विक्रमी ४२ वेळा भारतीय क्रिकेट विश्वातील मानाची समजली जाणारी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱ्या बलाढ्य मुंबई क्रिकेट संघावर यंदाच्या मोसमातील या स्पर्धेतील अ गटातील ६व्या फेरीतील लढतीत दुबळ्या जम्मू काश्मिर संघाविरुद्ध आपल्याच वांद्रे संकुलातील स्टेडियममध्ये लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. विशषे म्हणजे उभय संघात झालेल्या आतापर्यंतच्या दोन्ही लढतीत जम्मू काश्मिरने मुंबईला नमविण्याचा पराक्रम केला. उभय संघात याअगोदर २०१४मध्ये वानखेडे स्टेडियममध्ये मुकाबला झाला होता. त्या पहिल्या लढतीत जम्मू काश्मिरनेच ४ गडी राखून विजय मिळवला होता. याअगोदर जम्मू काश्मिरसारखा पराक्रम कर्नाटक संघाने मुंबईविरुद्ध केला होता. २०१४-१५ आणि २०१७-१८ अशा सलग झालेल्या दोन्ही सामन्यात कर्नाटकाची सरशी झाली होती.
रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर हे सहा स्टार आंतरराष्ट्रीय खेळाडू मुंबई संघात होते. त्यामुळे मुंबई संघ ही लढत सहज जिंकून आपल्या मागील पराभवाचा बदला घेईल अशी आशा तमाम मुंबईकर क्रिकेटप्रेमी बाळगून होते. कागदावर मुंबई संघाचेच पारडे जड होते. परंतु शार्दुल ठाकूरचा अपवाद वगळता शर्मा, जयस्वाल, कर्णधार रहाणे, अय्यर, दुबे हे सर्व खेळाडू “फ्लॉप” ठरले. त्यामुळेच मुंबईवर या लढतीत पराभवाची नामुष्की आली. पाहुण्या जम्मू काश्मिर संघाने आपला लढाऊ बाणा दाखवत मुंबईला घरच्याच मैदानात दुसऱ्यांदा चितपट केले. तब्बल १० वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा रणजी स्पर्धेत पुन्हा एकदा उतरला. परंतु रोहितच्या धावांचा दुष्काळ अजूनही संपत नाही. या सामन्यातदेखील त्याने पहिल्या डावात ३ आणि दुसऱ्या डावात २८ धावा केल्या. गेले बरेच महिने रोहितच्या बॅटमधून धावांचा वेग मंदावला आहे. त्याचीच प्रचिती या सामन्यातदेखील पुन्हा एकदा बघायला मिळाली. रोहितचा सहकारी जयस्वाल पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात २६ धावा करू शकला. कर्णधार रहाणेने १२ आणि १६ धावा केल्या. श्रेयस अय्यरने ११ आणि १७ धावा फटकावल्या. शिवम दुबेला तर दोन्ही डावात भोपळादेखील फोडता आला नाही. कागदावर भक्कम वाटणारी मुंबईची फलंदाजी पूर्णपणे कोसळली आणि त्यामुळेच दारुण पराभवाला त्याला सामोरे जावे लागले.
मुंबईचा कर्णधार रहाणेने सामन्यातील महत्त्वाची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु मुंबईची फलंदाजी पहिल्या डावात जम्मू काश्मिरच्या सुरेख वेगवान माऱ्यासमोर ढासळली. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे अवघ्या १२० धावात मुंबई संघ गारद झाला. सुरुवातीला तर ७ बाद ४७ धावा अशी घसरगुंडी उडाली होती. परंतु अष्टपैलू शार्दुल ठाकूर आणि तनुष कोटीयनने ८व्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी केल्यामुळे मुंबईला १०० धावांचा टप्पा गाठता आला. ठाकूरने ५७ चेंडूत ५१ धावा ठोकल्या तर तनुषने ३६ चेंडूत २६ धावा केल्या. जम्मू काश्मिरच्या युधवीर सिंग आणि उमर नाझीरने प्रत्येकी ४ बळी घेतले. या दोघांना नबी अकीबने दोन बळी घेऊन चांगली साथ दिली. जम्मू काश्मिरने पहिल्या डावात २०६ धावांची मजल मारली. त्यांच्या शुभमने ५३, हसनने २९. अबीदने ४४ धावा केल्या. मुंबईतर्फे अवस्तीने ५ बळी टिपले. ठाकूर, मुलानीला प्रत्येकी २ बळी मिळाले. दुबेला १ बळी घेण्यात यश आले.
