Homeन्यूज अँड व्ह्यूजएआय जगताला 'पाटील...

एआय जगताला ‘पाटील इफेक्ट’चा दणका! २५ लाख कोटी गमावले!!

फेब्रुवारीच्या पहिल्या सप्ताहात जगातील आयटी आणि एआय उद्योगांना प्रचंड मोठा हादरा बसला. जगभरातील या क्षेत्रातील सर्वच बड्या दादा कंपन्यांनी मिळून, त्यांच्या शेअर बाजारातील मूल्यामधून, २५ लाख कोटी रुपयांचे बाजारमूल्य एकाच दणक्यात गमावले. शेअर बाजारातील घसरणीमुळे त्यादिवशी इन्फोसिस व टीसीएससारख्या मोठ्या भारतीय आयटी कंपन्यांनीही जवळपास दोन लाख कोटी रुपयांचा फटका झेलला. याचे कारण अँथ्रोपिक या एआय क्षेत्रात पायाभूत काम करणाऱ्या कंपनीने एआयमधील सर्वात पुढची आवृत्ती ठरणारे, “क्लोड”, हे नवे टूल बाजारात आणले. त्याने तंत्रजग हादरले. पडझड झाली. अँथ्रोपिक हा शब्दच मुळी अँथ्रोपॉलॉजी मानववंशशास्त्र यावरून बेतला आहे. तंत्रक्षेत्राला हादरवणाऱ्या त्यांच्या कामाचा अंदाज असणाऱ्या इलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट केले की, “या कंपनीला मानवांचीच घृणा दिसते, यांनी अँथ्रोपिक म्हणण्याऐवजी स्वतःला मिसअँथ्रोपिक असे नाव ठेवायला हवे होते!” अँथ्रोपिकने आणलेल्या नव्या एआय टूलमुळे हजारो कामगार-कर्मचाऱ्यांची दैना उडण्याची शक्यता पाहता मस्क यांची ती व्याख्या पटूही शकते. डॅनिएला अमोडिली या तरूण तंत्रज्ञ बाईंनी या कंपनीची अवघ्या सहा वर्षांपूर्वी स्थापना केली. त्याआधी त्या ओपन एआयमध्ये कार्यरत होत्या. जेमतेम तिशी-चाळीसीतील त्यांच्या सहकाऱ्यांनी, जे काम मोठमोठ्या टेक कंपन्यांना जमले नाही ते करून दाखवले आहे!

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआय, ही संकल्पना जरी जुनी असली तरी त्याचा प्रत्यक्षातली आविष्कार, अनेक संगणकाच्या जोडणीतून सुरु होणाऱ्या नेटवर्कमधून झालेली आहे. जसजशी संगणक तंत्रज्ञानात प्रगती होत गेली तसतशी अधिकाधिक वेगाने प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या क्षमतेच्या संगणकांची गरज भासू लागली. शेकडो सर्वर एकत्र असणाऱ्या क्लाऊड टेक्नॉलॉजीमधून एआय व मशीन लर्निंग, या आणखी आधुनिक क्षेत्रांचा उगम झाला. अमेरिकतील कंपन्यांना संगणकीय सेवा व सोल्युशन देणाऱ्या कंपन्या जगभरात सुरु झाल्या आणि त्यातूनच क्लाऊड कंप्युटिंगचे विविध पैलू आणि त्यातून आर्टिफिशयल इंटेलिजन्सचे नवे आयाम दिसू लागले. गेल्या दोन दशकांत एआय शब्द अधिक वेगाने कानी पडू लागला आणि अलिकडच्या काही वर्षांत तो रोजच्या जीवनातही दिसू, जाणवू लागला. तुमच्या हाकेसरशी गाणी ऐकवणारी, फोन जोडून देणारी सेरी वा अलेक्सा ही त्याची लहान रूपे आहेत. विविध देशात बसून कामे करणाऱ्या दहा तंत्रज्ञांचे काम एकत्र करून अमेरिकेतील एखाद्या कंपनीच्या अकाऊंटिंगचे सारे प्रश्न सोडवणारी साधने, हे एआयचे अधिक व्यापक रूप आहे. एआयच्याच वापरातून खेड्यापाड्यातील नागरिकांना शहरातील अत्याधुनिक डॉक्टरचा सल्ला मिळवून देता येऊ शकतो. अथवा शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची एकाचवेळी पडताळणी करून त्यातून चुकार मोटारगाडीचा शोध वा गुन्ह्याची उकल, एआय करून देते. एआयने आता रोजच्या जीवनातील विविध क्षेत्रे पादाक्रांत करायला सुरुवात केली आहे. सिनेमाची स्क्रीप्ट लिहिणे, दोन-चार ओळींच्या माहितीच्या आधारे पूर्ण वृत्तकथा तयार करणे, देशोदेशीच्या इंग्रजी मासिके वृत्तपत्रांमधून तुमच्या आवडीच्या विषयाची कात्रणे क्षणार्धात हजर करणे… अशी कामे लीलया करण्यामध्ये एआयचा भरपूर वापर सध्या होत आहे. व्हिडिओ तयार करणे, इतकेच नव्हे तर पूर्ण तीन तासांचा सिनेमा जुळवून देणे, हेही काम एआय करू शकते.

