केंद्र सरकारने नुकतेच सादर केलेले बजेट चांगले असूनही का कोसळला भारतीय बाजार? जाणून घेऊया यामागची पाच मुख्य कारणे…
कमकुवत जागतिक संकेत-
कमकुवत जागतिक संकेतांमुळे मुख्यतः आज भारतीय शेअर बाजारात विक्रीच्या माऱ्याने घसरण झाली. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनवर टॅरिफ जाहीर केल्यानंतर सोमवारी प्रमुख आशियाई बाजारपेठा घसरल्या. या टेरिफमुळे जागतिक आर्थिक वाढीवर परिणाम होऊ शकणाऱ्या व्यापक व्यापार युद्धाबद्दल चिंता निर्माण झाली आहे. जपानचा निक्केई आणि कोरियाचा कोस्पी प्रत्येकी 3 टक्क्यांनी घसरला.
“उत्कृष्ट बजेट असूनही, बाजारावर ट्रम्प टॅरिफ आणि वाढलेल्या जागतिक अनिश्चिततेमुळे या ‘प्रारंभिक शुल्काच्या फेऱ्यां’चा दबाव असेल,” असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणकार व्हीके विजयकुमार यांनी म्हटले आहे.
ट्रम्प टॅरिफमुळे सेंटीमेंट नकारात्मक-
कॅनडा आणि मेक्सिकोवर अमेरिकेने लादलेले 25 टक्के शुल्क जागतिक व्यापाराचे समीकरण बिघडवण्याची भीती आहे. अमेरिकेचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार चीनकडून होणाऱ्या आयातीवरही 10 टक्के शुल्क लावण्यात आले आहे. चीननेही प्रत्युत्तरादाखल अमेरिकी आयातीवर दरवाढ सुरू केली आहे. ट्रम्पच्या टॅरिफ धोरणामुळे जागतिक अर्थव्यवस्था प्रभावित करणारे टॅरिफ युद्ध सुरू होऊ शकते, असा अर्थातज्ज्ञांचा अंदाज आहे.
“मेक्सिको आणि कॅनडावर लादलेले 25 टक्के टॅरिफ त्यांना इमिग्रेशन आणि फेंटॅनीलमधील बेकायदेशीर व्यापारासारख्या मुद्द्यांसाठी शिक्षा देण्यासाठी आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. ट्रम्प इतर देशांविरुद्ध पुन्हा गैर-व्यापार मुद्द्यांवर टॅरिफ वापरू शकतात. चीनने आताअमेरिकेच्या कारवाईविरुद्ध WTO कडे जाण्याचा पवित्रा घेतला आहे.
डॉलर निर्देशांकात मजबुती; रुपयाने गाठली विक्रमी नीचांकी पातळी-
भारतीय रुपया सोमवारी विक्रमी नीचांकी पातळीवर उघडला आणि प्रथमच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 87ची पातळी तोडून गेला. ट्रम्पनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनवर अवाजवी टेरिफ लागू केल्यानंतर डॉलरने अनेक देशातील चलनांच्या तुलनेत अतिशय मजबुती गाठली.
डॉलर इंडेक्स 109.6 च्या वर वाढल्याने FII (विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार) अधिक विक्रीला चालना देईल, ज्यामुळे बाजारावर दबाव येईल.
RBI MPCच्या बैठकीपूर्वी सावधगिरी-
केंद्रीय अर्थसंकल्प मांडला गेल्यानंतर आता सर्वांचे लक्ष रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीकडे लागले आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उपभोग वाढवण्याच्या उद्देशाने आयकर आघाडीवर मोठे बदल जाहीर केले. आता RBI सुमारे 25 बेसिस पॉइंटने व्याजदर कमी करून ग्राहकांना आणखी दिलासा देईल, अशी तज्ज्ञांची अपेक्षा आहे.
विदेशी भांडवलातील विक्रीचा मारा सुरूच-
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची (FII) अथक विक्री हे ऑक्टोबरपासून भारतीय बाजारातील मंदीचे प्रमुख कारण आहे. FII ऑक्टोबर 2024पासून सातत्याने भारतीय इक्विटी ऑफलोड करत आहेत, ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या भावनांवर मोठा प्रभाव पडतो. परिणामी, तेव्हापासून निफ्टीने सातत्याने घसरण नोंदवली आहे.
1 ऑक्टोबर 2024 आणि 1 फेब्रुवारी 2025 दरम्यान, FII ने जवळपास ₹ 2.7 लाख कोटी भारतीय शेअर बाजारातून काढून घेतले आहेत, ज्यामुळे बाजाराची घसरण आणखी वाढली आहे.
भारतीय शेअर बाजाराचे वाढलेले मूल्यांकन, कमकुवत तिमाही कमाई आणि वाढणारे अमेरिकन डॉलर आणि रोखे उत्पन्न यामुळे ऑक्टोबरपासून विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारापासून दूर जात आहेत.