‘द एलिफंट व्हिस्परर्स’च्या निर्मात्या गुनीत मोंगा कपूर, यांनी सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपट 2023 मध्ये अकादमी अवॉर्ड्स जिंकला होता, त्यांनी चर्चासत्राच्या प्रारंभीच सांगितले की, ऑस्करच्या मार्गावर उत्कृष्ट बनण्यासाठी चित्रपटाचे वितरण ही गुरुकिल्ली आहे.
भारताच्या 54व्या इफ्फी म्हणजेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात काल आयोजित केलेल्या इन- कनर्व्हसेशन’ संवाद सत्रामध्ये यामागचे गूढ उलगडले आणि जणू ऑस्कर जिंकण्याचे मार्ग मोकळे झाले.
अकादमी पुरस्कारांच्या शर्यतीत अमेरिकेमध्ये वितरीत केलेल्या चित्रपटांनी सुरुवात होते. तुम्हाला या वितरण प्रणालीचे ज्ञान, रणनीती आणि योग्य भागीदार आवश्यक आहेत. भारतातील ऑस्करसाठी चित्रपटांची निवड करणार्या समितीने चित्रपट निवडून येण्याची शक्यता वाढवणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या. यावेळी गुनीत मोंगा कपूर यांनीही जागतिक स्तरावर चित्रपटांना ठळकपणे दाखविण्यासाठी चित्रपट महोत्सवांच्या भूमिकेवर भर दिला. ऑस्करमध्ये चित्रपटांना पुरस्कार मिळण्याची शक्यता वाढवण्यासाठी, तो चित्रपट आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये प्रदर्शित झाला पाहिजे आणि तेथे पुरस्कार जिंकले पाहिजेत, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

‘ऑस्कर’ या नावालाच लोकप्रियतेचे वलय आहे. हे जगातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित अकादमीचे पुरस्कार जगभरातील कोणत्याही चित्रपट निर्मात्याला उत्तेजित करणारे आहेत. भारतीयांसाठी, बराच काळ हा प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार त्यांच्या आवाक्याबाहेर राहिला. मात्र एके दिवशी, भानू अथय्या यांनी 1982च्या गांधी चित्रपटातील त्यांच्या कामासाठी सर्वोत्कृष्ट वेशभूषेचा अकादमी पुरस्कार जिंकला आणि त्याचवेळी या पुरस्कारापर्यंत असलेली काचेच्या तावदानाची जणू कमाल मर्यादा संपुष्टात आली. यानंतर अनेक भारतीय ए. आर. रहमान, रेसुल पुकुट्टी, एम. एम. कीरवानी, गुनीत मोंगा कपूर आणि कार्तिकी गोन्साल्विस यांनी ऑस्करमध्ये यश संपादन केले आणि भारतीयांनी सिद्ध केले की, हा पुरस्कार साध्य आणि जिंकण्यायोग्य आहे. परंतु ऑस्कर जिंकण्याचे मार्ग आजही अनेकांसाठी अवघड, गूढ म्हणावेत असेच आहेत.
गुनीत मोंगा कपूर यांनी आतापर्यंत ‘द लंचबॉक्स’, ‘मसान’ आणि ‘गँग्स ऑफ वासेपूर’ यांच्यासह जवळपास 30 वैशिष्ट्यपूर्ण आणि लक्षवेधी चित्रपटांची निर्मिती केली आहे्. या सिनेमांचे कान्स, टीआयएफएफ आणि सनडान्स यासारख्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये समीक्षकांकडून कौतुक केले गेले आहे. ऑस्कर जिंकण्याचा फॉर्म्युला सामायिक करताना, एका निर्मातीने सांगितले की, बनवलेला प्रत्येक चित्रपट ऑस्कर जिंकेलच, या गृहितकाने ती सुरुवात करते.
स्लमडॉग मिलेनियरच्या कामगिरीने ऑस्कर पुरस्कार मिळवून देणारे ख्यातनाम साऊंड डिझायनर आणि प्रॉडक्शन मिक्सर रसुल पुकुट्टी यांनी, गुनीत मोंगा कपूर यांच्या, केवळ आंतरराष्ट्रीय सहयोगाने देशाला अकादमी पुरस्कार मिळतील, या मताला असहमती दर्शवली. रसुल पुकुट्टी म्हणाले की, भारत जेव्हा एखादा चित्रपट अकादमी पुरस्कारांसाठी पाठवतो, तेव्हा त्या चित्रपटाने आपल्या देशाचे आणि इथल्या विविधतेचे प्रतिनिधित्व करायला हवे. दिग्गज चित्रपट निर्माता ऋत्विक घटक यांचा उल्लेख करून ते पुढे म्हणाले की, “आपण जेवढे आपल्या देशाशी एकरूप होतो, तेवढेच सार्वत्रिक बनतो. आपल्या देशाची भूमिका मांडणारी कल्पनादेखील एक जागतिक विचार बनू शकते.”

रसुल पुकुट्टी यांनी असेही सुचवले की, सरकार भारतीय चित्रपटांना त्यांच्या ऑस्कर प्रवासात मदत करण्यासाठी एक निधी स्थापन करू शकते, जेणेकरून ते जनसंपर्क संस्थांच्या मदतीने ही मोहीम यशस्वीपणे राबवू शकतील. ऑस्करसाठी चित्रपट निवडण्याची प्रक्रिया निरोगी आणि स्पर्धात्मक असायला हवी, असेही ते म्हणाले. तरुण चित्रपट निर्मात्यांपुढे मोलाचा विचार मांडताना रसुल पुकुट्टी आणि गुनीत मोंगा कपूर म्हणाले की, केवळ ऑस्करच्या ध्येयाने प्रेरित राहू नये, कारण तोच एक चित्रपट निर्मितीच्या सर्वोत्तमतेचा मापदंड नाही.
शॉर्ट्स टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अकादमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेस (एएमपीएएस) आणि ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स (बाफ्टा) या दोन्हींचे सदस्य कार्टर पिल्चर हेदेखील या सत्राला उपस्थित होते. ते म्हणाले की, उत्तम कथा आपल्याला पुरस्कार मिळवून देतात, आणि भारताकडे सांगण्यासाठी अनेक आशयसंपन्न कथा आहेत. कार्टर पिल्चर यांनी लघुपटांच्या श्रेणीतही पुरस्कारांसाठी तीव्र स्पर्धा निर्माण झाल्याचे मान्य केले. त्यांनी ऑस्कर पुरस्कार ठरवताना AMPAS अनुसरत असलेली प्रक्रिया आणि टाइमलाइन देखील स्पष्ट केली.
हिंदुस्तान टाइम्सच्या मनोरंजन आणि जीवनशैली विभागाच्या मुख्य व्यवस्थापकीय संपादक आणि चित्रपट पत्रकारितेसाठीचा रामनाथ गोएंका पुरस्कार प्राप्त सोनल कालरा यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले.