Homeबॅक पेज'त्या' बेवारस बोटीबाबत...

‘त्या’ बेवारस बोटीबाबत जाबजबान्या झाल्या तरी कुणाच्या?

आजकाल राज्यात वा केंद्रात जरा काही खुट्ट वाजले की उच्चस्तरीय चौकशी वा विशेष दक्षता पथकाकडून चौकशी केली जावी, अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांकडून केली जाते. याच धर्तीवर सुमारे तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्याच्या समुद्रकिनारी सापडलेल्या बेवारस बोट व त्यातील शस्त्राबाबत काय चौकशी झाली आणि त्यातून काय निष्पन्न झाले हे जनतेला अजून समजलेले नाही. सुदैवाने आता मुख्यमंत्री व गृहमंत्री ही दोन्ही पदे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने ती जाहीर होणे गरजेचे आहे, कारण त्या सर्वप्रकरणी भारतीय जनता पक्षाने अर्थपूर्ण मौन स्वीकारले होते आणि त्याची चर्चा माध्यमातही होती. म्हणूनच हा चौकशी अहवाल जाहीर केला जावा तसेच कुणाकुणाच्या जाबजबान्या झाल्या हे समोर आले पाहिजे.

भरकटलेल्या बोटी तू तीन महिन्यांपूर्वी किनाऱ्यावर का थडकली नाहीस ग? किती मिळमिळीत निवेदन वाचावे लागले… आधी आली असतीस तर देश गाजवला असता! रायगड जिल्ह्याच्या हरिहरेश्वर जवळच्या किनाऱ्यावर शस्त्रांनी सज्ज असलेली एक भरकटलेली बोट सापडल्याने सर्व माध्यमकर्मींची आणि पोलिसांची एकच धावपळ उडाली नसती तरच नवल होते. सकाळी ही बातमी जाहीर झाल्यापासून माध्यमांनी अनेकांना नेहमीप्रमाणे हॅण्डल द्यायला सुरुवात केली होती. नशीब तुमचेआमचे की या बोटीचा संबंध लावून मोहित कंबोज यांनी कुठल्या राष्ट्रवादी काँगेसच्या कुठल्या नेत्याच्या नावाची ‘पुडी’ सोडली नाही. नाहीतर एव्हापर्यंत पाकमोडिया स्ट्रीट, भेंडीबाजार आदी मुस्लिमबहुल भागात पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या छावण्या उभारल्या गेल्या असत्या.

देश आणि राज्यातील विरोधी पक्षही अगदी बुळ्यासारखा वागला. याचठिकाणी विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस असते तर त्यांचा विविध गंभीर आरोपांनी विधानमंडळाच्या भिंतीही थरारल्या असत्या. हे विष काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भिनवले आहे. पोलीस दल निष्क्रीय झाले असून पोलीसी कारभार केंद्राकडे सोपवावा अशी मागणीही त्यांनी केली असती. तीन स्तरावरील सुरक्षा कवच भेदून ही बोट आमच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचते म्हणजेच नेहमीप्रमाणे कोणीतरी गद्दार आहे, म्हणूनच याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवावा अशी नेहमीची मागणीही त्यांनी पुढे रेटली असती. पण देशात विरोधी पक्षनेता काँग्रेसचा आणि राज्यात विधानसभेत विरोधी पक्षनेताच नाही. विधान परिषदेत होते तेही आता निवृत्त होत आहेत. त्यामुळे कुठल्याही चौकशीची मागणी नाही. अरे या विरोधी पक्षांना झाले आहे तरी काय, असे म्हणण्याची पाळी आली आहे.

