मुंबईतील कोळीवाड्याच्या ठिकाणी सुशोभिकरण करतानाच महिला बचत गट आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासह पर्यटनवृद्धीसाठी मुंबईतील पहिला ‘सी फूड प्लाझा’ माहीम चौपाटी लगत सुरू करण्यात आला आहे. या सी फूड प्लाझाला भेट देणाऱ्यांची संख्या प्रत्येक आठवड्यागणिक वाढत असून आतापर्यंत ३० हजार पर्यटकांनी येथे भेट दिली आहे.
मुंबईतील कोळीवाड्यातील महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महिला बचतगटांद्वारे संचलित ‘सी फूड प्लाझा’ संकल्पना राबविण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिकेला दिले होते. त्यानुसार मुंबईतील माहीममध्ये पहिला ‘सी फूड प्लाझा’ सुरू झाला आहे. या ठिकाणी दर्जेदार अन्नपदार्थ पुरवतानाच व्यवसायासाठी पूरक अशी साधनसामुग्री पुरविण्याचे निर्देशदेखील पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले होते. त्याअनुषंगाने महानगरपालिकेच्या नियोजन विभागाने प्रत्येक महिला बचतगटाला साधनसामुग्री उपलब्ध करून दिली आहे.
माहीम चौपाटीलगत कोळीवाड्यात असलेल्या या सी फूड प्लाझाला प्रत्येक आठवड्याला सरासरी ५०० जण भेट देत आहेत. २ नोव्हेंबर २०२३ रोजी शुभारंभ झाल्यापासून आतापर्यंत ३० हजार पर्यटकांनी या सी फूड प्लाझाला भेट दिली आहे. या ‘सी फूड प्लाझा’साठी आवश्यक दालन पालिकेमार्फत उभारण्यात आले आहेत. त्यासोबतच ५ टेबल, २० खुर्च्या, विद्युत रोशणाई, ओला आणि सुका कचरा संकलन डबे, ग्राहकांना सेवा पुरविण्यासाठी एप्रोन, हातमोजे, हेडर कॅप आदी बाबी पुरविण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक महिला बचतगटाला दालनावर त्यांचे माहितीफलक लावलेले असतात. नोंदणीकृत कोळी महिला बचतगटांना ‘सी फूड प्लाझा’ मध्ये दालन उभारणी आणि संचलनाची परवानगी देण्यात आली आहे. तसेच ग्राहकांना सेवा पुरवताना स्वच्छतेबाबत आणि पदार्थांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होणार नाही, याची खातरजमा करण्याच्या सूचनादेखील महिला बचतगटांना महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
स्थानिक महिलांना रोजगार मिळतानाच या परिसरात पर्यटनवाढीला चालना मिळावी, याच उद्देशातून कोळी महिला बचतगटांना नियोजन विभागाने साधनसामुग्री पुरवली आहे. तसेच आर्थिक पाठबळही उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सर्व गोष्टींचा फायदा महिला बचत गटांना दैनंदिन व्यवसायात होत असून राहत्या ठिकाणीच रोजगार निर्मितीला चालना मिळाली आहे, असे संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी सांगितले.
नजीकच्या काळात याठिकाणी अधिकाधिक सुविधा देतानाच कायमस्वरूपी प्रसाधनगृह आणि पाणी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी यांनी दिली आहे.
सुरूवातीच्या काळात कोळी महिलांना बचत गटाचे महत्त्व पटवून देण्यापासून ते रोजगारासाठी ‘सी फूड प्लाझा’ची संकल्पना सांगण्यासाठी सातत्याने समुपदेशन करण्यात आले. त्यासोबतच महिला बचत गटांना मत्स्य उत्पादनावर आधारित प्रशिक्षणही देण्यात आले आहे. नावीन्यपूर्ण आणि विक्रीयोग्य मत्स्य आधारित उत्पादने तयार करण्यासाठी मत्स्यपालन क्षेत्रातील ज्ञान आणि कौशल्य उपलब्ध करून देणे हा प्रशिक्षणामागचा उद्देश होता. परिणामी कौशल्य विकसित होतानाच महिलांचे जीवनमान उंचावेल, तसेच स्थानिक अर्थव्यवस्था वाढीस लागण्यासोबतच विकासही होईल, याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे.