नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागात आयोजित होत असलेले शहादा येथील ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन ही शेतकऱ्यांसाठी फार मोठी संधी आहे. शहादा परिसरात शेती चांगली असून शेतकरीही कष्टाळू, मेहनती आहे; पण आधुनिक तंत्राने, व्यावसायिक पद्धतीने शेती करणे ही काळाजी गरज आहे. ॲग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना योग्य दिशा व नेमकी माहिती मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण होते, असे प्रतिपादन तळोदा-शहादाचे आमदार राजेश पाडवी यांनी केले.
शेतकऱ्यांनी या प्रदर्शनास भेट देऊन उपयुक्त माहिती जाणून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्रदर्शनात पहिल्याच दिवशी हजारो शेतकऱ्यांनी भेट दिली. आमदार पाडवी यांच्या हस्ते ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. शुक्रवार, 23 फेब्रुवारीपासून प्रेस मारुती मैदान, शहादा येथे सुरू झालेले हे कृषी प्रदर्शन सोमवार, 26 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. प्रदर्शन मोफत आहे.
आमदार राजेश पाडवी यांनी अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून प्रदर्शनास भेट देऊन उद्घाटन केले. त्यांनी प्रदर्शनस्थळी दीड तास सहभागी स्टॉलला भेट देऊन नव कृषी तंत्रज्ञान तसेच उत्पादने, यंत्रसामग्री यांची माहिती जाणून घेतली.
आमदार पाडवी म्हणाले की, आपल्या परिसरातील फळबागा आणि पिके लक्षात घेऊनच ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. नैसर्गिक शेतीचे मार्गदर्शन मिळते. केंद्र आणि राज्य सरकारच्या सवलती, योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी काही कंपन्यांच्या स्टॉलवर शेतकऱ्यांकडून फॉर्म भरवून घेऊन पाठपुरावा केला जातो. ही गोष्टही शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे. केळी, पपई, कांदा, भाजीपाला याचे नवीन उत्पादनक्षम अनेक वाण येथे उपलब्ध असल्याचे दिसून आले. केंद्र सरकार प्रोत्साहन देत असलेली करार शेती आणि नॅनो टेक्नॉलॉजी यासंदर्भातील स्टॉलही प्रदर्शनात आहेत.
पुढील काळात अधिक व्यापक प्रमाणावर हे प्रदर्शन आयोजित करून परिसरातील शेतकऱ्यांना अपडेट माहिती व ज्ञान द्यावे, अशी अपेक्षा आमदार पाडवी यांनी व्यक्त केली.
ॲग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या तांत्रिक ज्ञानात भर पडते, असे गौरवोद्गार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राकेश वाणी यांनी काढले. नवीन शेती तंत्रज्ञानावर आधारित अनेक स्टॉल प्रदर्शनात उपलब्ध आहे. शासनाच्या धोरणानुसार, कृषी विभाग देखील नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नशील असून आमचा देखील या प्रदर्शनात सहभाग आहे. शेतकऱ्यांनी या प्रदर्शनात भेट देऊन आपला आर्थिक स्तर उंचावण्यासाठीचे तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी पाण्याची मोफत तपासणी
ओम गायत्री नर्सरी व आनंद ॲग्रो केअर यांच्यामार्फत शेतकऱ्यांनी प्रदर्शनला येताना सोबत आणलेल्या पाण्याची (EC, PH, TDS) मोफत तपासणी करून अवघ्या काही मिनिटांमध्ये जागेवरच रिपोर्ट देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सुशिक्षित तरुणांसाठी विविध कंपन्यांची तालुकानिहाय डीलरशिपच्या माध्यमातून व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. याचबरोबर फळे व भाजीपाला क्षेत्रात करार शेतीच्या माध्यमातून शाश्वत उत्पन्नाची हमी, मजुरीला पर्यायी यंत्र व अवजारे, आधुनिक कृषी प्रणाली, काटेकोर पाणी व्यवस्थापन तसेच बदलत्या हवामानानुसार पीक लागवड व नवीन तंत्रज्ञानाची माहितीदेखील या प्रदर्शनात उपलब्ध होईल.