आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. सध्या जगभर भारतीय योगशास्त्राबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. अनेक भारतीय तरुणही आता करिअरच्या दृष्टीने योगाकडे पाहू लागले आहेत. त्यामुळे योगा ट्रेनर म्हणून करिअर करायचं असेल तर योगा कोर्सेससाठी भारतात आणि ऑनलाइन दोन्ही पर्याय आहेत. मात्र, इंटरनॅशनल योगा ट्रेनर म्हणून करिअर करायचे असेल तर काय करायचं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आंतरराष्ट्रीय योगा ट्रेनर व्हायचे असेल तर इंटरनॅशनल योगा टीचर कोर्स, अनुभव आणि प्रमाणपत्रं मिळवणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी-
1. RYS प्रमाणित 200 किंवा 500 तास इंटरनॅशनल योगा टीचर ट्रेनिंग कोर्स करावा लागतो.
2. अनुभवासाठी योगा क्लासेस घ्या किंवा योगा संस्थांमध्ये इंटर्नशिप करा.
3. प्रमाणपत्र मिळाल्यावर देश-विदेशात ट्रेनर म्हणून संधी मिळतात.
आंतरराष्ट्रीय दर्जाची मान्यताः
RYS म्हणजे Registered Yoga School—ही Yoga Alliance (USA)कडून प्रमाणित असते. RYS प्रमाणित कोर्सेस (उदा. RYS 200, RYS 300, RYS 500) हे 200, 300 किंवा 500 तासांचे योग शिक्षक प्रशिक्षण कोर्सेस असतात, जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानले जातात आणि पूर्ण केल्यावर RYT (Registered Yoga Teacher) म्हणून नोंदणी करता येते. यात योगाचे तांत्रिक ज्ञान, शरीरशास्त्र, योग तत्त्वज्ञान, अध्यापनकौशल्य, आणि व्यावसायिक आचारधर्म शिकवले जातात.

RYS प्रमाणित कोर्सेस–
भारतभर अनेक योग संस्था RYS प्रमाणित कोर्सेस ऑफर करतात. महाराष्ट्रातही RYS योग शिक्षक प्रशिक्षण कोर्सेस मुंबई, पुणे, नाशिकसारख्या शहरांमध्ये उपलब्ध आहेत. काही प्रमुख असे-
1. संयुज्या योग, मुंबई- RYS 200, 4 महिन्यांचा ऑफलाइन/ऑनलाइन कोर्स, योग अलायन्स सर्टिफिकेट.
2. SRMD योगा, मुंबई- RYS 200, योगा अलायन्स व इंडियन योगा असोसिएशन मान्यताप्राप्त.
3. हट योगा इन्स्टिट्युट (पुणे/मुंबई)- RYS 200, 300, 500 तासांचे कोर्सेस.
4. योग विद्या गुरुकुल, योगा पॉइंट, नाशिक- RYS प्रमाणित टीचर ट्रेनिंग कोर्सेस (TTC).
महाराष्ट्राबाहेरील प्रमुख RYS प्रमाणित कोर्सेस-
भारतभर RYS पयोग शिक्षक प्रशिक्षण कोर्सेस खालील ठिकाणी प्रसिद्ध आहेत:
1. ऋषिकेश योगकुलम- RYS 200/300/500, कोर्स फी: 50 हजार ते दोन लाख
2. विन्यासा योगशाळा, ऋषिकेश- RYS 200/300/500, कोर्स फी: 55 हजारपासून.
3. दी बोधी गया, ऋषिकेश- RYS 200/300, निवासी कोर्सेस.
4. मंत्रा योगा अँड मेडिटेशन स्कूल, गोवा- RYS 200/300/500, कोर्स फी: एक लाखांपासून.
5. ऑल इंडिया योगा ट्रेनिंग इन्स्टिट्युट, म्हैसूर- RYS 200, कोर्स फी: एक लाख 70 हजारपासून.
6. श्री हरी योगा, ऋषिकेश, धर्मशाळा, गोवा आणि गोकर्ण- RYS 200, कोर्स फी: सव्वा दोन लाखांपासून.
बहुतेक कोर्सेस 200, 300, 500 तासांचे असून, निवासी व ऑनलाईन दोन्ही पर्याय आहेत.
अय्यंगार योग संस्था-
पुण्यातील रामनारायण अय्यंगार स्मृती योग संस्था (RIMYI) हे अय्यंगार योगाचे मूळ केंद्र आहे. ही संस्था योगगुरू बी. के. एस. अय्यंगार यांच्या नावाने ओळखली जाते आणि जगभरातून विद्यार्थी इथे योग शिकायला येतात; पण योग अलायन्स प्रमाणनासाठी RYS कोर्सेस त्यांच्याकडे नाहीत. श्रीयोग इन्स्टिट्युटही हे RYS प्रमाणित कोर्सेस घेत नाहीत, पण त्यांचा स्वतःचा अय्यंगार योगा टीचर ट्रेनिंग प्रोग्राम असतो, जो जगभर मान्य आहे. RIMYI मध्ये प्रवेशासाठी त्यांची स्वतःची निवड प्रक्रिया आहे. इथे ऑफलाइन आणि ऑनलाइन क्लासेस आहेत. 2025 साठी अॅडमिशन सुरू आहेत; नवीन विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन क्लासेससाठी वेटलिस्टवर नाव नोंदवावं लागतं. कोर्सेसमध्ये बिगिनर, इंटरमिजिएट, अॅडव्हान्स्ड, मुलांसाठी, आणि हेल्थ प्रॉब्लेम्ससाठी खास क्लासेस असतात. अर्ज info@rimyi.org वर ईमेल करता येतो, आणि निवड झाल्यावर फी भरायची असते. अय्यंगार योगाचा ऑनलाइन 50 तासांचा योगा अलायन्स मान्यताप्राप्त कोर्स हवा असल्यास, ऋषिकेशमधील आरोहन योगा हा चांगला पर्याय आहे.