पहिल्या डावाप्रमाणेच मुंबईची दुसऱ्या डावातदेखील दाणादाण उडाली. ७ बाद १०१ धावा अशी बिकट अवस्था झाली असताना पुन्हा एकदा ठाकूर, तनुष मुंबईच्या मदतीला धावून आले. त्यांनी ८व्या विकेटसाठी शतकी भागीदारी केल्यामुळेच मुंबईला २५० धावांचा टप्पा ओलांडता आला. ठाकूरने झुंजार शतकी खेळी केली तर तनुषने अर्धशतक फटकावले. दुसऱ्या डावात जम्मू काश्मिरच्या नबीने ४, सुधवीर सिंगने ३, नाझीरने २ बळी टिपले. जम्मू काश्मिरने २०२ धावांचे विजयी लक्ष्य तिसऱ्या दिवशी चहापानापूर्वीच साध्य केले. त्यांच्या खजुरीयाने ४५, हसनने २४, शर्माने ३८, समादने २४, मुश्ताकने नाबाद ३२ आणि वाधवानने नाबाद १९ धावा करुन जम्मू काश्मिरला विजयपथावर नेले. चांगल्या सुरुवातीनंतर जम्मू काश्मिरची २ बाद ११२ या धावसंख्येवरून ५ बाद १५७ अशी घसरगुंडी उडाली होती. परंतु त्यानंतर मुश्ताक वाधवानने ६व्या विकेटसाठी चिवट फलंदाजी करून नाबाद ४८ धावांची भागीदारी केली आणि आपल्या संघाची नौका सुखरुप किनाऱ्याला लावली. मुश्ताकने कोटियनला षटकार खेचून त्यांच्या विजयाबर शिक्कामोर्तब केले.
मुंबईच्या संघ व्यवस्थापनाचा खेळपट्टीबाबतचा अंदाज चुकला. त्यामुळे प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय अंगलट आला. पहिल्या दिवशी खेळपट्टीवर चेंडू जास्त सीम आणि स्वींग होत होता याचा पुरेपूर फायदा जम्मू काश्मिरच्या वेगवान गोलंदाजांनी घेतला. तिसऱ्या दिवसापासून खेळपट्टी फिरकीला साथ देईल अशी आशा मुंबई संघ करत होता. परंतु जम्मू काश्मिरच्या सामन्यातील चौथ्या डावात चेंडू विशेष फिरत नव्हता. मुलानीने सलग १५ षटके मारा करताना ४ फलंदाज टिपले. परंतु दुसऱ्या बाजूने त्याला इतर गोलंदाजांची साथ मिळाली नाही. ७ बळी घेणारा जम्मू काश्मिरचा युवा वेगवान गोलंदाज युधवीर सिंग सामनावीर ठरला. फॉर्मात असलेल्या आयुष म्हात्रेला वगळण्याची चूक मुंबईला भोवली. यंदा या स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या आयुषने ५ सामन्यात ४०८ धावा करताना २ शतके फटकावली होती. रोहित शर्माला जागा करुन देण्यासाठी आयुषला संघाबाहेर बसावे लागले.
या सामन्यासाठी निवडण्यात आलेला डावखुरा गोलंदाज २८ वर्षीय कर्श कोठारीची निवड वादग्रस्त होती. तब्बल ६ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर त्याला मुंबई संघात संधी देण्यात आली. डिसेंबर २०१८मध्ये तो शेवटचा सामना खेळला होता. तो अवघे ६ सामने खेळला आणि त्याच्या नावावर १० बळींची नोंद आहे. त्यात एका सामन्यात त्याने ५ बळी टिपले होते. आता या पराभवामुळे मुंबई संघावर साखळीतच गारद होण्याची पाळी येऊ शकते. त्यांचा आता शेवटचा सामना दुबळ्या मेघालय संघाविरुद्ध आहे. या सामन्यात मुंबईने जरी एकूण ७ गुण मिळविले तरीदेखील त्यांची बाद फेरीतील वाटचाल बडोदा-जम्मू काश्मिर या लढतीच्या निकालावर अवलंबून आहे. आता जम्मू काश्मिरने २९ गुण मिळवून अ गटात अव्वल क्रमांक मिळविला आहे तर बडोद्याचे २७ गुण झाले. २२ गुण असलेला मुंबई संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे.
या सामन्यातील पंचांची कामगिरीदेखील समाधानकारक नव्हती. त्याबाबत त्याबाबत जम्मू काश्मिरचे पदाधिकारी असलेले ब्रिगेडियर अनिल गुप्ता बीसीसीआयकडे लेखी तक्रार करणार आहेत. सामन्यातील बरेचसे निर्णय वादग्रस्त असल्याची टिका गुप्ता यांनी केली. मुंबईच्या दुसऱ्या डावात कर्णधार रहाणे बाद होऊन ड्रेसिंग रुममध्ये जाणार एवढ्यात पंचांनी तो नाबाद असल्याचा कौल देऊन त्याला माघारी बोलावले, कारण तो बाद झालेला चेंडू “नोबॉल” असल्याचे पंचांच्या निदर्शनास आले. मुंबईचा फलंदाज श्रेयस अय्यरदेखील सुरुवातीला बाद असताना त्याला नाबाद ठरवले. टि.व्ही रिप्लेमध्ये तो चक्क बाद असल्याचे दिसत होते. नंतर जेव्हा त्याला पंचांनी बाद दिले तेव्हा अय्यरने नाराजी व्यक्त करताना बराच वेळ पंचांशी चर्चा केली. एकूणच पंचांच्या दर्जाबाबत अधिक सुधारणा होण्यासाठी बीसीसीआयने काहीतरी ठोस उपाययोजना करायला हवी. एकंदरच परिस्थितीनुसार आपला खेळ उंचावण्यात मुंबई संघाला अपयश आले असेच म्हणावे लागेल. या पराभवातून मुंबई संघ नक्कीच बोध घेईल अशी आशा करूया.