Homeमाय व्हॉईसउद्धव ठाकरेंचा सरकारविरोध...

उद्धव ठाकरेंचा सरकारविरोध लुटुपुटीचाच!

राज्य सरकारला सत्तेवर येऊन नुकतेच एक वर्ष झाले. या वर्षपूर्तीनिमित्त सरकारचीच बाजू जनतेसमोर आली. मात्र वर्षपूर्ती होताना सरकारवर तुटून पडणारे विरोधी पक्ष सुस्त दिसले. माध्यमांमध्ये तर सरकार वर्षभरात राज्याचा सर्व स्तरावर कसा विकास करत आहे हे जाहिरात नव्हे तर बातम्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दिसले. गेल्या वर्षभरात सरकारने अनेक चुका केल्या असताना त्या चुका दाखवण्याची हिंमत एकाही विरोधी पक्षातील नेत्यांनी दाखवली नाही. उद्धव ठाकरे यांचा विरोध तर लुटुपुटीचाच वाटला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील न्यासावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांची पाच वर्षांसाठी नेमणूक करून त्यांना गप्प बसवले आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दुसरे वाचाळ नेते भास्कर जाधव राज्यातील सरकारवर टीका करण्याऐवजी फक्त रामदास कदम आणि त्यांच्या राज्यमंत्री असलेल्या पुत्रावर टीका करण्यात गुंतले आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार फक्त दाखवण्यासाठी विरोध करतात. ठोस प्रकरण उपस्थित करून सरकारला कोंडीत पकडणे अपेक्षित असताना फक्त विरोधकांची नाममात्र भूमिका बजावणे हे सध्यातरी विरोधी पक्षांना दिलासादायक नाही.

शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सरकारसोबत आहे की सरकारविरोधात, हेच लक्षात येत नाही. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड धारावीच्या पलीकडे बोलत नाहीत. भारतीय जमनता पक्षाचे नेते मोहित कंबोज यांना मुंबईतील प्राईम भागातील मिळालेले झोपडपट्टी विकास प्रकल्प आणि जुहूतील 800 कोटींचा भूखंड यासंदर्भात मुंबई काँग्रेसने मोर्चा काढला होता. परंतु या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याऐवजी तो थंड बासनात का गुंडाळला गेला, याची उत्तरे काँग्रेसने मुंबईकरांना देणे भाग आहे. राज्यात वैधानिक विरोधी पक्ष असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यायी विरोधी पक्षनेते तयार केले आहेत. सामाजिक कार्यकर्त्याची झूल पांघरून सरकारला सोयीचे आणि मुख्यमंत्र्यांच्या सरकारमधील अंतर्गत विरोधकांना हे विरोधक कोंडीत पकडतात. पुण्यातील कोंढवा येथील जमीन घोटाळ्याचे प्रकरण जेवढे विरोधी पक्षांनी लावून धरले नाही तेवढे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. पुण्यातील व्यास प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना घरी पाठवणारे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार हेसुद्धा या प्रकरणाचा जोरदार पाठपुरावा करत आहेत. त्यावेळी विजय कुंभार यांचा बोलाविता धनी वेगळा होता आणि आता कोण आहे हे तेच सांगू शकतील.

ठाकरे

या प्रकरणात आता शीतल तेजवानी, नोंदणी करणारे महसूल विभागाचे अधिकारी रवींद्र तारू यांना अटक झाली आहे. पार्थ पवार आणि त्यांचे मावसभाऊ दिग्विजय पाटील यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असल्यास या दोघांना अटक होऊ शकते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या कुणाच्या सांगण्यावरून या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत हे संपूर्ण राज्याला माहित आहे. मुंबईत किंवा राज्यभर अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे असताना फक्त काही ठराविक प्रकरणांचा पाठपुरावा करण्यात त्यांचा हातखंडा आहे. सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू झाले. या अधिवेशनात सरकारच्या विरोधात भ्रष्टाचाराची प्रकरणे उपस्थित करण्याऐवजी वेगळ्याच विषयाची चर्चा सुरू झाली. दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही याची चर्चा सुरू झाली. परंतु राज्य सरकारच्या असमाधानकारक कामगिरीविषयी कोणीच बोलण्यास तयार नाही.

विधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची संख्या जास्त असल्याने अर्थातच विरोधी पक्षनेतेपद त्यांच्या ताब्यात जाईल. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे पुत्र शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा विरोधी पक्षनेतेपदासाठी पुन्हा सुरू झाली. यापूर्वीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेतेपद देण्याची तयारी दाखवली होती. मात्र ठाकरे भास्कर जाधव यांच्या नावावर ठाम असल्याने मुख्यमंत्र्यांनी गेली दोन अधिवेशने विरोधी पक्षनेतेपद देण्याबाबत चालढकल केली. आता पुन्हा माध्यमांच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. ही चर्चा पुन्हा पुन्हा का सुरू होते याची कल्पना उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला आहे. पावसाळी अधिवेशनानंतर काही दिवसांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची विधान परिषद सदस्यत्वाची सहा वर्षांची मुदत संपली. त्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद सध्या रिक्त आहे. विधान परिषदेत काँग्रेसच्या आमदारांची संख्या जास्त असल्याने तेथील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसच्या ताब्यात जाणार हे निश्चित आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी त्यास संमती दिली आहे. त्यामुळे कोल्हापूरचे बंटी उर्फ सतेज पाटील यांच्या नावाला काँग्रेसने हिरवा कंदील यापूर्वीच दाखवला आहे. चालू हिवाळी अधिवेशनात नवीन विरोधी पक्षनेते आलेच तर ते मुख्यमंत्री आणि विविध मंत्र्यांशी सलोख्याचे संबंध ठेवणार की सरकारला कोंडीत पकडणार हे पुढील काळच ठरवेल.

संपर्क- 9820355612

Continue reading

ठेवी शाबूत राखण्याचे आव्हान मुंबईच्या आयुक्त पेलतील का?

महाराष्ट्रात आयएएस पोस्टिंग झाली की प्रत्येक अधिकाऱ्याची मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि राज्याचे मुख्य सचिव हे स्वप्न असते. त्याचबरोबर आयपीएस अधिकाऱ्याची पोस्टिंग महाराष्ट्रात झाली की त्यांचे स्वप्न मुंबई शहराचे पोलीस आयुक्तपद हे असते. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालकपद नाही. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी...

चमत्कार को नमस्कार! भय्यू महाराज ते कॅप्टन खरात!!

2010नंतर इंदूरचे अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज उर्फ उदयसिंह देशमुख यांचे प्रस्थ राजकारणात बरेच वाढले होते. मूळचे महाराष्ट्रातील भय्यू महाराज यांची सोलापूर भागात मोठ्या प्रमाणात जमीनही होती. मराठा संस्थानिकांपैकी एक संस्थानिक त्यांचे पूर्वज होते असे त्यांचे निकटवर्तीय सांगत. या भय्यू...

राज्यसभेची सातवी जागा आणि महाविकास आघाडीतली बेकी!

राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. 16 मार्चला या निवडणुका होत असून राज्यातून सात खासदार नव्याने राज्यसभेवर जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार, केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, रायगडमधील पेणचे धैर्यशील पाटील, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, रजनी पाटील आणि...
Skip to content