Homeचिट चॅट४० बेवारस मृतदेहांचे...

४० बेवारस मृतदेहांचे ‘वारसदार’ नारायण पारदळे सन्मानित

मुंबईतल्या बोरीवली पश्चिम येथील रेल्वेस्थानकाजवळ गेल्या अनेक वर्षांपासून नारायण पांडुरंग पारदळे वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. या अनेक वर्षांच्या काळात त्यांनी रेल्वे अपघातातील सुमारे चाळीसहून अधिक बेवारस मृतांच्या पार्थिवावर स्वतः पदरमोड करून अंत्यसंस्कार केले. रेल्वे फलाटावर अनाथ म्हणून वावरणाऱ्यांना सामाजिक व मानवतावादी दृष्टिकोनातून सहकार्य करणाऱ्या पारदळे यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.

नारायणरावांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांच्या अकाली निधनानंतर खचून न जाता मुलगा आणि मुलींचा त्यांनी सांभाळ केला. स्वतःच्या प्रकृतीची तमा बाळगली नाही. आर्थिक विवंचनेत असूनही स्वत:ची सामाजिक बांधिलकी कायम ठेवून वयाच्या ७२व्या वर्षीसुद्धा ते कार्यरत आहेत. अशा या नारायण पारदळे यांचा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि वि. स. पागे अध्यासन केंद्राचे संचालक निलेश मदाने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कवितांगण परिवाराचे प्रमुख, ज्येष्ठ पत्रकार पंकज दळवी, ईशान संगमनेरकर, संदीप बाक्रे आणि प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष नितीन शिंदे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला नारायण पारदळे यांची कन्या स्मिता पारदळे जंगम, जावई विजय जंगम आवर्जून उपस्थित होते.

नारायणराव, आपण बोरीवली रेल्वेमार्ग अपघातात मृत आणि जखमींसाठी देवदूत म्हणून सदैव निःस्वार्थ भावनेने उभे असता. आपण वर्तमानपत्र विक्रीचा व्यवसाय करुन या वयातही कुटुंबाची जबाबदारी पार पाडता. स्वतःची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही पदरमोड करून मृत जखमींसाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत करीत असता. दिवसेंदिवस लोप पावत असलेली मानवता, समाजातील माणसं जात, धर्म, पंथ, राजकारणातील गटबाजीत विभागत चाललेली असताना तसेच धनदांडगे आर्थिक संपन्न समृद्ध मंडळींचा ‘आपल्याला काय त्याचे?’ अशी कोरडी, स्वार्थी, आत्मकेंद्री वृत्ती यामुळे आपली समाजाप्रती असलेली संवेदनशीलता दीपस्तंभासारखी समाजाला सदैव मार्गदर्शक राहील. आपल्या या महान कार्याकडे पाहून आम्हाला ‘बाबा आमटे’ यांच्या कुष्ठरोगी सेवेची आठवण आल्याशिवाय रहात नाही, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत गोरेगावच्या प्रबोधन क्रीडा भवनात उपस्थितांनी पारदळे यांना सन्मानित केले.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content