महाराष्ट्राची संपन्न रंगभूमी नि तिचा वारसा पाहिला की एकापेक्षा एक गुणी कलाकारांची रत्नेच दिसतात. अनेकांनी आपल्या अभिनयाची छाप सोडून रसिकांना भरभरून देण्यातच धन्यता मानली. अशांपैकी एक नाव म्हणजे चंद्रकांत रघुनाथ गोखले! त्यांनी अभिनय वारसा जोपासताना त्याकडे केवळ उत्पन्न नि व्यवसाय साधन न पाहता त्याचा आनंद घेतला नि लोकांना दिला. अशा अनेक कलाकारांच्या यादीत त्यांचे नाव आपसूकच नोंदले गेले.
आपल्या मातुल घराण्याचा वारसा त्यांनी जोपासलाच, पण तो पुढच्याही पिढीत उतरवला. विख्यात अभिनेते विक्रम गोखले हे त्यांचे सुपुत्र होत! चंद्रकांत गोखले यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांची आजी दुर्गाबाई नि आई कमलाबाई यांच्याकडून अभिनय शिक्षण, बाळकडू घेत त्यांनी आपलं जीवन साकारलं. ज्या काळात स्त्री भूमिका पुरुष करत त्यावेळेस प्रथम महिला बाल कलाकार म्हणून त्यांच्या आजी दुर्गाबाई कामत यांची ओळख निर्माण झाली.
एखाद्या नाट्य चित्रपटात स्त्रीनं किंवा महिला कलाकाराने काम करणं हे प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध केलेलं बंडच! त्यांच्या सान्निध्यात वाढलेल्या चंद्रकांत या अपत्याविषयी नि जडणघडणीविषयी अधिक काही सांगायला नकोच! ७ जानेवारी १९२१ रोजी चंद्रकांत गोखले यांचा जन्म मिरज इथे झाला. धाडस म्हणजे काय हे कमलाबाईंनी दाखवून दिलं. पती निधनानंतर अभिनयाशिवाय उत्पन्नाचे कोणतंही साधन नसताना मुलांसह विविध नाटक कंपन्यांमधून भूमिका साकारत त्यांनी संसार चालवला.
आर्थिक स्थिती जेमतेम असल्याने शालेय शिक्षणापासून वंचित राहिलेल्या चंद्रकांतरावांना त्यांनी घरीच लिहायला, वाचायला शिकवलं. त्यामुळे निपुण झालेल्या नि शाळेचे तोंडही न पाहिलेल्या या मुलाने पुढे मिरज येथील ब्राह्मणपुरीतील प्राथमिक शाळा क्र. एकचे मुख्याध्यापकपदही भूषवले. याच मिरजेत त्यांचा जन्म झाला होता हे विशेष! आईच्या नि पत्नी हेमा यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 फेब्रुवारीस काही रक्कम दान देण्याचा प्रघात त्यांनी सुरू केला.
वयाच्या सातव्या वर्षी नाटकात काम मिळवणाऱ्या गोखले यांचे नवव्या वर्षी नाटक होते ‘पुन्हा हिंदू’. यातील मोठी भूमिका नि पुढे मा. दीनानाथ, या लता मंगेशकर यांच्या पिताजींच्या सहवासात ते आले. तिथे त्यांच्या गुणांना अधिक चालना मिळाली. १९३७-३८च्या या कालखंडात त्यांना खुद्द दrनानाथांकडून एक-दोन नव्हे तर तब्बल ७०-८० बंदिशी शिकायला मिळाल्या. पित्यासमान असलेल्या त्यांच्या मार्गदर्शनातच त्यांनी त्यावेळच्या काही संगीत नाटकांमधून भूमिका केल्या. त्या बऱ्याच गाजल्याही.
