Saturday, July 13, 2024
Homeमाय व्हॉईसबाहेर आरडणे वेगळे...

बाहेर आरडणे वेगळे आणि घटनात्मक पद सांभाळणे वेगळे!

लोकसभेतल्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी नुकताच संपन्न झाला. या शपथविधीत शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य रवींद्र वायकर यांनी खासदारकीची शपथ घेतली. वायकर पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून गेले, तेही फक्त 48 मतांनी! त्यानंतर जे काही रामायण महाराष्ट्रातल्या जनतेने काही ठराविक वृत्तवाहिन्यांवर पाहिले, अनुभवले ते वेगळे.. आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळी होती हे आम्ही आमच्या ‘किरण हेगडे लाईव्ह’वर दाखवून दिलेच आहे. बाहेर आरडणे वेगळे आणि प्रत्यक्षात असणे वेगळे…

असो. मला त्याच्या खोलात जायचं नाही. परंतु या शपथविधीच्या कार्यक्रमात हिंगोलीचे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार नागेश आष्टीकर यांनी घेतलेली शपथही लक्षवेधीच होती. त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि आपले पिताश्री बापूराव पाटील यांना स्मरून खासदारकीची शपथ घेतली. मात्र, त्याला हंगामी सभापती र्भृतहरी माहताब यांनी आक्षेप घेतला. तो आक्षेप घेण्यामागचे प्रमुख सूत्रधार होते ते आताचे लोकसभेतले विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रमुखांचे आणि त्यांच्या दुसऱ्या स्थानावरील नेत्यांच्या गळ्यातले ताईत राहुल गांधी. आष्टीकर यांच्या शपथेला सर्वात आधी आक्षेप घेतला तो काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी. राहुल गांधींनी हा विषय उचलला आणि सांगितलं की हे घटनाबाह्य आहे. जेव्हा विरोधकांपैकीच विरोधी पक्षनेतेच आपल्या एका सहकारी पक्षाच्या खासदाराच्या शपथविधीवर आक्षेप घेत असतील तर सत्ताधारी गप्प बसतील अशी अपेक्षा करणे चुकीचेच आहे. आणि तेच झाले. राहुल गांधीच्या आक्षेपाला सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांनी साथ दिली. परिणामी हंगामी अध्यक्ष माहताब यांनी आष्टीकर यांना पुन्हा शपथ घेण्याचे निर्देश दिले आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा शपथही घेतली.

बोंबलणे

असं सारे रामायण घडले असतानाही आपण त्या गावचेच नाही अशाच थाटात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्याबद्दल मनमुराद आनंद व्यक्त केला. राहुल गांधी हे पुन्हा लोकसभेत दिसणार आहेत आणि ज्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी हेटाळणी करत होते आज त्यांना सलाम करत मोदी आणि शाह यांना सभागृहात यावे लागणार आहे, अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले. इतके कौतुक करताना संजय राऊत हे विसरले की याच राहुल गांधींनी त्यांचे खासदार आष्टीकर यांनी शपथविधीला बाळासाहेबांचे नाव घेतल्यानंतर विरोध केला आणि पुन्हा शपथ घेण्यास भाग पाडले. याचा अर्थ इतकाच की बाहेरून कीर्तन आणि आतून तमाशा…

आज विरोधी पक्षांच्या गोटात जे चालले आहे ते हेच. सत्ताधारी भाजपाप्रणित एनडीएने लोकसभेसाठी ओम बिर्ला यांची उमेदवारी घोषित केली. ओम बिर्ला हे भाजपाचे खासदार. मागच्या वेळी ते लोकसभेचे सभापती होते. यावेळी ते पुन्हा उभे राहिले. त्यांच्या विरोधात काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीने के. सुरेश यांची उमेदवारी दिली. परंतु के. सुरेश यांच्या समर्थनार्थ मतविभाजनाची मागणीच विरोधकांपैकी कोणी केली नाही. परिणामी आवाजी मतदानाने ओम बिर्ला या निवडणुकीत विजयी झाले आणि सभापतीही.. विरोधी पक्षनेते राहुल गांधी त्यावेळी सभागृहात उपस्थित होते. परंतु त्यांनी किंवा त्यांच्या पक्षाच्या कोणीही मतविभाजनाचा आग्रह धरला नाही किंवा साधी मागणीसुद्धा केली नाही. याचे कारण एकच होते मतविभाजनाची मागणी केली तर फसणार हे विरोधकांना चांगलेच ठाऊक होते. सत्ताधारी एनडीएकडे आज 302 सदस्यांचं पाठबळ आहे. अशा स्थितीत हात दाखवून अवलक्षण का करा, म्हणून विरोधकांनी आवाजी मतदानाला मान्यता दिली व आपली एकी मजबूत असल्याचा आभास कायम टिकवण्यात आजतरी यश मिळवले.

