मुंबईतल्या दादर येथील छबिलदास प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांनी बनविलेल्या टिचिंग एड्स या साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन साहित्यिका अंजना कर्णिक यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
४ते ९ वर्षे वयाच्या मुलांनी पालकांच्या मार्गदर्शनाखाली तयार करून आणलेली, टाकाऊ वस्तूंपासून बनवलेली शैक्षणिक साधने स्पर्धेसाठी मांडण्यात आली होती. त्या चिमुरड्या मुलांनी भेट देणाऱ्या प्रत्येक मान्यवरांना आत्मविश्वासाने आपल्या प्रकल्पाची माहिती दिली. सौर ऊर्जा, सौर वीज, जल ऊर्जा, मुलगी वाचवा मुलगी शिकवा, ग्राम स्वच्छता अभियान, पावसाच चक्र, जल शुद्धीकरण, प्रदूषण नियंत्रणाचे दैनंदिन जगण्यातील मार्ग, सुनियोजित शहरं, आदर्श इस्पितळ, चांद्रयान आणि त्याचे कार्य, सूर्यमाला, बगीचा संवर्धन, स्वप्नातील गाव, धरणं, कालवे आणि खेडी असे अनेक प्रकल्प या शैक्षणिक साधननिर्मिती स्पर्धेत मांडले होते.
मुख्याध्यापिका रॉड्रिक्स यांनी शिक्षकांच्या सहकार्याने सर्व कार्यक्रमाचं उत्तम नियोजन केलं होते. शालेय समिती अध्यक्ष पार्सेकर यांनी जुन्या आठवणी यावेळी संगितल्या. शिक्षण महर्षी म. गो. अक्षीकरांनी स्थापन केलेल्या याच छबिलदास प्रायमरी शाळेत अनेक नामवंत विद्यार्थी शिकले आहेत.