Saturday, July 13, 2024
Homeमाय व्हॉईसकल्याण-डोंबिवली महापालिका हे 'फसवे'...

कल्याण-डोंबिवली महापालिका हे ‘फसवे’ नामाभिधान?

शीर्षकातील फसवे हा शब्द पाहून अस्सल डोंबिवलीकर माझ्यावर बरेचसे रागावतीलच.. रागावू देत बापुडे.. काय करणार समोर जे दिसते ते लिहिल्यावाचून राहवत नाही. असो! गेल्या आठवड्यात काही कामानिमित्त डोंबिवलीमधील चार रस्त्यानजिक असलेल्या एका डॉक्टर मित्राकडे जाण्याचा योग आला होता. पण दुर्दैवाने डॉक्टर दवाखान्यात येऊ शकले नव्हते. आता करायचे काय, हा प्रश्न माझ्यापुढे उभा राहिला. अचानकपणे नातेवाईकांकडे जाणे मनाला पटत नसल्याने जरा टिळक रस्त्यावर फेरफटका मारू व नंतर स्टेशनकडे रवाना होऊ असा विचार करत असतानाच चार रस्त्यावरील सिग्नलच्या खाबांकडे माझे लक्ष गेले आणि ठरवले की नाही हे खांब आणि हा रस्ता व हा खोदून ठेवलेला टिळक रस्त्यावरील पदपथ आपल्याला खुणावतो आहे आणि तू काय लगेच परतण्याचे ठरवतोस? काही वाटते की नाही? झाले. शेजारच्या दुकानदारास विचारले की, हा पदपथ किती दिवसांपासून असाच खोदून ठेवलेला आहे? त्याला प्रथम माझा संशय आला. तो गप्पच राहिला. मग मी पुन्हा प्रयत्न करता झालो तेव्हा तो पुटपुटला. गेले सव्वा वर्ष झाले हे असेच सर्व खोदून ठेवलेले आहे.

माझे काम झाले होते. मी सरळ चालतच राहिलो. बराच चाललो. सुमारे मैलभर तरी चाललो असेन. पण खोदलेला पदपथ काही संपत नव्हता. काही वेळाने तर खोदून बाजूला ठेवलेल्या दगड व इतर वस्तूंना मर्तिकासारखे सफेद कपड्यात गुंडाळून ठेवण्यात आले होते. याच्याच आसपास कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुमती जाखड यांनी घोषणांचा पाऊस पाडत महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवलीच्या विकासात काही कमी पडू देणार नाही अशी विकासवेधी घोषणा केली आहे. त्याच्या आदल्याच दिवशी देवदर्शनावर व मंदिर विकासावर भर देऊन कोट्यवधी रुपयांच्या घोषणा केल्या गेल्या.

या सर्वांबाबत सध्यातरी आम्हाला काहीच म्हणायचे नाही. सत्तारूढ पक्ष अशा घोषणा करतातच. त्यावर जोपर्यंत अंदाजपत्रकात काहीच येत नाही किंवा उल्लेख नसतो तोवर त्या हवेतल्याच गप्पा असतात, असा आजवरचा अनुभव आहे. काहीसे विषयानंतर झाले. पण ते आवश्यक होते. विकासाच्या घोषणा व प्रत्यक्ष जमीनी हकीकत काय असते ते दाखवण्यासाठी हे गरजेचे होते. तर वाचकहो, आपण टिळक रस्त्यावर होतो. मैलभर चाललो. आता रस्ता ओलांडून पलीकडील बाजूकडून पुन्हा सिग्नलकडे चालू लागलो तर अनेक ठिकाणी पदपथाचे काम झालेले दिसले. परंतु समतल मात्र कुठेच साधलेला दिसला नाही. एक-दोन ठिकाणी तर दुकानात प्रवेश करण्यासाठी लाकडाची फळकुटे ठेवलेली दिसली.

हा दुकानदार मात्र काहीसा धीट दिसला. तो म्हणाला साहेब कुणीच लक्ष देत नाही. विचारले तर उडवाउडवीची उत्तरे देतात. महापालिका कार्यालयात गेले तर तक्रार घेणारा कर्मचारी असतो. परंतु अधिकाऱ्याची केवळ रिकामी खुर्चीच दृष्टीस पडते. अधिकारी वर्ग कधी साईटवर तरी असतो वा कल्याणला मॅडमना भेटायला तरी गेलेला असतो. आजकाल एक नवीन कारण आलेले आहे ते म्हणजे ‘ठाण्याला गेले आहेत’ असे अनेक ‘टिळक रोड’ डोंबिवलीत दिसतील, असे नागरिकांनी सांगितले.

