक्तीची प्रक्रिया पार पाडली जाईल.”

याशिवाय राज्य सरकारने लोकायुक्तच्या कायद्यासाठी संयुक्त मसुदा समिती नेमावी अशी मागणी अण्णांनी केली होती. तीही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. यात ठोस असे काहीच नाही. फक्त आश्वासनांची गुंडाळी आहे. फडणवीस म्हणतात की, “संयुक्त मसुदा समितीत अण्णांनी सुचवलेले काही सदस्य असतील. त्यांनी मसुदा तयार केल्यानंतर बजेट अधिवेशनात आम्ही तो कायद्याच्या स्वरुपात मांडू.” अण्णांनी सुचवलेले सदस्य घेण्याचे मान्य करून फडणवीस यांनी कुशलतेने त्यांच्यासमोरील पेचप्रसंग बिकट होण्याआधीच सोडवला आहे. राज्य कृषीमूल्य आयोगाला स्वायत्तता देण्याची अण्णांची आणखी एक मागणी होती. फडणवीस यांनी तीही मान्य केली आहे. त्यासोबतच कृषी क्षेत्रातील मागण्यांसंदर्भात उपाय शोधण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी समिती नेमण्याचं आश्वासन दिलं आहे. या समितीत अण्णांच्या बाजूने सोमपाल प्रतिनिधित्व करतील. ते कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष आहेत. शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेल्या किसान सन्मान योजनेतील मदतही वाढवण्याचे आश्वासन अण्णांना देण्यात आले आहे.

अण्णांच्या नजरेतून जे मुख्यमंत्री उतरले होते त्यांच्याच आश्वासनामुळे संतुष्ट असल्याचे सांगत अण्णांनी उपोषण सोडले. पण त्यांच्यासाठी दिल्ली, हरयाणा, गुजरातमधून आलेल्या मोजक्या समर्थकांचा मात्र आणखी भ्रमनिरास झाला असणार. मार्च, २०१८ मध्ये अण्णा नवी दिल्लीत रामलीला मैदानात उपोषणाला बसले होते. ते उपोषणही त्यांनी असेच आश्वासनांवर विसंबून सोडले होते. आताही आश्वासनेच अण्णांच्या हातात ठेवण्यात आली आहेत. जनतेच्या भल्यासाठी प्राण पणाला लावणारे अण्णा आता सहा महिने या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी वाट पाहणार आहेत. २०११ मधील अण्णांच्या दिल्लीतील आंदोलनानंतर देशाच्या नाहीतरी अनेकांच्या राजकारणाची, समाजकारणाची दिशा बदलली. अनेकजण हीरो झाले आणि अण्णा हे उपोषणकर्तेच राहिले. हा खेळ किंवा या सगळ्यातील फोलपणा अण्णांच्या लक्षात येत नसेल असे नाही. पण तरी ते वयाच्या ८८ व्या वर्षी लोकांच्या प्रश्नासाठी व्यवस्थेशी भिडतात, पुन्हा पुन्हा उपोषण करतात हे पाहिल्यावर अण्णांची फसवणूक केली जात आहे, असे म्हणवत नाही. अण्णा आता स्टंट करू लागले आहेत, त्यांचा इगो खूप मोठा झाला आहे, ते रा.स्व. संघासाठी, भाजपासाठीच उपोषणाचे नाटक करतात असे अनेक तर्कवितर्क सुरू असतात. पण हा माणूस उपोषण करतो, हट्टाला पेटतो, हे नाकारून कसे चालणार? अण्णाच म्हणतात की, लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी मोदी सरकारला त्यांनी आजपर्यंत 43 पत्रे लिहिली. पण आजवरच्या एकाही पत्राला पंतप्रधानांनी प्रतिसाद दिला नाही. आता पंतप्रधान कार्यालयाकडून प्रतिसाद आला तो शुभेच्छा.. असा एका ओळीचा होता. ही जी काही संवेदनशून्यता वा निगरगट्टपणा आहे तो व्यवस्थेतून संपवायचा असेल तर अण्णा जिंकले की हरले हा काथ्याकूट चालणार नाही. व्यवस्था अस्वस्थ व्हायला हवी असेल तर ही अण्णागिरी आणखी हवी, खूप खूप व्हायला हवी.”
 

Continue reading

अवघ्या दोन तासांतच गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी मातीमोल!

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गुरुवारचा दिवस उजाडताच अत्यंत पडझडीचा ठरला आहे. कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारतीय शेअर बाजारात सकाळी ९ वाजल्यापासूनच 'भूकंप'सदृश स्थिती पाहायला मिळाली. सुरुवातीच्या अवघ्या दोन तासांच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे सुमारे ९ लाख कोटी रुपये मातीमोल झाले....

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग ‘वेपिंग’ करताना कॅमेऱ्यात कैद!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या चालू हंगामात राजस्थान रॉयल्सने मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला असला, तरी सध्या चर्चा मात्र त्यांच्या विजयाची नाही, तर कर्णधार रियान परागच्या एका वादग्रस्त कृत्याची होत आहे. ड्रेसिंग रूममध्ये बसलेला असताना रियान पराग 'वेपिंग' (ई-सिगारेटचा...

सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत माओवादी इस्रायल पूर्ती ठार

झारखंडमधील पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील सारंडा वनक्षेत्रात सुरक्षादलांसोबत झालेल्या भीषण चकमकीत 'पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडिया' (पीएलएफआय)चा सक्रिय सदस्य आणि १ लाख रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी इस्रायल पूर्ती मारला गेला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, कोब्रा २०९ बटालियन, झारखंड पोलीस...
Skip to content