Friday, February 14, 2025
Homeएनसर्कलवगसम्राट इंदुरीकरांनी बोली...

वगसम्राट इंदुरीकरांनी बोली भाषेतला वेगळा रंग समाजाला दाखवला..

वगसम्राट दादू इंदुरीकर मराठी बोली भाषेचा मूळ अर्थ बाजूला काढून आपल्या शब्दातून भाषेला वेगळा अर्थ प्राप्त करून दयायचे. त्यातून विनोद घडवायचे. मराठी भाषेवर एव्हढे त्यांचे प्रभुत्व होते. त्यांची विनोदाची एक वेगळी स्वतंत्र शैली होती. सामान्य कलारसिकांना कळेल अशा सोप्या शब्दात ते भाषेची पेरणी करायचे, अशा शब्दांत लोककलेच्या अभ्यासकांनी शनिवारी त्यांच्या लोकरंगभूमीवरील योगदानाबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला.

राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने नाशिकमध्ये “वगसम्राट दादू इंदुरीकर यांचे लोकरंगभूमीला मिळालेले योगदान” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात केला होता. यावेळी श्री साई फ्रेंड सर्कल व दर्शन थियटर निर्मित संजय चव्हाण यांच्या टीमने “गाढवाचं लग्न” हे विनोदी वगनाट्य सादर करून कलारसिकांना खिळवून ठेवले. या वगनाट्याचे या वेळचे वैशिष्ट्यं म्हणजे ज्यांनी दादू इंदुरीकर यांच्यासोबत दिवाणजीची भूमिका केली होती ते ज्येष्ठ लोककलावंत वसंत अवसरीकर यांचासुद्धा या वगनाट्यात सहभाग असल्याने खऱ्या अर्थाने जुन्या आठवणीला उजाळा मिळाला. जेव्हा रंगमंचावर त्यांची इन्ट्री झाली, तेव्हा प्रेक्षकांनी टाळ्या वाजविल्या.

परिसंवादाला सुरुवात होण्यापूर्वी नाशिकचे ज्येष्ठ कवी व साहित्यिक उत्तम कोळगावकर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषदचे सहकार्यवाह सुनिल ढगे यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ घेऊन स्वागत केले.

दादू इंदुरीकर यांनी गाढवाचं लग्न, या वगनाट्याचे दहा हजारापेक्षा अधिक प्रयोग केले. त्यांची भाषाशैली सामान्य लोकांना कळेल अशी होती. उत्कृष्टपणे भाषेची पेरणी करून रसिकांना हसवत असायचे. त्यांना महाराष्ट्राचे पॉल मुनी म्हणत. प्रतिभाशाली सोंगाड्या म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख तयार केली होती, अशा अनेक आठवणी डॉ. खांडगे यांनी सांगितल्या.

मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने जुन्याजाणत्या शाहिर-लोककलावंतांच्या स्मृतीला उजाळा मिळण्यासाठी वेगवेगळे उपक्रम सुरू केल्याबद्दल सरकारचे आभार मानले. उमा बापू सावळजकर यांच्यापासून सुरू झालेली वगनाट्याची परंपरा आजपर्यंत टिकून आहे, असे ते म्हणाले.

खरंतर आपण दादू इंदुरीकर यांची जन्मशताब्दी वर्ष साजरे करत आहोत. त्यांच्या कार्याला उजाळा मिळण्यासाठी शासनाने राज्यभर गाढवाचं लग्न, हा प्रयोग सादर केला पाहिजे अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ यांनी केली. इंदुरीकर यांनी ४० वर्षं कलारसिकांना हसविले. आपल्या विनोदातून वगनाट्य बघायला आलेल्या नामवंतांनासुद्धा वातानुकूलीत नाट्यगृहात घाम फोडायचे, एव्हढ्या ताकदीचा सोंगाडया दादा होते, अशा विविध आठवणी त्यांनी जागवल्या.

दादांनी संपूर्ण आयुष्य तमाशा कलेला वाहून दिले. उच्चभ्रू लोकांना त्यांना तमाशाकडे वळविले. दादा सातवी शिकलेले होते, तरी हजरजबाबी होते. त्यांचे समाजाबद्दल फार निरीक्षण होते. त्यातून ते सहज विनोद घडवायचे. गाढवाचं लग्न, या वगनाट्याच्या माध्यमातून त्यांनी तमाशाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, असे ज्येष्ठ लेखक सोपन खुडे यांनी सांगितले.

रंजना भोसले यांनी दादांच्या कौटुंबिक आठवणीला उजाळा दिला. माझे आजोबा असल्याने त्यांना मी जवळून पाहिले. अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणून दादा होते. जन्माची आणि मृत्यूची नोंद समाजाने घेतली पाहिजे असे कार्य आपण केले पाहिजे, असा मंत्र  दादांनी आम्हाला दिला. त्यांनी वाजविलेली हलगी  बघितली. त्यांचे आपल्या कुटुंबावर खूप प्रेम होते, असे त्या म्हणाल्या.

हरिभाऊ वडगावकर लिखित “गाढवाचं लग्न” असे वगनाट्य दादू इंदुरीकर यांच्यानंतर आता यापुढे कोणी लिहू शकणार नाही अन् सादरही करू शकणार नाही. कारण ते एव्हढ्या ताकदीचे हे लिखाण आहे. या वगनाट्यातून अनिष्ट रूढी, प्रवृत्तीवर त्यांनी कोरडे ओढले आहेत. त्यामुळे असे वगनाट्य पुन्हा होणे नाही, असे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे कार्यकारिणी सदस्य, ज्येष्ठ पत्रकार खंडूराज गायकवाड यांनी सांगितले.

Continue reading

मोदींचा मास्टरस्ट्रोक: 26/11चा मास्टरमाईंड राणाच्या प्रत्यार्पणास ट्रम्पची मंजुरी

26/11च्या मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड आरोपी असलेला पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन उद्योगपती तहव्वुर राणा याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास अमेरिकेने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज, 14 फेब्रुवारीला पहाटे या प्रत्यार्पणास मान्यता दिली. 26/11...

शरद आचार्य क्रीडा केंद्राच्या खेळाडूंचे यश

मुंबईतल्या चेंबूर येथील लोकमान्य शिक्षण संस्था संचालित शरद आचार्य क्रीडा केंद्रातील नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळेत सराव करणाऱ्या अक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स खेळातील 9 खेळाडूंनी देहराडून, उत्तराखंड येथे पार पडलेल्या 38व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत 9 सुवर्णपदके पटकावून महाराष्ट्राला पदक तालिकेत द्वितीय क्रमांकावर...

नाना पटोलेंच्या जागी हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारत त्यांच्याजागी हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे आमदार विजय वडेट्टीवार यांची विधिमंडळ काँग्रेसचे गटनेते म्हणूनही नियुक्ती केली आहे. हर्षवर्धन सपकाळ...
Skip to content