मुंबईच्या शिवाजी पार्क येथील मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला यंदा शिवसेनेला जागा दिली जाईल, अशी शक्यता जाणकार वर्तवित आहेत.
शिवसेनेच्या दरवर्षी होणाऱ्या दसरा मेळाव्याला हे मैदान मिळावे याकरीता शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेकडे मागणी केली असल्याचे कळते. तशीच मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनीही केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाने आज मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांकडे शिवाजी पार्कचे मैदान आपल्याला मिळावे यादृष्टीने दोन दिवसांत निर्णय घ्यावा, असा अल्टिमेटमही दिला आहे. दोन दिवसांत यावर निर्णय झाला नाही तर आपण पुढची भूमिका जाहीर करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मागच्या दसरा मेळाव्यातही शिवाजी पार्कच्या मैदानावर शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून दावा करण्यात आला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हे मैदान देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला होता. त्याला ठाकरे गटाने न्यायालयात आव्हान दिले आणि न्यायालयाने ठाकरे गटाला हे मैदान दिले. त्यानंतर ठाकरे गटाचा शिवसेना मेळावा शिवाजी पार्कवर झाला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मेळावा बीकेसीच्या मैदानावर घेतला. यावेळीही या मैदानावर शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून दावा केला जात आहे. मात्र या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचे नाव अधिकृतरित्या मिळाले आहे. त्यामुळे शिवसेना म्हणूनच मुख्यमंत्री शिंदे यांच्या दाव्याकडे पाहिले जाईल. परिणामी हे मैदान शिवसेनेला म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मेळाव्यासाठी दिले जाईल, अशी शक्यता जाणकार वर्तवित आहे.
राज्य सरकारमधले मंत्री शंभूराज देसाई यांनीदेखील शिवाजी पार्क मैदान शिवसेनेलाच मिळणार असल्याचा दावा केला आहे. सर्व कागदपत्रांसह आम्ही ही जागा मिळावी म्हणून मुंबई महापालिकेकडे अर्ज केला असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री अब्दुल सत्तार यांनीही अशा स्वरूपाचा दावा केला आहे.