आता अँथ्रेपिकने जो “क्लोड” नावाचा एआय एजंट बाजारात आणला आहे त्यामुळे बिग डेटाच्या प्रचंड मोठ्या माहितीतून सुटसुटीत कामे करून देणाऱ्या बड्या टेक कंपन्यांचा पायाच हादरला आहे. कारण या कंपन्या जी कामे करण्यासाठी लाखो डॉलर्सची कंत्राटे घेत असतात, तीच सारी कामे क्लोड आता मूळ कंपनीसाठी अत्यंत कमी किंमतीत करून देणार आहे. अँथ्रोपिकचा प्रमुख तांत्रिक अधिकारी (सीटीओ) भारतीय तरूण आहे. त्यांचे नाव राहुल पाटील! बेंगळुरूमध्ये कंप्यूटर सायन्सचे पदवीधर असणारे व सध्या अमेरिकेतील सिएटलमध्ये वास्तव्य पाटील यांनी बेंगळुरूतील फार प्रसिद्ध नसणाऱ्या महाविद्यालयातून इंजिनिअरींगची पदवी घेतली. अमेरिकेत कंप्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. नऊ वर्षे ते मायक्रोसॉफ्टमध्ये होते.

एआय

त्यादरम्यान त्यांनी वॉशिंग्टन विद्यापीठातून एमबीए पूर्ण केले. अमेझॉनमध्येही ते होते. तिथे वेब सर्विसेस विभागात त्यांनी महत्त्वाचे काम केले. प्रचंड क्षमतेचे डेटा प्रोसिसंग प्लॅटफॉर्म उभे करण्यात ते आघाडीवर राहिले. त्याचा लाभ मोबाईल अप्लिकेशन डेव्हलपरना तसेच इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये (आय़ओटी) काम करणाऱ्या तंत्रज्ञांना झाला. आयओटी हा एआयचाच मावसभाऊ म्हणावा लागेल! सेन्सर, सॉफ्टवेअरच्या माध्यमांतून इलेक्ट्रिकल वस्तू इंटरनेटच्या माध्यमातून जोडल्या जातात, एकमेकांमध्ये संवाद साधतात, ते तंत्रज्ञान म्हणजेच आयओटी. नंतर पाटील यांनी ओरॅकलमध्ये क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर विभागात उपाध्यक्ष म्हणून काम केले. त्यानंतर ते स्ट्राईप या कंपनीत सीटीओ म्हणून गेले. फायनान्शिअल सेवा दणारी ही कंपनी आहे. तिथे विविध मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या पगारांचे व्यवस्थापन करण्याचे सॉफ्टवेअर हाताळले जाते. त्यांच्याच कार्यकाळात स्ट्राईप कंपनीने एक ट्रिलियन इतक्या प्रचंड प्रमाणातील पगारपत्रकांची हाताळणी करण्याचा विक्रम नोंदवला होता.

अशाप्रकारे सर्वच मोठ्या टेक जायंट कंपन्यांचा अनुभव घेऊन नंतर ते गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अँथ्रोपिकमध्ये दाखल झाले आणि आज त्यांचे नाव टेक कंपन्यांत भीतीयुक्त आदराने घेतले जात आहे. सहाच महिन्यांतील त्यांच्या कामाने जगाला हदारवले. टेक कंपन्यांच्या भविष्यावरही एआयची टांगती तलवार त्यातून उभी ठाकली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर-एज-अ-सर्विस म्हणजे आयएएएस, प्लॅटफॉर्म-एज-अ-सर्विस (पास) आणि सॉफ्टवेअर-एज-अ-सर्विस (सास) अशा तिन्ही प्रकारांवर विविध टेक कंपन्या अवलंबून असतात. कमी खर्चात मोठ्या पायभूत संगणकीय सेवाचा वापर त्यातून होतो. पास व सासमध्ये दुसऱ्यांनी उपलब्ध करून दिलेल्या सॉफ्टवेअर व प्लॅटफॉर्मचा वापर करून तिसऱ्या कंपनीची विविध कामे केली जातात. यातील सासमध्ये अँथ्रोपिकने आता उत्पात घडवला आहे. कारण आजवर कायदेशीर सल्ला व कागदपत्रांची पडताळणी, मोठ्या कंपन्यांची अकाऊंटिग यासारखी किचकट व सतत एकाच प्रकारचे (रिपिटेटीव्ह) कामे करणे यासाठी काही विशिष्ट सॉप्टवेअर संबंधित टेक कंपन्या वापरत असत. आता “क्लोड” या एआय एजंटच्या सहाय्याने टेक कंपन्यांच्या मध्यस्थीची गरजच भासणार नाही. क्लोड स्वतःच 11 क्षेत्रामधील कंपन्यांसाठी टेक मध्यस्थांची सारी कामे पार पाडू शकणार आहे. त्यामुळे एप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (एपीआय)च्या सहाय्याने मोठी संगणकीय कामे करण्यासाठी विविध सल्लागार कंपन्या नेमण्याचीही गरज उरणार नाही. एंटरप्रयाजेस सॉफ्टवेअर, लिगल टेक्नोलॉजी, आयटी सर्विसेस कंपन्यांचे अस्तित्त्वच कदाचित धोक्यात येऊ शकेल, असे मानले जाते आहे.

