प्रकाशन पुस्तकाचे, पण मनोगतानेच बाजी मारली! “वेडात ही पद्धत असते..” असे तर नाही ना!! कालच्या बुधवारी एकेकाळचा माझा ‘सांज लोकसत्ते’तील सहकारी असलेल्या विकास महाडिक यांनी लिहिलेल्या ‘एका आजीची गोष्ट’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभास हजर राहण्यासाठी वाशीच्या साहित्य मंदिरात गेलो होतो. या पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते झाले. प्रकाशनस्थळी सर्व वक्त्यांची महाडिक यांच्या लेखनशैलीची भलामण केल्यानंतर मंत्री गणेशदादा यांनी चौफेर टोलेबाजी करून शिवसेनेतील जुने राजकारण, नवी मुंबईतील समाजकारण, नवीन तंत्रज्ञानाची आवड आणि मधेच समेवर येतात तसे पुस्तक प्रकाशनावर तर लगेचच पुढच्या चेंडूवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरील गौरवपर उद्गार, तर दुसऱ्या क्षणाला सौर ऊर्जा, ग्लोबल वार्मिंग, तर लगेचच दुसऱ्या क्षणाला नवी मुंबईतील सर्वात मोठे जमीनदार, त्यातच १९४२मध्ये आमच्या घरी वीज हॊती ते मेल्ट्रॉन आल्यावर माझ्याकडे किमान चार बिनतारी यंत्रणेचे फोन होते, इथपर्यंत सांगून झाले. या सुमारे पाऊण तास केलेल्या अस्खलित भाषणात चारपाच वेळा इंग्रजी भाषेचाही अचूक वापर करून झाला!
मुख्यमंत्री म्हणून माझे नाव!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी फार पूर्वीच आपले नाव मुख्यमंत्रीपदासाठी फिक्स केले होते, अशी आठवण सांगून ते म्हणाले की ज्येष्ठ नेत्यांना डावलून आपल्याला कुठलेच पद नको होते. नाहीतर हल्ली एकमेकांना टांग मारण्यात नेते पटाईत असतात. प्रख्यात उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्या नवी मुंबईतील उद्योगात माझी कामगार संघटना होती. पण संघटनेच्या कामात साहेबांनी कधीच ढवळाढवळ केली नाही, असेही त्यांनी सूचित केले. आमच्या आगरी समाजात स्वाभिमान फार जपला जातो असे सांगून त्यांनी आपल्याला शिवसेनेत येण्याचे आमंत्रण देण्यात आले होते. पण आपण तसा कधी विचारच केला नाही. साहेब आजारी असताना मी आणि माझे कुटूंब त्यांना पाहण्यासाठी व प्रकृतीची विचसारपूस करण्यासाठी रुग्णालयात गेलो होतो. अन्य नेते जे शिवसेना सोडून गेले होते त्यांना मात्र हे धारिष्ट्य जमले नाही. कारण आम्ही शिवसेना सोडल्यानंतर ठाकरे कुटूंबाविषयी कधीच वाईट बोललेलो नाही वा त्यांनीही वाईट शब्दांत टीका केलेली नाही. तीच गोष्ट शरद पवार व त्यांच्या कुटूंबाबाबत बोलता येईल. आम्ही कधीच कोणाविषयी कटूता बाळगत नाही.

लिहून ठेवणे महत्त्वाचे
आयुष्यात होणाऱ्या घटना वा तुम्ही काही करता त्या सर्वांची नोंद ठेवणे गरजेचे असते असे सांगून दादा म्हणाले की, आपल्याकडे संत तुकारामांना नेण्यासाठी विमान आले होते असे सांगितले जाते. पण त्या विमानाबाबत राईट बंधूंसारखे लिहून ठेवलेले नसल्याने तुकारामाच्या विमानाला तसा अर्थ नाही. ग्लोबल वॉर्मिंगबाबत हल्ली बोलले जाते. पण मी माझ्या सहकाऱ्यांना पूर्वीच ग्लोबल कुलिंगबाबत लिहायला सांगितले होते. नवी मुंबई शहराला परमेश्वराचा आशीर्वाद आहे म्हणूनच फ्लेमिंगो हा पक्षी केवळ नवी मुंबईतच दिसू शकतो. मध्यंतरी सिडको व महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी येथे बिल्डर आणण्याचा प्रयत्न केला. पण मी तो हाणून पाडला. मी भाजपमध्ये असलो तरी जात, पात, पंथ, धर्म आणि पक्षाच्या पलीकडे पाहणारा माणूस आहे. माणसाचा मृत्यूही आनंदमय असावा असेही प्रतिपादन गणेशदादांनी केले.
वनमंत्री गणेश नाईक यांच्या या भाषणावर उलटसुलट प्रतिक्रिया येत असून काहींनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे, तर काहींनी त्यांच्या मनात इतकी वर्षे जी खदखद हॊती तीच बाहेर पडली आहे असे मत व्यक्त केले आहे. खरंतर गणेशदादा राणाभीमदेवी पद्धतीचे भाषण करण्यासाठी कधीच प्रसिद्ध नव्हते. एकतर ते फार कमी बोलतात, व्यक्त होतात. नवी मुंबईतील विकासकामातूनच ते खरे व्यक्त होतात असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. परंतु अलीकडील भाजप असो किंवा पूर्वीच्या राजकीय पक्षात त्यांना जो काही बरावाईट अनुभव आला तोच त्यांनी आपल्या भाषणातून कुणाचाही अनादर न करता रोखठोक पद्धतीने मांडला इतकेच. जाताजाता उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे नाव न घेता त्यांनी नवी मुंबईत गणेश नाईक यांच्या मर्जीविना कुणी हडेलहप्पी करेल तर ती सहन केली जाणार नाही असे सौम्य शब्दात सांगूनही टाकले. यात कसोटी लागणार आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची! ठाणे जिल्ह्यातील या गणेश व एकनाथांना ते कुठल्या ‘अस्त्राने’ बांधून ठेवतात ते येत्या काही महिन्यांतच समजेल!
या पुस्तक प्रकाशन समारंभात समर खडस, महेश म्हात्रे, अभय देशपांडे, अभिजित बांगर, कैलास शिंदे, प्रफुल्ल वानखडे, अरुण म्हात्रे आदींची भाषणे झाली.