Homeब्लॅक अँड व्हाईटबांगलादेशींना हाकलायचंय? मग,...

बांगलादेशींना हाकलायचंय? मग, वंदे भारतने दिल्ली गाठा…

सध्या मुंबई विभागीय विकास प्राधिकरणात म्हणेच MMRA मध्ये हो, बिचकून जाऊ नका; बांगलादेशी बेकायदा नागरिकांच्या विषयाला नको इतके महत्त्व दिले जात असल्याचे वाटत आहे. नको इतके इतक्यासाठीच म्हटले की, जी मंडळी बांगलादेशींविरुद्ध आवाज उठवत आहेत त्यांचेच सरकार केंद्रात व राज्यात सत्तेवर आहे. केंद्रात तर गेली तब्बल १२ वर्षे सत्तेत असून हा प्रश्न थेट गृहमंत्री अमित शाह यांच्याच गृह खात्याशी थेट संबंधित आहे. पश्चिम बंगालमध्ये ज्या नेटाने हा प्रश्न त्यांनी धसास लावलेला आहे ते पाहता मुंबई विभागातील तमाम महापौरांनी गृहमंत्री अमितजींनाच साकडे घालणे योग्य ठरेल. बेवारस नागरिक तसेच बांगला घुसखोर यांच्याविरुद्ध कारवाई केली पाहिजे ती सीमा सुरक्षा दलाने! याच दलातील काही त्रुटीचा फायदा घेऊन ही मंडळी सीमेच्या पार आत घुसलेली आहेत. मनात आणले तर ही यंत्रणा या सर्व घुसखोरांना काही तासांत देशाबाहेर घालवू शकते. म्हणून माध्यमांना बाईट देण्यात वेळ दवडू नका. लगेच ठरवा.. विमाने नकोत, वंदे भारतने थेट दिल्ली गाठा आणि अमितजींची करुणा भाका! तुम्ही मुंबईत परत येण्याआधीच बांगलादेशी गायब झालेले असतील. नंतर बेवारस नागरिकांसाठी पुन्हा आंदोलन करा… शहराच्या इतर समस्या थांबू शकतात. (इतक्या वर्ष नाही का थांबल्या?) म्हणूनच म्हणतो- चला काकू.. चला काकू, दिल्लीला चला.. अमितजींपुढे माथा टेका..

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी समाजमाध्यमांवर टीका केलेली नुकतीच वाचनात आली. न्यायालयाच्या निरिक्षणाबाबत काही टिपणी करायची म्हटली की पोटात गोळाच येतो. न जाणो कधी न्यायालयाचा अपमान या पामराकडून घडला तर काय घडेल, या विचारानेच विचारचक्र थांबायची वेळ येईल की काय असे वाटत राहते. असो. आता त्याची थोडीशी सवय झाली आहे म्हणा ना! “पदपथावर राहणारे बेघरही माणसेच..” असा मथळा लोकसत्तेत वाचला आणि एकदम आता काळाच्या आड गेलेला ‘जुडीशियल ॲक्टिविझम’ हा शब्दप्रयोग आठवला. हे मुंबई शहर आणि त्याच्या आजूबाजूची महानगरे अखंड मानवतावादच जपत आलेली आहेत आणि ही जपमाळ वेळीअवेळी ओढत बसल्यामुळे या सर्व शहरांचा सत्यानाश झाला आहे, हे माझ्यासकट आपण सर्वच जण पाहात आलेलो आहोत. प्रथम फेरीवाले नंतर पोटाची खळगी भरण्यासाठी आलेले परप्रांतीय या सर्वांना सामावून घेताना सर्वच सरकारी यंत्रणांची दमछाक होत आहे.

