वंदनीय बाळासाहेबांचा विचार तंतोतंत पाळण्याचे आणि पुढे नेण्याचे काम शिवसेना पक्ष करीत आहे. मात्र बाळासाहेबांनी ज्या वीर सावरकरांचा हिंदुत्वाचा विचार तेवत ठेवला, त्या सावरकरांचा अपमान करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी बसविण्यासाठी उबाठा शिवसेनेची काँग्रेस करायला उद्धव ठाकरेंची केविलवाणी धडपड सुरू असल्याची टीका शिवसेनेचे उपनेते तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल एका पत्रकार परिषदेत केला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामंत यांनी मुंबईतील बाळासाहेब भवन येथे पत्रकार परिषद घेत माध्यमाशी संवाद साधला. शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात बाळासाहेबांचे विचार घेऊन शिवसेना मार्गक्रमण करीत आहे. येत्या निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या दोन दिवसांत जाहीर करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

महायुतीतील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष, सर्वांचा सन्मान ठेऊन लोकसभा निवडणुकांसाठी जागावाटप होईल. ४ जूनला मतमोजणीतून जनता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदावर बसवेल. पुन्हा एकदा देशाला न्याय देणारे नरेंद्र मोदी यांचे सरकार केंद्रामध्ये स्थापन होईल, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे, असेही सामंत म्हणाले.
महायुतीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार तयार आहेत. आज शिवाजी पार्कवर होणाऱ्या परिवारवादी मेळाव्यात आघाडीने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा, असे आव्हान त्यांनी इंडिया आघाडीला दिले. गांधी यांना शिवाजी पार्कवरील मेळाव्याला कोण आणत आहे आणि ते वंदनीय बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाकडे पाठ करून स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करतील, हे या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असेही ते म्हणाले.