२६/११ला मुंबईवर हल्ले करणारा कसाब आणि त्याचे सहकारीही याच रायगड समुद्रमार्गाने आले होते याची आठवणही भाजप विरोधात असता तर करून देण्यात आली असती आणि मग धागेदोरे बिनधास्त कुविख्यात दाऊद इब्राहीमशी जोडण्यात आले असते. दाऊदचा विषय आला की हल्ला सिल्व्हर ओकवर जातोच. एका जमान्यात ट्रकभर कागदपत्रांचा पुरावा असण्याची केलेली घोषणा अजूनही महाराष्ट्र विसरलेला नाही. अखेर ट्रकभर सोडा, एक १० ग्रामची फाईलही सापडली नाहीं हे अलाहिदा! येथे पवारांची वा कुठल्याही पक्षाची बाजू घेण्याचा प्रश्न नाही. त्यांची बाजू समर्थपणे मांडणारे मोठे वकील आहेतच. येथे फक्त राजकारणात कशी पतंगबजी केली जाते हा विषय आहे.

“शब्द तुझा कानावर पडताच

मेंदूच्या वारुळातून माझ्या

लालेलाल मुंगळे वांड भसाभस प्रकाशात

सैरावैरा अंगांग हुंगतात”

अशी हालत करून कथित आरोपीला हैराण कसे केले जाते हे आपण हल्ली पाहत आहोतच. खुन्याला शिक्षा होणे गरजेचेच आहे. पण ते खुनी निवडू नका ना? त्यांना एकाच मापाने तोला आणि शिक्षा करा कोणाची हरकत नाही. या सर्व प्रकरणात मला त्या बोटीच्या मालकिणीचे कौतुक वाटते. ती अवघ्या काही तासांतच खुलासा करते आणि आमची ही बोट महिन्यापासून भरकटली होती असे सांगून या प्रकरणातली हवाच काढून घेतली जाते. राजनैतिक अधिकाऱ्यांच्या रदबदलीशिवाय हा खुलासा इतक्या तातडीने येऊच शकत नाही. या बोटीत तीन एके-४७, सुमारे ३०० काडतुसे, काही स्फोटके आणि कागदपत्रे सापडल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले आहे. इतकी शस्त्रे आणि दारूगोळा वाहून नेण्यास संबंधित देशाने परवानगी दिली होती का? याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.

हेच प्रकरण जर भाजपच्या हातात मिळाले असते तर कुणाचा खुलासा येवो वा न येवो, गदारोळ घातलाच असता. गद्दार गद्दार को धुंडेंगे अशी घोषणाबाजीही झाली असती.

“सत्काऱ्यास्त्व अधम नरांचा

अनुनय करिती जगती सज्जन;

असेच जग हे! शिवालयात ही

नंदी स्पर्शविण ना दर्शन” (पाडगावकर)

या ओळींवर विश्वास ठेवावा लागतो…

छायाचित्रः प्रवीण वराडकर

Continue reading

बिहारमध्ये विरोधकांचे ‘जंगलराज’ तर सत्ताधाऱ्यांचे काय ‘मंगलराज’?

"Criticism may not agreeable but its necessary. It fulfils the same function as pain in the human body. It calls attention to an unhealthy state of things" असंच काहीस राजकारणात सत्तारूढ पक्ष व विरोधी पक्ष यांचे नाते असावे, असं...

ठाणे.. ती गाडी आणि त्यावरचे स्टिकर.. गौडबंगाल तर नाही ना!

नेहमीप्रमाणे ठाणे शहरातील कोर्टनाका परिसरात फेरफटका मारून ढोकाळी नाक्यानजिक असलेल्या घरी जायला बस घेतली. तुम्ही विचाराल की तुम्ही दररोज किंवा आलटूनपालटून कोर्टनाक्याला का जाता? उत्तर सोपं आहे. राजकीय नेत्यांच्या पंटर्सची या परिसरात उठबस असते. जिल्हाधिकारी कार्यालय आहे. समोरच जिल्हा...

आता कळेलच धडधाकट कोण आणि कुबड्यांची गरज कुणाला?

आजच्या दैनिक लोकसत्तेच्या अग्रलेखाचा मथळा इतका बोलका आहे की, त्यावर काही लिहिणे अन्यायकारक ठरेल! आपल्या देशात हे नेहमीच घडत आलेले आहे व पुढेही घडणार आहे. राष्ट्रीय पक्ष मग तो भारतीय जनता पक्ष (भाजप) असो वा काँग्रेस, त्यांनी नेहमीच असे...
Skip to content