शेकडो ठिगळे लावलेला रस्ता

टिळक रस्त्याची अशी कथा तर डोंबिवली स्थानकापासून सुरू होणाऱ्या शिवमंदिर रस्त्याची दुसरीच कथा!! खरेतर हा डोंबिवलीतील मुख्य रस्ता. हा रस्ता जर्जर होऊन अनेक वर्षे झाली. परंतु मोठमोठी ठिगळे लावण्याव्यतिरिक्त इथे काहीही झालेले नाही. जवळजवळ 100हून अधिक ठिगळे या रस्त्यावर असल्याने मंत्री व आमदार महोदय वगळता अन्य गाड्यांमध्ये बसलात तर किमान 150/175 जर्क तरी बसणारच आणि विनासायास कमरेचे टाके ढिले होणारच.. शपथेवर सांगतो! शिवमंदिर रस्त्याचे काम दुसऱ्या टोकापासून सुरू केले असल्याची माहिती मिळाली. पण ते काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याचे दिसून आले. शिवाय जी ठिगळे लावण्यात आली आहेत ती समतल का नाहीत? याचे कारण मात्र शेवटपर्यंत मिळू शकले नाही. भाजपचे नेते स्व. रामदास नायक या ठिगळांना टेंगूळ असे संबोधायचे!!

हे असले रस्ते अनुभवत रेल्वेस्थानकाकडे आल्यानतर तर सर्वत्र आनंदी आनंदच होता. दर महिन्याला वर्तमानपत्रात बातमी येत असते की स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. मात्र हा मोकळा श्वास काही तासांपुरताच असतो असंही नागरिकांनी सांगितले. आयुक्तांनी एक फिरती गाडी अतिक्रमण रोखण्यासाठी व फेरीवाल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नेमली असल्याचे सांगण्यात आले. ती गाडी आम्ही पाहिलीही. पण दुःखाची बाब म्हणजे त्या गाडीला पाहून एकही फेरीवाला जागेवरून उठला नाही. ती गाडीही एक आनंदी ‘फेरी’ मारून जाती झाली. जाता जाता राज्यशास्त्राचा जनक समजल्या जाणाऱ्या एरिस्टोटलचे एक वचन आठवलं…

“A very populus city rarely, if ever, be well governed” हल्लीचे राजकारण आणि नोकरशाही ग्रीक साम्राज्याच्या फार पुढे गेलेली आहे. त्यांना ते हल्ली कुणी मानताच नाही म्हणा ना! राजकीय नेते तसेच नोकरशहा उद्या हे सर्व म्हणणे खोडून काढण्यासाठी भलीमोठी यादी जाहीर करतील. किती कोटी रुपये खर्च केले त्याचे आकडे तोंडावर फेकतील. त्यांना एकच उत्तर देईन..

“जाका गुरु भी अंधला, चोला खरा निरंध|

अंधे अंधा ठेलिया, दुन्यू कूप पडत “

तसेच

“it is better for a city to be governed by a good man than by good laws”

जितके कायदे/नियम जास्त तितक्याच पळवाटाही अनेक!!

छायाचित्र मांडणी- श्रेया साळसकर

Continue reading

मैफलीत आरास मांडलीस, पण सूर पोरके..

"मैफलीत आरास मांडलीस पुन्हा पुन्हा पण  सूर पोरके, स्वरातही तो लगाव नाही" (महेश केळुस्कर) भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजेच महायुतीच्या आमदार, खासदार तसेच पदाधिकाऱ्यांचा एकत्रित मेळावा शनिवारी मुंबई मुक्कामी झाला. येऊ घातलेली राज्य विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच सर्व...

समस्या कांदिवलीची, प्रश्नचिन्ह मुंबईच्या नियोजनावर!

मुंबई शहराचे नियोजन फसलेच आहे. पण आता दोन्ही उपनगरांचेही नियोजन केवळ फसलेच नाही तर नियोजनाचे बारा वाजलेत असेच वाटण्याजोगी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मुंबईत कांदिवली (पू.)नजीकच्या समता नगरमधील पाणी समस्येने जवळजवळ उग्र स्वरूप धारण केले असल्याने नियोजनाविषयीच चिंता निर्माण...

अखेर कुर्ल्यात बुलडोझर चाललाच….!!

मुंबईत चेंबूरपासून लोकमान्य टिळक टर्मिनसला जाणाऱ्या रस्त्यावर अखेर बुलडोझर चालला. थेट पंतप्रधान कार्यालयातून सूत्रे हलल्यानंतर मुंबई महापालिकेलाही बुलडोझर चालवल्याखेरीज पर्याय राहिला नाही, असे सूत्रांनी सांगितले. चेंबूरपासून लोकमान्य टिळक टर्मिनसला जाणाऱ्या रोडवर अनेक छोटयामोठ्या ढाब्यांनी रस्ते अडवले होते. त्यामुळे रेल्वेस्थानकात जाण्यास...
error: Content is protected !!