Sunday, September 8, 2024
Homeकल्चर +आजपासून 18व्या मुंबई...

आजपासून 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरूवात

लघुपट, माहितीपट आणि ॲनिमेशन चित्रपटांची पर्वणी असलेला 18वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ) भव्य उद्घाटन सोहळ्यासाठी सज्ज झाला आहे. प्रेक्षक आणि चित्रपट उद्योग व्यावसायिकांना मोहिनी घालणारा हा महोत्सव आजपासून सुरू होत आहे.

प्रेक्षकांना समृद्ध अनुभवाची झलक सादर करताना आणि महोत्सवातील चित्रपटांच्या खजिन्याचे अनावरण करताना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू म्हणाले की, अशा महोत्सवांचे आयोजन करण्याचा संपूर्ण उद्देश केवळ सिनेमाला प्रोत्साहन देणे नसून, स्थानिक आणि सामाजिक-आर्थिक समस्यांवर चिंतन करणे आणि धोरण निर्मात्यांना उपायांसाठी मार्गदर्शन करणे हा आहे. ते काल मुंबईत 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पूर्वावलोकनासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

डॉक्युमेंटरी अर्थात माहितीपट आणि लघुपट यांच्या वाढत्या बाजारपेठेकडे लक्ष वेधत जाजू म्हणाले की, जागतिक माहितीपट आणि टीव्ही शो बाजारपेठ 2028पर्यंत 16 अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज असून या माध्यमाची माहिती, प्रेरणा आणि मनोरंजन करण्याची ताकद यातून दिसून येते. माहितीपटांव्यतिरिक्त आमच्याकडे खूप गाजणारे आणि गतिमान असे व्हीएफएक्सचे क्षेत्र आहे ज्यामध्ये ॲनिमेशन विभागाचाही समावेश होतो. हा एक मोठा उद्योग आहे ज्यामध्ये आपल्या देशात प्रचंड आर्थिक आणि रोजगार देण्याची क्षमता आहे. हे विभाग यावर्षी मिफ्फचा भाग आहेत.

ॲनिमेशन आणि व्हीएफएक्स उद्योगात आपल्या देशाने केलेल्या प्रगतीवर प्रकाश टाकताना ते म्हणाले की, छोटा भीम आणि चाचा चौधरी यासारखी भारतीय व्हीएफएक्स पात्रे जगप्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी हे सिद्ध केले आहे की भारतीय कथांमध्ये सार्वत्रिकपणे प्रतिध्वनी करण्याची ताकद आहे. ॲनिमेशन क्षेत्रात सर्वदूर व्याप्ती असलेली बौद्धिक संपदा आपल्या देशातच निर्माण करणे हा व्यापक उद्देश आहे. आपल्या अनेक निर्मात्यांसाठी जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या कल्पना मांडण्याची ही एक संधी आहे.

पुढील आठवड्यात मिफ्फमध्ये 59 देशांतील 61 भाषांमधील 314 चित्रपट, 8 जागतिक प्रीमियर, 5 आंतरराष्ट्रीय प्रीमियर, 18 आशिया प्रीमियर आणि 21 भारतीय प्रीमियर होणार आहेत. 60 देश त्यांच्या चित्रपट आणि इतर प्रकारच्या कार्यक्रमांतून या महोत्सवात सहभागी होत आहेत. श्रीलंका सरकार उद्घाटन समारंभात त्यांचा सांस्कृतिक वारसा समोर आणणारी कामगिरी सादर करत आहे तर अर्जेंटिना सरकार समारोप समारंभात त्यांच्या देशाच्या कलागुणांचे प्रदर्शन करेल. मिफ्फ फक्त भारतापुरता नसून हा महोत्सव जगाबद्दल आहे. हा महोत्सव जगभरातील चित्रपट निर्मात्यांना संधी देतो, असे त्यांनी सांगितले.

