Homeटॉप स्टोरीविधिमंडळ अधिवेशन गुंडाळण्याचा...

विधिमंडळ अधिवेशन गुंडाळण्याचा सरकारचा प्रयत्न?

राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे प्रकरण, वीज तोडण्याची प्रकरणे, अशा विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे अधिवेशन किमान चार आठवड्यांचे असावे अशी मागणी आम्ही केली आहे. परंतु, विधिमंडळाचे अधिवेशन लगोलग गुंडाळण्याची मानसिकता सरकारची दिसत आहे. त्यामुळेच त्यांनी अधिवेशनाबाबत निर्णय घेण्यासाठी दर आठवड्याला कामकाज सल्लागार मंडळाची बैठक घेण्याचे ठरवले आहे. पर्यायाने बैठका भरपूर आणि कामकाज किती, हा प्रश्न कायम राहणार आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी केली.

राज्य विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आज विधानभवनात झाली. या बैठकीनंतर ते प्रसिद्धीमाध्यमांशी बोलत होते. आजच्या बैठकीत फक्त एक मार्च ते आठ मार्चपर्यंतचा कार्यक्रम निश्चित झाला. त्यावरही चर्चा करण्यासाठी येत्या २५ तारखेला पुन्हा बैठक बोलावण्यात आली आहे. या सरकारची नेमकी मानसिकता काय आहे हे कळत नाही. कोरोना सर्वत्र आहे. संसदेचे अधिवेशन चालू आहे. पहिला टप्पा झाला. दुसरा आठ तारखेपासून चालू होणार आहे. तेथे चर्चा व्यवस्थितपणे होत आहेत. मात्र येथे चर्चा टाळण्यासाठी सरकार पळ काढण्याच्या मनःस्थितीत आहे, असे ते म्हणाले.

हे तर घाबरट सरकार

विधानसभेच्या अध्यक्षांची निवड कधी होणार हे राज्यपालांनी सरकारला विचारले आहे. खरे तर विधानसभेचे अध्यक्ष कधी निवडायचे हे ठरविण्याचा अधिकार राज्यपालांचा आहे. पण त्यांनी सरकारला कधी करणार हे सांगण्याची मुभा दिली आहे. विधानसभेचा अध्यक्ष सिक्रेट बॅलेटने निवडला जातो. पण या सरकारकडे इतके प्रचंड बहुमत असताना सरकार घाबरत का आहे, हा प्रश्न आहे. आपल्याच आमदारांना इतके घाबरणारे सरकार मी पहिल्यांदाच पाहतो आहे. हे घाबरट सरकार आहे. हे सरकार आपल्याच आमदारांना घाबरत असल्याचे दिसत आहे. आपला उमेदवार पडतो की काय, याचीच सरकारला जास्त भीती आहे. यामुळे आमचे मनोरंजन होत आहे आणि सत्ताधारी आमदारांचे भले होत आहे, असे फडणवीस म्हणाले.

आम्हाला कोणत्या तोंडाने सांगता?

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आपण आपले राजकीय कार्यक्रम लहान करावेत, असे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत आम्हाला सांगितले. पण, आम्ही त्यांना सांगितले की, हे आधी आपण आपल्या सरकारमधल्या घटक पक्षांना सांगा. त्यांचे मोठमोठे कार्यक्रम आजही होत आहेत. ते आधी रोखा. आम्हाला कोणत्या तोंडाने सांगता, असा सवालही त्यांनी केला. घटकपक्षांना पूर्ण मोकळीक देणारे हे सरकार शिवजयंतीच्या कार्यक्रमांसाठी मात्र १४४ कलम लावत आहे, असेही ते म्हणाले.

हा तर पटोलेंचा पब्लिसिटी स्टंट

अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी पेट्रोल दरवाढीविरूद्ध ट्विट करावे. नाहीतर त्यांचे सिनेमे तसेच शूटिंग बंद पाडू असा इशारा काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. आता नवीनच ते अध्यक्ष झाले आहेत. असे इशारे दिले की दिवसभर पब्लिसिटी मिळते हे त्यांना माहित आहे. शूटिंग कोण आणि कसे बंद करू शकते? इथे कायद्याचे राज्य आहे. तुम्ही सत्तारूढ पक्षाचे आहात, याचा अर्थ असा नाही की तुम्ही मालक झालात, असे त्यांनी सांगितले.

नो वन किल्स जेसिका लाल..

वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याला पोलीस तयार नाहीत. त्यांच्यावर सरकारचा दबाव आहे. यवतमाळपासून अनेक ठिकाणचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. खरे तर असे पुरावे मिळविण्यासाठी पोलिसांना बरीच मेहनत करावी लागते. येथे तर मिळाले आहेत. पण कारवाई होत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. जेसिका लालवर एक चित्रपट निघाला होता. नो वन किल्स जेसिका.. तशी ही परिस्थिती आहे, असे त्यांनी सांगितले.

विजेची दरवाढ व परिस्थिती भयंकर..

विजेची भरमसाठ दरवाढ करणारे आणि भसरसाठ विजेची बिले पाठविणाऱ्या या सरकारने ७५ लाख लोकांना वीज तोडण्याच्या नोटिसा पाठविल्या आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे. यावर या अधिवेशनात आम्ही सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.

राज्यपालांनी केली विचारणा

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राज्य सरकारला एक पत्र पाठवून विधानसभेच्या अध्यक्षांची निवड कधी करणार आहात हे कळवायला सांगितल्याने सरकारच्या पायाखालची वाळू घसरल्याचे कळते. याबाबत आम्ही लकरच कळवू, असे थातूरमाथूर उत्तर देऊन सरकारने सध्यातरी स्वतःचा बचाव केला आहे. हे पद काँग्रेसकडेच राहणार असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे तर हे पद आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेनेने प्रयत्न चालविल्याचे कळते.

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content