बोंबलणे

लोकसभेचे अधिवेशन आणखी आठवडाभर चालणार आहे. यामध्ये सरकार नव्याने पारित केलेल्या गुन्हेविषयक तीन नव्या कायद्यांच्या अंमलबजावणीचा विषय लोकसभेत मांडणार आहे. ज्यावेळी विरोधक दुबळे आहेत म्हणून सत्ताधाऱ्यांनी हे कायदे रेटून पारित केले असे जे बोंबलत होते तेच विरोधी पक्षातले सदस्य यावेळी आपली एकजूट दाखवतात की नाही आणि याची या कायद्यांची अंमलबजावणी रोखून धरतात की नाही हे लवकरच आपल्याला समजून येईल.

आता राहता राहिला तो विषय राहुल गांधींचा. आता ते विरोधी पक्षनेते झाले आहेत. यापूर्वी दहा वर्षे काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याइतकी सदस्यसंख्या नव्हती. पण त्यानंतर राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो आणि भारत जोडे नेक्स्ट.. या दोन पदयात्रांमुळे काँग्रेसला कमीतकमी विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची परिस्थिती निर्माण झाली. आता पक्षाने त्यांची नेमणूक विरोधी पक्षनेतेपदी केली आहे. वरचेवर पांढरा टी-शर्ट परिधान करून आपल्याला युवा नेता म्हणून प्रेझेंट करण्याच्या प्रयत्नात असलेले राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्यानंतर सफेद कुर्त्यात सभागृहात दिसले. सांगायचे काय की जेव्हा घटनात्मक जबाबदारी आपल्या शिरावर येते त्यावेळेला तसाच पेहराव करावा लागतो याचे भान राहुल गांधींनी पाळले. शहाण्या मुलासारखे वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिठी न मारता फक्त शेकहँड करत त्यांनी आपली घटनात्मक जबाबदारी स्वीकारली.

अशीच पंचाईत पूर्वीच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची झाली होती. ‘मातोश्री’वर बसून ऑर्डरी सोडणं जितकं सोपं होतं तितकंच कठीण जेव्हा मुख्यमंत्री म्हणून एखाद्या कागदावर सही करणे होतं हे त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या अधिकारपदाची शपथ घेतल्यानंतर जाणवले. तेव्हाच्या एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री न बनवण्याचा डाव ओळखण्यात अपयशी ठरलेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यामुळेच आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात कोरोनाचे निमित्त घेऊन अडीच वर्षांत फक्त अडीच तास मंत्रालयात आपल्या खुर्चीवर ते बसले. अमर्याद सत्ता उपभोगणे आणि त्यावर काम करणे आणि घटनात्मक पद स्वीकारणे आणि त्यावर काम करणे यात जमीन-अस्मानाचे अंतर असते याचा अनुभव उद्धव ठाकरेंनी घेतला. आता राहुल गांधी घेतील. तूर्त इतकेच!

Continue reading

कोणाचेही पितर उतरले तरी मुंबई तुंबणारच!

काल पुन्हा मुंबई तुंबली. या मोसमातला हा पहिला मुसळधार पाऊस मुंबईकरांना त्यांच्या दरवर्षी होणाऱ्या यातनांची आठवण देऊन गेला. आजही पाऊस बरसतोच आहे. पण कालच्या तुलनेत कमी. त्यामुळे कालच्याइतका त्रास आज मुंबईकरांना सोसावा लागणार नाही. आज सरकारी यंत्रणाही अलर्ट मोडवर आहेत....

विधान परिषदेतल्या दोघा आमदारांचे भवितव्य आज निश्चित?

महाराष्ट्र विधान परिषदेचे १५ सदस्य याच महिन्यात निवृत्त होत असून यातल्या तीन सदस्यांचा सभागृहातला प्रवेश निश्चित झाला असून दोघांचे भवितव्य आज निश्चित होण्याची शक्यता आहे. निवृत्त होणारे दोन आमदार, काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील पुन्हा...

वायकरांची शपथ आणि सारेकाही चिडीचूप..

उत्तर पश्चिम मुंबईच्या निवडणूक अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी फोन केल्यानंतर त्यांनी वायकरांना विजयी जाहीर केले. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी सर्वात भ्रष्ट अधिकारी आहेत. वायकरांच्या मेव्हण्याने निवडणूक कर्मचाऱ्याच्या फोनच्या मदतीने ईव्हीएम मशीन हॅक केले. आम्ही वायकरांना लोकसभेत सदस्यत्वाची शपथ घेऊ...
error: Content is protected !!