भारतीय क्रिकेटमध्ये मानाची समजली जाणारी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा यंदा पहिल्यांदा जिंकून जम्मू काश्मिर क्रिकेट संघाने नवा इतिहास रचला. त्यांच्या या विजयात अंत्यंत मोलाची भूमिका बजावली ती जम्मू एक्स्प्रेस म्हणूनम ओळखला जाणारा त्यांचा तेज गोलंदाज, २९ वर्षीय नबी याने! त्याने या स्पर्धेत सर्वाधिक ६० बळी घेण्याचा पराक्रम केला. या स्पर्धेत एकाच मोसमात ६० किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेणारा नबी केवळ तिसरा गोलदाज आहे. याअगोदर ओदिशाच्या दौडा गणेशने १९९८-९९ साली ६२, तर बडोद्याच्या जयदेव उडानकटने २०१९-२०मध्ये ६७ बळी घेण्याचा विक्रम केला होता. भारतातील बहुतेक खेळपट्टया तेज गोलंदाजांची परिक्षा घेतात. तसेच वातावरणदेखील फारसे पोषक नसते. अशा कठीण परिस्थितीत नबीची कामगिरी निश्चित कौतुकास्पद आहे. त्याने जम्मू काश्मिर संघाचा वेगवान मारा समर्थपणे सांभाळला. बहुतेक सामन्यांत प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा नबीने घेतला. अचूक दिशा आणि टप्पा यावर त्याने सातत्याने सुरेख मारा केला. तसेच स्वींग चेंडूंचा खुबीने वापर केला. जेव्हा जेव्हा सामन्यात जम्मू काश्मिर संघाला “ब्रेक थ्रू” हवा होता तेव्हा त्याने तो मिळवून दिला. नबीला डावखुरा वेगवान गोलंदाज सुनील कुमार आणि मध्यमगती गोलंदाज युद्धवीर सिंह यांची छान साथ मिळाली. या दोघांनी अनुक्रमे ३१, २६ बळी घेऊन नबीचा भार थोडाफार हलका करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच तब्बल ६६ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर रणजी करंडकावर जम्मू काश्मिर संघाला आपले नाव कोरता आले. ही स्पर्धा जिंकणारा जम्मू काश्मिर संघ १८वा संघ ठरला. याअगोदर रणजी स्पर्धेत जम्मू काश्मिर संघाची गाडी उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे गेली नव्हती. गतवर्षी त्यांना केरळकडून अवघ्या एका धावेने हार खावी लागली होती. तो पराभव जम्मू काश्मिर संघातील खेळाडूंच्या बहुधा चांगलाच जिव्हारी लागला. त्यामुळे नव्या मोसमात यंदा स्पर्धा जिंकायच्या इराद्यानेच जम्मू काश्मिर संघ मैदानात उतरला. गतवर्षी ४४ बळी घेण्याऱ्या नबीने सलग दुसऱ्या वर्षी आपले गोलंदाजीतील सातत्य कायम राखले.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून नबीने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. त्याचा जन्म उत्तर काश्मिरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील शिरी गावचा. गावात या खेळासाठी फारशा सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. त्याला सरावासाठी रोज तीस, चाळीस किलोमीटर दूर श्रीनगरला जावे लागत असे. पण चांगले क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या नबीने त्याही परिस्थितीत हार मानली नाही. त्याने या खेळाचा श्रीगणेशा सुरूवातीला घराजवळ असलेल्या बारामुला क्रिकेट क्लबमधून केला. त्याची उंची चांगली होती. त्यामुळे वेगवान गोलंदाज होण्याचे स्वप्न त्याने बाळगले. त्याच्या वडिलांना क्रिकेटची आवड होती. नबी अभ्यासातपण चांगला हुशार होता. बऱ्याचवेळा त्याचा पहिल्या पाचात नंबर असायचा. जम्मू काश्मिरमधील वातावरण या खेळाला फारसे पोषक नव्हते. त्यामुळे सुरूवातीला नबीच्या वडिलांचा त्याचा खेळण्यास विरोध होता. त्याने डॉक्टर व्हावे असे त्यांना वाटायचे. त्यांना तीन मुले. तिघांनी मेडिकलमध्ये करियर करावे असे त्यांचे स्वप्न होते. पण नबीची जम्मू काश्मिर क्रिकेट संघटनेच्या १९ वर्षांखालील निवड चाचणीमध्ये निवड झाली आणि वडिलांनी मग नबीला रोखले नाही. नबीला निवडीसाठी मात्र तीन वर्षं वाट पाहावी लागली. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असूनदेखील वडिलांनी नबीला लागेल ती मदत करून त्याचा आत्मविश्वास उंचावला. त्याला सतत प्रोत्साहन दिले.

स्थानिक स्पर्धांत शानदार कामगिरी करुन नबीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. २०१८मध्ये त्याने विजय हजारे करंडक स्पर्धेत पर्दापण केले. पुढच्या वर्षी २०१९-२०मध्ये तो पहिली मुश्ताक अली स्पर्धा खेळला. २०२० साली नबीने रणजी स्पर्धेत पर्दापण केले. त्यानंतर त्याने मागे वळून बघितलं नाही. ओदिशाविरुद्ध सामन्यात त्याने पहिल्यांदा ५ बळी घेऊन आपली चमक दाखवली. हजारे स्पर्धेत त्याने आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना नाबाद ११८ धावांची शतकी खेळी करुन आपण चांगली फलंदाजीदेखील करु शकतो हे दाखवून दिले होते. दुलीप करंडक स्पर्धेत उत्तर विभागातर्फे खेळताना नबीने पूर्व विभागाविरुद्ध ४ चेंडूत ४ बळी घेऊन आगळा विक्रम नोंदवला. पण तरीदेखील भारतीय “अ” संघात त्याची निवड झाली नाही. तसेच आयपीएल स्पर्धेसाठी कुठल्या संघाने नबीचा विचार केला नाही. फक्त हैद्राबाद, बेंगळुरू संघाने त्याला “नेट बॉलर” म्हणून संधी दिली. २०२२-२३मध्ये पी. कृष्णकुमार यांची जम्मू काश्मिर संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली. त्यांनी नबीच्या गोलंदाजीत बराच बदल केला. त्यांचा परीसस्पर्श नबीला लाभला आणि त्याच्या गोलंदाजीत कमालीचा बदल जाणवला. नबीने जणूकाही कात टाकली आणि पाहतापाहता नव्या नबीचा उदय झाला. यंदा रणजी स्पर्धेत तो सर्वोतम खेळाडूचा मानकरी ठरला. तीन सामन्यातदेखील त्याला सर्वोतम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. यंदा त्याने जम्मू काश्मिर संघासाठी नवनवे विक्रम केले. यंदा आयपीएल स्पर्धेत त्याला करारबद्ध करण्यासाठी दिल्ली, हैद्राबाद, बेंगळुरू या तीन संघात चुरस होती. त्याची “बेस प्राईस” फक्त ३० लाख रुपये ठेवण्यात आली होती. शेवटी दिल्ली संघाने त्याला ८ कोटी ४० लाख रुपये मोजून आपल्या संघात घेतले. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन हे त्याचे दैवत. फुटबॉल, बॅडमिंटन खेळाचा नबी चाहता आहे. तो शांत असला तरी त्याचा तेजतर्रार मारा सध्या फलंदाजांची झोप उडवतोय. आता सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत त्याने हाच जोम,जोश कायम ठेवला तर जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात नबीची निवड होऊ शकते. भविष्यात नबीचा आलेख असाच उंचावत राहिल अशी अपेक्षा!
(लेखक सुहास जोशी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

