Saturday, September 14, 2024
Homeकल्चर +उद्या 'मिफ्फ'ची सुरूवात...

उद्या ‘मिफ्फ’ची सुरूवात होणार ‘बिली अँड मॉली..’ने!

नॅशनल जिओग्राफिकची निर्मिती असलेल्या ‘बिली अँड मॉली : ॲन ऑटर लव्ह स्टोरी’ या ओपनिंग फिल्मने यंदाच्या 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (मिफ्फ) सुरूवात  होणार आहे. उद्या, 15 जूनला मुंबई, या महोत्सवाच्या मुख्य ठिकाणाबरोबरच दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि पुण्यात एकाच वेळी ‘बिली अँड मॉली : एन अटर लव्ह स्टोरी’ ही ओपनिंग फिल्म दाखवली  जाणार आहे.

त्याशिवाय 17 जूनला दिल्ली, 18 जूनला चेन्नई, 19 जून रोजी कोलकाता आणि 20 जूनला पुणे इथे होणाऱ्या रेड कार्पेट सोहळ्याच्या वेळीही हा माहितीपट दाखवला जाणार आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव उद्या, 15 जून 2024 ते 21 जून 2024 या कालावधीत मुंबईत होत आहे.

चार्ली हॅमिल्टन जेम्स दिग्दर्शित बिली अँड मॉली: ॲन ऑटर लव्ह स्टोरी (इंग्रजी- 78 मिनिटे) ही शेटलँड या एका दुर्गम बेटावर राहत असलेली एक व्यक्ती आणि त्याची एका रानटी पाणमांजरासोबत जुळलेल्या अविश्वसनीय मैत्रीची हृदयस्पर्शी कथा आहे. या मनोरंजनक माहितीपटातून मॉली नामक स्वतःच्या कळपापासून दूर झालेल्या एका रानमांजराचा हृदयस्पर्शी प्रवास उलगडतानाच स्कॉटलंडमधील शेटलँड बेटांलगतच्या किनाऱ्यांचाही मनमोहक पद्धतीने वेध घेतला आहे.

जेव्हा मॉली हे रानमांजर दुर्बल अवस्थेत बिली आणि सुझान यांच्या निर्जन धक्क्यावर धडकते तेव्हा तिला परस्पर काळजी आणि आपुलकीच्या भावनांची भुरळ पाडणारा अनुभव येतो. मॉलीच्या खेळकर आणि खोडकर स्वभावामुळे बिलीची मॉलीसोबतची जवळीक वाढू लागते आणि हळूहळू त्यांच्यात एक गहिरा बंधही निर्माण होतो. त्यांच्यातल्या या नात्याने शेटलँड्सच्या रुक्ष वातावरणात प्रेमबंधाची ज्योत पेटवणारी उत्कंठावर्धक कहाणी आकार घेऊ लागते.

मॉलीला बरे करून तिला पुन्हा सुदृढ अवस्थेत आणण्यासाठी आणि तिचे जंगलातले सामान्य जगणे पुन्हा जगायला मिळावे यासाठी बिलीची धडपड, म्हणजे माणूस आणि निसर्ग यांच्यातील अतूट आणि तितक्याच गुंतागुंतीच्या नात्याचा शोध घेण्याचाच प्रयत्न आहे. हे सगळ्याची या माहितीपटात ज्या संवेदनशीलतेने मांडणी केली आहे ती पाहून  प्रेक्षकांना सहजिवनाच्या परिवर्तनीय सामर्थ्याचीच साक्ष मिळते.

उद्या शनिवारी, 15 जूनला दुपारी 2.30 वाजता मुंबईतील पेडर रोड इथल्या राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्राहलयाच्या संकुलात या माहितीपटाचा खेळ दाखवला जाणार आहे. त्याचवेळी म्हणजेच 15 जूनला दुपारी 2.30 वाजता नवी दिल्लीत सिरी फोर्ट ऑडिटोरियम, चेन्नईमध्ये राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे टागोर फिल्म सेंटर , कोलकात्यात सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट इथे आणि पुण्यामध्ये राष्ट्रीय चित्रपट संग्रहालायाच्या संकुलातही हा माहितीपट दाखवला जाणार आहे.