सुरुवातीच्या काळात बेबंदशाही, पद्मिनी अशा नाटकातून त्यांनी स्त्री पात्रही रंगवली. याच काळात ‘लक्ष्मीचे खेळ’ चित्रपटात त्यांनी पहिली भूमिका साकारली. पुढे बॅरिस्टर हे त्यांचे आवडते नाटक. त्यांचे सुपुत्र विक्रम गोखले आपल्या अभिनयाला पूरक मार्गदर्शन मिळावे यासाठी स्वतःच्या प्रत्येक नाटक, चित्रपटाचे कथानक वडिलांना दाखवत असत. या ‘बॅरिस्टर’चे कथानकही त्यांनी वाचण्यास दिले असता कोणाहीकडे भूमिकेची मागणी न करणाऱ्या चंद्रकांत गोखले यांना ‘तात्या’च्या भूमिकेने भूल घातली. बेडर, लंपट, दारुड्या, खेडवळ जो आपल्या विधवा सुनेकडेही वासनेने पाहतो असे खलनायकी पात्र रंगवण्याची इच्छा त्यांनी प्रदर्शित केली. ‘पुरुष’ या नाटकातही नाना पाटेकर, रीमा लागू यांच्याबरोबर जोरकस भूमिका करून त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला. सहज अभिनय, एखाद्या व्यक्तिरेखेत झोकून देणे, कामाप्रती निष्ठा या जोरावर मराठी, हिंदी दूरदर्शन मालिकांमधून त्यांनी काम केले.
सामाजिक कार्यातही जिव्हाळा
त्यांना सैन्य दलापोटी निखळ प्रेम! आपले जवान देशासाठी प्राण तळहातावर घेऊन असतात, तर त्यांच्यासाठी काही करावे याची तळमळ त्यांना होती. कारगिल युद्धानंतर त्यांनी पन्नास हजारांचा धनादेश दिला तर पुढे आर्मी सेंट्रल वेल्फेअर फंड आणि सदर्न कमांड यांना तेव्हढीच रक्कम देणगी म्हणून दिली. क्विन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूट फॉर डिसेबल्ड सोल्जर्स या अपंगत्व आलेल्या सैनिकांसाठी काम करणाऱ्या संस्थेस मुदतठेवीच्या व्याजापोटी येणारी रक्कम दिली.
अनेक नाटकं गाजवली
भूमिका अजरामर केल्या. नाटकांचा विचार केला तर यात जुन्या काळातील गाजलेल्या पुण्यप्रभाव, भावबंधन, राजसंन्यास, विद्याहरण, बेबंदशाही, झुंझारराव यांचा समावेश आहे. नटसम्राट या रंगभूमीवर महत्त्वाचा टप्पा असलेल्या नाटकात त्यांनी भूमिका साकारलीच, शिवाय बॅरिस्टर, पुरुष, पर्याय, एक होता म्हातारा, यातूनही वेगवेगळया भूमिका साकारल्या. चित्रपटांचा विचार करता जावई माझा भला, धर्मकन्या, धाकटी जाऊ, मानिनी, रेशमाच्या गाठी, महाराणी येसूबाई, जिवाचा सखा, स्वप्न तेच लोचनी, माझं घर माझी माणसं, सुवासिनी आदी प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटातूनही त्यांचा अभिनय दिसून आला. काही हिंदी चित्रपटही त्यांनी केले.
गीत रामायणमध्ये गायनही केले
गदिमांनी लिहिलेल्या आणि सुधीर फडके यांच्या संगीताने संपूर्ण सांस्कृतिक क्षेत्रावर अमिट छाप सोडणाऱ्या ‘गीत रामायण’ या गीत काव्यातील दहाव्या गीताचे (चला राघवा चला) गायन चंद्रकांत गोखले यांनी केले होते. याचं कारण म्हणजे त्यांनी ख्याल गायकीचेही शिक्षण घेतलं होत. त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. यात चिंतामणराव कोल्हटकर स्मृती पुरस्कार, मा. दीनानाथ स्मृती पुरस्कार, नाट्य परिषद जीवन गौरव, नटश्रेष्ठ नानासाहेब फाटक पुरस्कार, पुणे महापालिका बालगंधर्व पुरस्कार, विष्णुदास भावे गौरवपदक, व्ही. शांताराम पुरस्कार, छत्रपती शाहू पुरस्कार, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान पुरस्कार यांचा अंतर्भाव आहे.
त्यांच्या अखेरच्या काळात कर्करोगाने त्यांना गाठले होते. २० जून २००८ रोजी वयाच्या ८७व्या वर्षी पुण्यातील जोशी रुग्णालयात सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. जवळपास सत्तर वर्षे नाट्य, चित्रपट सृष्टीची सेवा करीत विविधांगी भूमिका त्यांनी गाजवून आपली छाप या क्षेत्रावर सोडली. त्यांच्या मृत्यूपश्चात अपंग सैनिकांना साहाय्य करण्याचा उपक्रम आजही चालू आहे. अशा या थोर कलाकाराच्या स्मृत्यर्थ त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात शासनाने पुढाकार घेऊन एखादा उपक्रम सुरू करावा अशी अपेक्षा!