स्वातंत्र्यवीर सावरकरांचे क्रांतिकार्य, सामाजिक क्रांती आणि हिंदुत्व याबद्दल सगळ्यांना माहीत आहे. तरीही त्यांचे अनेक महत्त्वाचे पैलू सर्वांनाच ज्ञात नाहीत. अशावेळी वीर सावरकर यांच्या व्यक्तिमत्वाचे आणि कार्याचे सर्व पैलू ज्ञात होतील, असे पुस्तक केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिले आहे. ‘Veer Savarkar: The Man who could prevented partition’ असे या पुस्तकाचे नाव आहे. या इंग्रजी पुस्तकाचा मराठी भाषेत अनुवाद ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी केले आहे. ‘वीर सावरकर: फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष’ असे अनुवादित पुस्तकाचे नाव आहे.
उद्या गुरुवारी, २० एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह येथे या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आशिष शेलार, खासदार राहुल शेवाळे, आमदार अतुल भातखळकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
वीर सावरकर राष्ट्राची सुरक्षा आणि विदेशनीती यासंदर्भातील द्रष्ट्ये राष्ट्रनायक होते. या देशाला असणारा फाळणीचा धोका सर्वात आधी ओळखून ती टाळण्यासाठी पराकाष्ठेने प्रयत्न करणारे खरेखुरे राष्ट्रनायक. वीर सावरकरांचे राष्ट्रीय विचार जर स्वातंत्र्यपूर्व काळात ऐकले गेले असते, तर फाळणी टळली असती. त्यांच्या विदेशनीतीची सूत्रे आणि दूरदृष्टी लक्षात घेऊन जर धोरणे आखली असती, तर सीमा सुरक्षित राहिल्या असत्या. वीर सावरकर यांच्या या द्रष्टेपणाच्या गुणावर सविस्तर प्रकाशझोत या पुस्तकात टाकण्यात आला आहे.