त्यातच काही दिवसांपूर्वी माननीय मुंबई उच्च न्यायालयानेच यंत्रणांना विचारले होते की, ‘शहरातील पदपथ नागरिकांना चालण्यासाठीच आहेत ना?’ या प्रश्नावरील शाई वाळलीही नसेल तोच याच न्यायलयाने काहीशा गुश्यातच त्याच यंत्रणांना खडसावले की, ‘ही बेघरही माणसेच आहेत..’ न्यायमूर्तीद्वयहो ती माणसेच आहेत हे कुठे यंत्रणांनी नाकारले? फक्त ही बेघर/बेवारस माणसे पदपथावर राहतात आणि अगदी काही दिवसांपूर्वी तुम्हीच विचारले होते ना लॉर्डशीप की, ‘नागरिकांनी चालायचे कुठून?’… न्यायमुर्तीद्वयहो, मला एकदम तुकाराम आठवले ‘लोक जैसा ओक धरता धरवेना..’ थोडक्यात सारांश काहीही करा, समाज दोन्ही बाजूंनी बोलत असतो. पदपथावरील फेरीवाले आणि हे तथाकथित बेवारस परप्रांतीय पोटाची खळगी भरण्यासाठी तेथे

बांगलादेशी

आलेले आहेत, हे तुम्हाला जसे कळले तसेच आम्हालाही समजले. फरक इतकाच आहे की, या दोहोंचा जनतेला जेवढा त्रास होतो त्याच्या तुलनेत तुम्हाला काहीच त्रास होत नाही. तुम्हाला वाहतूककोंडी भेडसावत नाही, कारण लाल दिवा आणि पुढे पोलिसांची गाडी.. पदपथावरून चालण्याचा आपला सराव आता इतिहासजमाच झाला असेल नाही? त्याबाबत आम्हाला आनंदच आहे. आम्हाला आनंद नकोच, केवळ सुसह्य जगणं हवय मायलॉर्ड! सकाळी लवकर उठायचे, धडपडत रेल्वेस्थानक गाठायचे. कसेतरी लोकलमध्ये स्वतःला कोंबायचे आणि चर्चगेट, सीएसटीएम, दादरला उतरून कार्यालयात जायचे. वाटेत या फेरीवाल्यांशी सामना करायचा.. त्यांच्या सामानाला पाय लागला तर लागलीच भच्या आराखडीतील शिव्या आहेतच. शिवाय बेवारस लोकांच्या कठड्यावर वाळत घातलेली वस्त्रे, अंतर्वस्त्रे, त्यांच्या तान्हुल्यांच्या झोळ्यऻ म्हणजे अभिमन्यूने चक्रव्यूह भेदावा असेच जणू चित्र दररोज डोळ्यासमोर असते.

गमंत पुढेच आहे. इतके सर्व करून कार्यालयात पोहोचायला उशीर होतोच. तोच समोर बॉस उभा असतो आणि त्याचे प्रवचन सुरु होते.. यावरून मला एक विधान आठवले “we shall solve cities problem by leaving city itself” असे केल्याशिवाय शहरवासियांना मुक्तीच मिळणार नाही यावर माझा विश्वास वाढत चालला आहे. परंतु यातून नवीनच समस्या आणि प्रश्न सर्वांच्याच समोर आ वासून उभे राहतील. ते म्हणजे शहर सोडल्यावर करायचे काय? नोकऱ्यांचे काय? घरांचे काय? एवम हा मार्ग योग्य नाही. कारण लाखो लोकांनी शहर सोडले तर त्यांच्या खाण्यापिण्याचे काय? आणि कोण त्यांना देणार? फेरीवाले असोत वा बेवारस नागरिक असोत. हे बहुतांशी उत्तर भारतातून आलेले आहेत. येण्याबद्दल वाद नाही. परंतु त्यांचे येथे कोणीही नातेवाईक नसतात आणि असले तरी हे नातेवाईक त्यांना मुळीच थारा देत नाहीत. मग त्यांचे सगेसोयरे, इतकेच नव्हे तर ते ज्या राज्यातून येतात ती राज्येही त्यांच्याकडे चक्क पाठ फिरवतात. मग आपणच हे विकतचे दुखणे का म्हणून घ्यावे? तसेच या नागरिकांच्या खर्चाच्या पोटी ही राज्ये एक दमडीही देत नाहीत. इतकेच नव्हे तर यातील काही जमातींना ते सन्मानाची वागणूक तेथे देतच नाहीत आणि आम्ही मात्र त्यांना सन्मान द्यावा, अशी उफराठी अपेक्षा या राज्यांची असते. न्यायमुर्तीद्वयहो, एकदा परळला भेट द्या. टाटा रुग्णालय तसेच केइएम रुग्णालयाच्या परिसराला काय अवकळा आणली आहे या लोकांनी, ते आपल्याला दिसेल. टाटा रुग्णालयातील रुग्णांचे नातेवाईक त्या परिसरातील पदपथ सोडायलाच तयार नसतात. मानवतेच्या दृष्टीने त्याचा विचार केला तरी शेकडो नातेवाईकांचा भार आमच्या राज्यशासनाने का सहन करावा? बरे त्यातूनही सहन केला तरी संबंधितांची अरेरावी किती असते हे त्या परिसरातील नागरिकांना जरा विचारा…