महाराष्ट्रातील इतर प्रमुख योगसंस्था-
महाराष्ट्रात योगासाठी इतरही अनेक नामांकित संस्था आणि कोर्सेस उपलब्ध आहेत:
1. दि योगा इन्स्टिट्यूट, मुंबई- जगातील सर्वात जुनी योग संस्था, टीचर ट्रेनिंग, डिप्लोमा, शॉर्ट टर्म कोर्सेस.
2. कैवल्यधाम, लोणावळा- योग संशोधन व शिक्षणासाठी प्रसिद्ध, डिप्लोमा, पदवी, पदविका.
3. स्वास्ती योगा सेंटर, पुणे- टीचर ट्रेनिंग, योग थेरपी, अॅडव्हान्स कोर्सेस.
4. प्रेमानंद योगा इन्स्टिट्यूट- 200-500 तासांचे टीचर ट्रेनिंग, डिप्लोमा, आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र.
भारतातील इतर प्रमुख योगसंस्था-
शिवनंदा आश्रम, श्री श्री स्कूल ऑफ योगा, बोधी स्कूल ऑफ गया, योगामु इन्स्टिट्युट, ऋषिकेश योग कुलम, गोवा योगाशाळा, ओम योग आश्रमआणि युडेमी येथेही हिंदी व इंग्लिशमध्ये चांगले योगा कोर्सेस उपलब्ध आहेत. प्रेग्नेंसी योगा, किड्स योगा, अयुर्वेद योगा, ट्रॉमा-इन्फॉर्म्ड योगा असे काही स्पेशलायझेशन इथे उपलब्ध आहेत. मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योग, दिल्ली येथेही शॉर्ट टर्म, वीकेंड फाउंडेशन कोर्सेस उपलब्ध असतात.
राज्यातील UGC मान्यताप्राप्त प्रमुख योगा पदवी/पदविका अभ्यासक्रम:
महाराष्ट्रात शासनमान्य योगा पदवी/पदविका अभ्यासक्रमांसाठी काही प्रमुख पर्याय उपलब्ध आहेत. या कोर्सेसमध्ये बी.ए./बी.एस्सी. (योग), एम.ए./एम.एस्सी. (योग), डिप्लोमा, पोस्ट-ग्रॅज्युएट डिप्लोमा, आणि शॉर्ट टर्म सर्टिफिकेशन कोर्सेस आहेत. ते असे-
1. मुंबई विद्यापीठ- डिप्लोमा इन फाऊंडेशन ऑफ योगा (1 वर्ष, पार्ट-टाईम).
2. कैवल्यधाम, लोणावळा- डिप्लोमा, पदवी, पदविका; महाराष्ट्र शासन व कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ मान्यताप्राप्त.
3. स्वास्ती योगा सेंटर, पुणे- आयुष मंत्रालय, योगा सर्टिफिकेशन बोर्ड (YCB) आणि इंडियन योगा असोसिएशन मान्यताप्राप्त कोर्सेस.
4. गव्हर्न्मेंट योगा अँड नॅचरोपॅथी कॉलेज, आजरा, कोल्हापूर- बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स (BNYS), 4 वर्षे, NEET-UG आवश्यक.
5. डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती- B.A./M.A. (योगशास्त्र), पदविका आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम.

देशभरात UGC मान्यताप्राप्त योगा पदवी/पदविका अभ्यासक्रमांसाठी काही प्रमुख पर्याय:
1. बनारस हिंदू विद्यापीठ
2. पतंजली विद्यापीठ
3. राजस्थान विद्यापीठ
4. लखनौ विद्यापीठ
5. ॲमिटी युनिव्हर्सिटी
ही पाचही विद्यापीठे UGC मान्यताप्राप्त योगा पदवी/पदविका अभ्यासक्रम राबवितात.
B.Sc./B.A./M.A./M.Sc. (Yoga) तसेच Diploma, PG Diploma या अभ्यासक्रमांसाठी CUET, UGC NET, इ. प्रवेश परीक्षा लागतात.
योगाचे पदव्युत्तर (M.A./M.Sc./PG Diploma) कोर्सेस:
देशभरात खालील प्रमुख ठिकाणी योगाचे पदव्युत्तर (M.A./M.Sc./PG Diploma) कोर्सेस उपलब्ध आहेत-
1. IGNOU- इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ दिल्ली, पुणे, मुंबई, बेंगळुरू, जयपूर, चेन्नई इ. केंद्रांमध्ये M.A./PG Diploma.
2. मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगा, दिल्ली- M.Sc. (Yoga), डिप्लोमा.
3. स्वामी विवेकानंद योग संशोधन संस्था (SVYASA), बंगलोर- M.Sc., Ph.D.
4. देव संस्कृती विद्यापीठ, हरिद्वार- M.Sc., Ph.D.
5. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ योगिक सायन्स अँड रिसर्च- पदव्युत्तर डिप्लोमा.
6. भारतीय विद्या भवन (दिल्ली), योगा पॉइंट (नाशिक), शिवानंद आश्रम (ऋषिकेश)- विविध पदविका/डिप्लोमा कोर्सेस.