दिग्दर्शकाविषयी-

चार्ली हॅमिल्टन जेम्स हे एक प्रसिद्ध वन्यजीव चित्रपट निर्माता असून वन लाईफ, या त्यांच्या  माहितीपटासाठी त्यांना न्यूज आणि डॉक्युमेंटरी एमी पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी ‘माय हॅल्सियन रिव्हर’मधून दिग्दर्शनात पदार्पण केले. त्यानंतर आलेल्या त्यांच्या ‘आय बॉट अ रेनफॉरेस्ट’ या लघुपट मालिकेद्वारे त्यांनी ॲमेझॉनमध्ये जमीन खरेदी केल्यानंतर त्याच्या साहसांचे चित्रण केले आहे.

18व्या मिफ्फविषयी-

मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (मिफ्फ), हा दक्षिण आशियातील माहितीपट, कथाबाह्य  चित्रपटांसाठीचा सर्वात जुना आणि सर्वात मोठा चित्रपट महोत्सव म्हणून ओळखला जातो. माहितीपट, लघुपट, ॲनिमेशन चित्रपटांची कला साजरी करणाऱ्या या महोत्सवाचे हे 18वे वर्ष आहे. 1990मध्ये सुरू झालेला आणि भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नेतृत्त्वाखाली आयोजित केलेला मिफ्फ, हा चित्रपट महोत्सव आता जगभरातील सिनेप्रेमींना आकर्षित करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात गणला जातो.

या वर्षीचा महोत्सव हा एक खास उत्सव असेल कारण यात 38हून अधिक देशातील 1018 चित्रपटांच्या  प्रवेशिकांचा समावेश आहे. यंदा हा महोत्सव एकाच वेळेस एकापेक्षा जास्त ठिकाणी समांतर स्क्रीनिंगच्या माध्यमातून दिल्ली, कोलकाता, पुणे आणि चेन्नई येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या शहरांमधील अन्य प्रेक्षकांना याचा आस्वाद घेता येणार आहे.

यंदा या महोत्सवात 300हून अधिक माहितीपट / लघु आणि ॲनिमेशनपट जाणार आहेत. 18व्या मिफ्फमध्ये 25हून अधिक पॅनेल चर्चाआणि मास्टरक्लासेस यांचे आयोजन केले असून त्यात ज संतोष सिवन, ऑड्रिअस स्टोनीस, केतन मेहता, शौनक सेन, रिची मेहता आणि जॉर्जेस श्विजगेबेल यासारखे प्रतिथयश चित्रपट निर्माते सहभागी होऊन मार्गदर्शन करतील. याशिवाय या महोत्सवात अनेक कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले असून त्यात ॲनिमेशन क्रॅश कोर्स आणि व्हीएफएक्स पाइपलाइन यांचा समावेश असून हे सर्व उपक्रम सहभागींना चित्रपट निर्मितीच्या जगाची मौल्यवान माहितीचा खजाना उपलब्ध करून देतील.

Continue reading

योजनादूत व्हा आणि महिन्याला १० हजार कमवा!

शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता १७ सप्टेंबर २०२४पर्यंत यासाठी नोंदणीअर्ज करता येणार आहे. इच्छुकांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन महाराष्ट्राच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत...

नोटा उडवणाऱ्या शिवसैनिकांची होणार हकालपट्टी!

ठाण्याच्या आनंदाश्रमात ढोलताशांच्या तालावर नोटा उधळणाऱ्या कथित शिवसैनिकांची चौकशी चालू असून या लोकांना पक्षातून ताबडतोब काढून टाकले जाईल, अशी घोषणा शिवसेनेचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी बोलताना केली. https://youtube.com/shorts/AEdfBCtuU4Y मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरात आणि त्यांच्या दैवताच्या आनंदाश्रमात केवळ पैसेच उडवले...

वांद्र्याचा नाला खुलला बोगनवेलीने..

मुंबईतल्या पश्चिम महामार्गावर खेरवाडीजवळ असलेला जवळजवळ अर्धा किलोमीटरचा नाला अलीकडे नव्याने बंद करण्यात आला. या नाल्यावर मुंबई महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाने नुकतेच सुशोभिकरण केले. बहरलेल्या बोगनवेलीच्या झाडांनी तसेच टोपियारींनी हा नाला आता असा खुलून...
error: Content is protected !!
Skip to content