चेंबूर येथील लोकमान्य शिक्षण संस्था संचालित श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या क्रीडा संकुलातील सुसज्ज भव्य हॉलमध्ये गेल्या तीन दशकांपेक्षा जास्त काळ चांगले युवा जिम्नास्ट घडवण्याचा अखंड यज्ञ सुरु आहे. त्यांच्या या तपस्येला गेल्या काही वर्षांत चांगले यश मिळाले असून त्यांचे अनेक खेळाडू प्रकाशात आले, ज्यांनी मग संस्थेचे आणि महाराष्ट्राचे नाव मोठे केले आहे. जिम्नॅस्टिक्सबरोबर मल्लखांब खेळातदेखील त्यांचे खेळाडू आपले कौशल्य दाखवत आहेत. त्यांच्या ३०पेक्षा जास्त खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले तर १००पेक्षा जास्त खेळाडूंनी राष्ट्रीय आणि २००पेक्षा जास्त खेळाडूंनी राज्य स्पर्धेत आपल्या चमकदार कामगिरीचा ठसा उमटवला. त्यांच्या सागर ओव्हाळकरला केंद्र सरकारचा मल्लखांब खेळातील पुरुषांमधील पहिला अर्जुन पुरस्कार मिळाला.

पंधरा जणांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला. त्यामध्ये भा. म. पंत, किसन कदम, जयंत गायकवाड, नम्रता जाधव, डॉ. महेंद्र चेंबूरकर, राहुल ससाणे, श्याम सिंग बिष्ट, योगेश पवार, ललिता मेहता, ज्योती शिंदे, जयश्री प्रिंदावनेकर, मोहन बामणे, अरविंद शिंदे, लक्ष्मी पवार, कुणाल कोटेकर यांचा समावेश आहे. निकेतनच्या एकूण २६ जणांची शासनाच्या जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी निवड झाली आहे. अॅक्रोबॅटिक्स या नव्या जिम्नॅस्टिक्स प्रकारात त्यांच्या खेळाडूंनी शानदार यश संपादन केले आहे. विविध स्पर्धांत आतापर्यंत निकेतनच्या खेळाडूंनी २ हजारपेक्षा जास्त पदकांची कमाई केली आहे. रेवांत रणपिसे, श्लोक पडवळ, महादेव गावडे, श्लोक ठोंबरे, काव्या कुंडे, हर्ष अगरवाल, सान्वी शिंदे, आदित्य दिवे, दिआंत ससाणे, अर्थव जाणसकर, नमो युनियाल, अश्विन गोसावी, रुणल रणपिसे, ऋतुजा जगदाळे, आदित्य खसासे, आकाश गोसावी, वैदेही मयेकर, अर्ना पाटील, आचल गुरव, अक्षदा ढोकळे, कुणाल कोटेकर, रितेश बोऱ्हाडे, प्रशांत गोरे, सोनाली बोऱ्हाडे, प्रीती एखंडे, लक्ष्मी पवार यांनी विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

१९९०च्या दशकात भा. म. पंत यांनी शरद आचार्य यांना हाताशी घेऊन जमीन विकत घेऊन लोकमान्य शिक्षण संस्थेच्या माध्यमातून श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन, जवाहर विद्या भवन आणि शरद आचार्य विद्यालय या तीन शाळांचा श्रीगणेशा केला. पंत चेंबूर हायस्कूल मध्ये शिक्षक होते. नंतर ते मुख्याध्यापक झाले. त्यानंतर काही काळ ते जवाहर विद्या भवन शाळेत मुख्याध्यापक होते. जसे अभ्यासात विविध विषय असतात आणि त्याची माहिती विद्यार्थ्यांना असणे आवश्यक आहे. तसेच आपले जे काही प्रमुख खेळ आहेत, त्याची माहिती विद्यार्थ्यांना असणे आवश्यक आहे असे पंत सरांचे मत होते. आपल्या शाळेतील विद्यार्थी जेव्हा एस.एस.सी. होऊन बाहेर पडतील तेव्हा ते मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कणखर असायला पाहिजेत, जेणेकरुन ते कुठल्याही आव्हानाचा यशस्वी मुकाबला करु शकतील ही त्यामागील धारणा होती. त्यामुळे पंत सरांनी अभ्यासाबरोबर खेळावर पण भर दिला. त्यामुळेच विद्यानिकेतनमधून चांगल्या खेळाडूंची एक, एक फळी तयार होऊ लागली. सुरूवातीला जिम्नॅस्टिक्स, जलतरण, अॅथलेटिक्स, मल्लखांब, बास्केटबॉल, हॅन्डबाल या खेळांची निवड त्यांनी केली. त्यासाठी शाळेला मोठे मैदान हवे हेदेखील हेरुन त्यांनी तीनही शाळांमध्ये मोठी जागा मैदानासाठी राखून ठेवली. या उपक्रमात पंत यांना शाळेचे माजी क्रीडा शिक्षक किसन कदम यांचीदेखील मोलाची साथ मिळाली. मग या खेळांची नियमित प्रशिक्षण शिबिरे सुरु करुन शाळेतील विद्यार्थी वर्गाला ती बंधनकारक करण्यात आली. त्याच शिबिराच्या माध्यमातून चांगले खेळाडू मिळत गेले.

शाळेचा हा परिसर तसा मध्यमवर्गीय लोकवस्तीचा. येणारा विद्यार्थी सर्वसामान्य कुंटुबातला. पण त्याची प्रचंड मेहनत आणि परिश्रम घेण्याची तयारी असल्यामुळेच जिगरबाज खेळाडू विद्यानिकेतनला मिळाले. आज तीन दशकांपेक्षा जास्त काळ नियमित प्रशिक्षण सुरु आहे. सांयकाळी सहा ते दहा वेळात रोज वर्ग सुरु असतात, तर रविवारी सकाळी हा वर्ग असतो. आज शंभरपेक्षा जास्त मुले, मुली या वर्गाचा नियमित लाभ घेत आहेत. स्पर्धेच्या अगोदर काही दिवस सराव, वेळेत मोठी वाढ होते. जिम्नॅस्टिक्स, मल्लखांब, योगा यावर या वर्गात भर दिला जातो. सुरूवातीला अवघी २५ रुपये फी होती. त्यानंतर ५०, १०० रुपये झाली. २०१०पासून ती ५०० रुपये करण्यात आली. ज्यांना तीदेखील द्यायला शक्य नसेल त्यांना माफ केली जाते. माजी आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स खेळाडू शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त डॉ. महेंद्र चेंबूरकर आणि सुरेश भगत मुख्य प्रशिक्षक म्हणून बरीच वर्षे काम बघत आहेत. त्यांच्यासोबत सहाय्यक म्हणून राहुल ससाणे, योगेश पवार, सुनील रणपिसे हे आहेत. भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम यांचेदेखील मोलाचे सहकार्य विद्यानिकेतनला मिळत आहे. योगेश पवार, सोनाली बोऱ्हाडे हे आंतरराष्ट्रीय पंच आहेत. त्याशिवाय दहा राष्ट्रीय पंच विद्यानिकेतनमध्ये आहेत. अध्यक्ष अॅड. लीलाधर डाके, सचिव माणिक पाटील, विश्वस्त सुबोध आचार्य, निवृत्ती डांगे, हरिश्चंद्र गवस, विनायक कुलकर्णी या सर्वांचे नेहमीच सहकार्य मिळत असल्यामुळे श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या खेळाडूंची वाटचाल जोमात सुरु आहे. सध्या अॅक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्समध्ये राज्यात श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनचे खेळाडू अव्वल क्रमांकावर आहेत. या खेळाडूंनी चेंबूरला आंतरराष्ट्रीय जगाच्या नकाशावर आणले आहे. भविष्यात विद्यानिकेतनचा हा चांगले जिमनास्ट घडवण्याचा यज्ञ अखंड सुरु राहिल अशी आशा करुया.



(लेखक सुहास जोशी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