यावरून मला एक गोष्ट आठवली. ती अशी की, फार पूर्वी म्हणजे ३०/४० वर्षांपूर्वी शहरातील फेरीवाल्यांचा प्रश्न निर्माण झाला होता तेव्हा काही पुरोगामी मंडळींनी त्याला सामाजिक, आर्थिक समस्या समजावी असा घोषा केला होता. काही न्यायमूर्ती सक्रिय कार्यकर्त्याच्या भूमिकेत होते. तेव्हा विरोधकांनी मुंबई उच्च न्यायालय परीसरात प्रतीकात्मक फेरीवाले उभे केले होते. आताही या बेवारस नागरिकांसाठी न्यायमूर्तींच्या बंगल्यात राहायला जागा देणार का, असे विचारले तर कुणाला राग यायचे कारण नाही! “You want to know what judicial activism? Judicial activism is judges imposing their policies prefer on these words of the constitution” एक मात्र मान्य केले पाहिजे की हे बेवारस प्रकरण सोडता न्यायमूर्तीद्वयांनी पालिकेच्या संथ कारभारावर जे ताशेरे ओढलेले आहेत ते मात्र पटण्यासारखेच आहेत. सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी असा सौंदर्यीकरणाचा कार्यक्रम मुंबई परिसराच्या आसपास जोरशोरसे राबवला जात आहे. त्याला मात्र न्यायमूर्तींच्या या निरीक्षणाने काहीसा खीळ बसणार आहे. पण ते न्यायालय आणि मंत्रालय पाहून घेतील. आपल्यासारख्या लहान माणसाने त्यात पडूच नये. आता समन्वयक न्यायमूर्ती का हवा, त्याचे कारण अगदी थोडक्यात. यापूर्वी वा सध्या आसपास अशाच आशयाच्या खटल्यांमध्ये याच उच्च न्यायालयाने काय मत व्यक्त करून निकाल दिला यांचा समन्वय व्हायला नको का?

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

अजि म्या नवल पाहिले…

अजि म्या नवल पाहिले.. तुम्ही चकीत झालात ना? वाचक हो, तुम्ही तर चकीत झाला असाल, पण मला काहीस चुकीच्या ठिकाणी तर उतरलो नाही ना? अशी शंका आली. डोक्याला जास्त ताण देऊ नका! अहो हा आहे मुंबईतल्या दादर रेल्वेस्थानकाबाहेरचा फेरीवालामुक्त...

जेव्हा फोटो जिवंत करणाराच ‘फोटो’त जातो…

गेल्या आठवड्यात एक दुःखद बातमी सकाळी, सकाळीच आली.. रजनीश गेला. वय अवघे ५५ वर्षे. हे वय होत का जाण्याचं? नाही. पण नियतीला काय माहित की त्याच्या हातून अजून कुणाकुणाचे फोटो कुठल्या परिस्थितीत काढायचे ते! फोटोलाच गुंगारा देऊन (तसा तो...

सनीला आता आजूबाजूला सत्यनारायणही नको! हळदीचेही वावडे!!

निर्जन स्थळी गोळ्या घालणे तसं सोपं असतं. गर्दीच्या ठिकाणी सावजाचा अचूक वेध घेणं तस कठीणच असतं. पण 'सामान' चांगलं असेल तर लांबूनही वेध घेता येतो. धावपळीत म्हणजे बाईक वा स्कूटरवरून दोनतीन दिशेने यायचे व एकाने काम करायचे आणि वन...
Skip to content