अँथ्रोपिकने क्लोडच्या माध्यमांतून इतकेच केले की, बड्या सॉफ्टवेअर कंपन्यांना स्वतःचे मॉडेल बांधण्यासाठी एपीआय पुरवण्याऐवजी थेट स्वतःच ती कामे उरकून टाकणारे 11 सूट्स बाजारात आणले. थोडक्यात क्लोडने आता मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांना त्यांची कामे करण्यासाठी मदतनीस पुरवणे थांबवले आणि ती सारी कामे स्वतःच करून देणारा एआय “कामगार” पुरवला. सध्या सॉफ्टवेअर कंपन्यांच्या माध्यमांतून विविध कॉर्पोरेट हजारो डॉलर्स पगारावर आयटी इंजिनिअर नेमत असतात. अथवा त्या कंपन्यांना दशलक्ष डॉलर्सची कंत्राटे देऊन सल्लागार नेमत असतात. त्या सर्व गरजा, एक क्लोडचा सूट विकत घेण्याने भागू शकतात! तेव्हढ्याच उपलब्ध हार्डवेअरमधून अधिक एआय कामगिरी वसूल करण्याचे तंत्रही पाटील यांच्या माध्यमांतून अँथ्रोपिकने वापरले आहे. हेही विशेष आहे. प्रत्यक्षात सॉफ्टवेअर कंपन्यांना कामे देणाऱ्या मूळ कंपन्यांनाच आता अँथ्रोपिकने क्लोड हा एआय एजंट ऑफर केल्यामुळे त्या कंपन्यांचे प्रचंड पैसे वाचणार आहेत. सहाजिकच सॉफ्टवेरमधील दादा कंपन्यांचे शेअर कोसळू लागले आहेत. यालाच वॉलस्ट्रीटने, “पाटील इफेक्ट” असे नामाभिधान बहाल केले आहे. स्वस्त इंटरफेसमुळे सॉफ्टवेअर कंपन्यांऐवजी स्वस्तातील पर्याय अँथ्रोपिकने उपलब्ध करून दिला आहे. अँथ्रोपिकने आता भारतात राहुल पाटील यांच्या मूळ गावात, बेंगळुरूत त्यांचे दुसरे जागतिक ऑफिस उघडण्याची तयारी सुरु केली आहे. अमेरिकेबाहेर त्यांचे एक ऑफिस टोकियोत आहे. बेंगळुरूतील प्रवेशामुळे भारतातील हजारो होतकरू तरुणांना नोकरीची संधी ते देणार आहेत. पण त्यांच्या क्लोड एआयमुळे अन्य सॉफ्टवेअर कंपन्यांतील काही हजार तरुणांच्या नोकऱ्या धोक्यात येतील का, हा एक चिंतेचाच विषय असणार आहे.

(लेखक अनिकेत जोशी ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

संधी येण्यात, घेण्यात व शोधण्यात अजितदादा ठरले कमनशिबी!

अजित अनंतराव पवारांइतका निर्भीड, स्पष्टवक्ता व कोणालाही अंगावर घेण्याची तयारी असणारा फायटर नेता, इतक्या भीषण पद्धतीने नाहिसा व्हावा हे दुर्दैवी तर आहेच, पण त्याहीपेक्षा धक्कादायक आहे. याच चार्टर विमान कंपनीच्या अशाच प्रकारच्या दुसऱ्या एका विमानाला मुंबई विमानतळावर अपघात...

मुस्लीम लीगच्या बनातवालांनाही शिवसेनेने केले होते जवळ!

नऊ वर्षांनंतर महामुंबईतील जनतेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत म्हणजेच मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, भिवंडी, नवी मुंबई व पनवेल अशा विविध महानगरपालिकांमध्ये मतदान करण्याची संधी लाभली. त्याचे सोने मतदारराजाने केले. असे निकाल दिले की, महामुंबईत वर्षानुवर्षे सत्तेत असणाऱ्या मातोश्रीला आस्मान...

महापालिका निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा वाजला बँड! मिळाली जेमतेम 6 टक्के मते!!

संपूर्ण राज्यात झालेल्या २९ महानगरपालिकांच्या मध्ये एकंदरित २८६९ जागा आहेत. त्यापैकी शिवसेना (उबाठा) म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या पक्षाला फक्त १५५ जागांवर विजय मिळाला आहे. मुंबईवर राज्य करण्याच्या टिमक्या वाजवणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेला अख्ख्या महाराष्ट्रात फक्त तेरा जागांपर्यंत पोहोचता आले. हे कशाचे...
Skip to content