बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एफ उत्तर विभागाच्या वतीने नानालाल डी. मेहता पुलाखालच्या मोकळ्या जागेत नि:शुल्क ‘मुक्त ग्रंथालय’ (Open Library) सुरू करण्यात आले आहे. या सुविधेअंतर्गत नागरिक तसेच विद्यार्थ्यांना याठिकाणी वाचनासाठी नि:शुल्क पुस्तके उपलब्ध असतील. सहायक आयुक्त (एफ उत्तर विभाग) डॉ. पृथ्वीराज चौहान यांच्या हस्ते या ग्रंथालयाचे काल उद्घाटन करण्यात आले. यावेळी गबुला फाऊंडेशन, इनरव्हील संस्था यांचे प्रतिनिधी, नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. एखाद्या पुलाखालील जागेवर तयार करण्यात आलेले हे मुंबईतील पहिले उद्यान आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने एफ उत्तर विभागाच्या वतीने २०१६मध्ये नानालाल डी. मेहता उद्यान नर्मदा परिक्रमेच्या धर्तीवर विकसित करण्यात आले आहे. एखाद्या पुलाखालील जागेवर तयार करण्यात आलेले हे मुंबईतील पहिले उद्यान आहे. सुमारे ६ हजार ३४ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या उद्यानामध्ये नागरिकांसाठी ९०० मीटर लांबीचा पदपथ, योगाभ्यास आणि बसण्यासाठी विशिष्ट आसनव्यवस्था तसेच
आसपास शोभिवंत झाडे लावण्यात आलेली आहे. यासोबतच आता या ठिकाणी नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क ‘मुक्त ग्रंथालय’ सुरू करण्यात आले आहे. या ग्रंथालयामध्ये विविध साहित्यविषयक पुस्तके, महापुरुषांची आत्मचरित्रे, सामान्य ज्ञान, खेळ आदी विषयांवर आधारित पुस्तके ठेवण्यात आली आहेत. सद्यस्थितीत या ठिकाणी एकूण १३२ पुस्तके वाचनासाठी उपलब्ध आहेत. नागरिक ही पुस्तके कपाटातून घेऊन तिथेच बसून वाचू शकतात. हे ग्रंथालय सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
विरंगुळा आणि करमणुकीसोबतच ज्ञानार्जन आणि वाचनाची सवय वृद्धींगत होण्याच्या अनुषंगाने नानालाल डी. मेहता उद्यानात हे ग्रंथालय सुरू करण्याचे आले आहे. नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहान यांनी केले आहे.