मिफ्फ महोत्सवातील काही अभिनव उपक्रमांची माहिती देताना संजय जाजू म्हणाले की, यंदाचा महोत्सव पहिलावहिला डॉक फिल्म बझार सादर करत आहे, जी माहितीपट, ॲनिमेशन आणि लघुपटांसाठी समर्पित बाजारपेठ असेल. यामुळे या प्रभावी माध्यमांमधील समन्वय आणि विकासाला चालना मिळेल. यंदा प्रथमच, मिफ्फ महोत्सवाने डॅनिएला वोल्कर दिग्दर्शित “द कमांडंट्स शॅडो” या मिडफेस्ट चित्रपटाची निवड केली आहे, ज्याने महोत्सवामधील प्रदर्शनाला नवा आयाम मिळणार असून सर्वसमावेशकतेला चालना मिळेल. स्वयम (SVAYAM) या स्वयंसेवी संस्थेच्या भागिदारीने मिफ्फ महोत्सवाची सर्व आयोजनस्थळे प्रत्येकासाठी सहज प्रवेश करता येण्याजोगी बनवली जातील.

यंदा प्रथमच मिफ्फ महोत्सवातील स्क्रीनिंग (चित्रपट प्रदर्शन) आणि रेड-कार्पेट सोहळा मुंबई, कोलकाता, चेन्नई, पुणे आणि दिल्ली या पाच शहरांमध्ये एकाच वेळी आयोजित केला जाईल. त्यामुळे संपूर्ण भारतातील सिनेरसिकांना एकाच वेळी जागतिक दर्जाच्या सिनेमाची जादू अनुभवता येईल. जगभरातील सृजनशील चित्रपट निर्मात्यांच्या प्रतिभेचे प्रदर्शन करणे आणि माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन चित्रपटांच्या व्यापक प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचणे, हे या विस्ताराचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.

भविष्यातील चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षी, FTII, SRFTI आणि IIMC यासारख्या प्रमुख चित्रपट प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी प्रवास आणि आदरातिथ्य सेवा प्रायोजित करून महोत्सवाने एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकले असून यामधून त्यांना या महोत्सवात सहभागी होण्याची, या क्षेत्रातील तज्ञांकडून मार्गदर्शन मिळवण्याची आणि आपले नेटवर्क वाढवण्याची संधी मिळेल. उद्‌घाटन समारंभात FTIIच्या विद्यार्थ्यांचा लघुपट “सनफ्लॉवर्स वॉज फर्स्ट वन टू नो” प्रदर्शित केला जाईल. या लघुपटाला यावर्षीच्या 77व्या कान चित्रपट महोत्सवात गौरवण्यात आले होते, अशी माहितीही त्यांनी दिली.

Continue reading

श्री गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिका सज्ज

मुंबईतील श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून यंदाही विविध सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत. या उत्सवाकरीता मुंबई महापालिकेचे सुमारे १२ हजार कर्मचारी, ७१ नियंत्रण कक्ष तसेच अन्य विविध सोयीसुविधांसह सुसज्ज आहेत. यंदा गणेश मूर्ती विसर्जनासाठी ६९ नैसर्गिक स्थळांसह एकूण २०४ कृत्रिम...

१७५३ शेतकऱ्यांना दिवसा होणार वीजपुरवठा उपलब्ध

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यात ९२०० मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून त्यापैकी ३ मेगावॅट क्षमतेचा पहिला सौरऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे नुकताच...

श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याची पारंपरिक पद्धत

श्री गणेशमूर्तीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. विसर्जनाला जाताना श्री गणेशमूर्तीबरोबर दही, पोहे, नारळ, मोदक वगैरे शिदोरी द्यावी. जलाशयाजवळ पुन्हा आरती करावी व मूर्ती शिदोरीसह पाण्यात सोडून द्यावी. उपासनाविधींमुळे गणपतीच्या पवित्रकांनी समृद्ध झालेल्या मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे जलस्रोत पवित्र बनतो. तसेच...
error: Content is protected !!
Skip to content